“सांज ये गोकुळी, सावळी सावळी…” गाण्याच्या ओळी कानावर पडल्या की संध्याकाळ झालेली आपोआपच डोळ्यासमोर येते. सूर्याची उतरतीची उन्हं अंगावर घेत अलगदपणे ही सांजवेळ पश्चिम क्षितिजावर येऊ लागली की मग आपोआपच अस्वस्थ होतं,कातर होतं!
सकाळची उभारी माध्यांन्ही पर्यंत राहते आणि मग तिला कधी कलाटणी मिळते ते कळत नाही. मन उतरणीला लागते! दिवस आणि रात्रीला जोडणारी ही वेळ जणू काळजाचा तुकडा असते. रात्रीच्या विश्रांतीनंतर उगवणारी सकाळ नवीन आशा आकांक्षा घेऊन येते. दिवसभर आपण आपल्या उद्योगात इतके मग्न असतो की सांजवेळ इतकी लवकर डोकावते याचे भानच राहत नाही!
पहाटे पूर्वेला आभाळभर पसरलेल्या लाल केसरी रंगाच्या गालीच्या वरून कोवळ्या सूर्यकिरणांना घेऊन बाल रवी अवतरतो. तेव्हा त्याच्या तप्त किरणांचे अस्त्र गुप्तच असते जणू!
जसजसं आकाशाचे अंगण त्याला खेळायला मुक्त मिळत जाते, तस तसे त्या बाल रवीचे रूप सर्वांगाने तेजस्वी होत जाते. कालक्रमानुसार ते कधी सौम्य तर कधी दाहक रूप दाखवते. जेव्हा त्याची ही मस्ती कमी होत जाते तेव्हा तो पुन्हा क्षितिजाशी दोस्ती करायला वेगाने जाऊ लागतो. आपली सौम्य झालेली किरणे घेऊन निशेला भेटायला! तेव्हा ती संध्या लाजेने लालबुंद दिसते तर चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात निशेचा प्रवास सुरू होतो!
या अदलाबदलीच्या काळात ही सांजवेळ येते. निसर्गाचे हे रूप घराच्या गच्चीवरूनच मी अनुभवत असते. अशावेळी मिटल्या डोळ्यासमोर अनेक सूर्यास्त उभे राहतात. कधी सागरात बुडत जाणारे लाल केसरी सूर्यबिंब तर कधी डोंगरांच्या रांगात, झाडाझुडपात हळूहळू उतरणारे ते सूर्याचे लाल केशरी रूप!
अशावेळी आभाळातील रंगांची उधळण मनाला मंत्रमुग्ध करते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात आपले मुक्त फिरणे संपले असले तरी सूर्याचे फिरणे थांबले आहे का? तो तर आपल्या गतीने जात असतोच पण तरीही ही सांजवेळ रोज मनाला हुरहुर लावून जाते!
आयुष्याच्या उतरणीचा काळ हा असाच वेगाने जात असतो. जन्मापासूनचे बाळरूप बदलत बदलत तारुण्य येते. ज्या काळात मनुष्य कर्तव्य तत्पर असतो. आयुष्याच्या माध्यांन्ही ला तळपत्या सूर्याप्रमाणे मनुष्य कार्यरत असतो. जमेल तितक्या कर्तुत्वाने तळपत, पण त्यानंतर येणारी आयुष्याची उतरण तीव्र स्वरूपाची असते. ही सांजवेळ कधी येते कळतच नाही!
खूप काही करायचे बाकी राहिले आहे असे वाटते! पण गेलेला काळ परत येत नाही. कोरोनाच्या काळात तर मन अंतर्मुख झाले. जीवनाची नश्वरता अधिकच जाणवू लागली! जणू काही जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवरील ही सांजवेळ आहे, ती संयमानेच संपवायला हवी असंच काळ आपल्याला सांगत आहे का?
रोज ही सांजवेळ दिवे लागण्याची असते. सांजेला दिवा लावून आपण पुन्हा एकदा उद्याच्या आशेचे स्वप्न डोळ्यासमोर आणत असतो. अंधाराकडे नेणाऱ्या सांज वेळेला दिव्याचा प्रकाश दाखवून उद्याच्या आशादायी दिवसाकडे वाटचाल करायची असते. या सांजवेळी नंतर येणारी ही रात्र आपल्याला “रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल” अशी आशा दाखवते.
तसेच हेही दिवस जाऊन पुन्हा एकदा आपण निसर्गाची प्रसन्न पहाट अनुभवणार आहोत., त्यासाठी या सांजवेळीच्या काळाला सामोरे जायला पाहिजे आणि विश्वासाने प्रत्येक दिवस संयमाने घालवायला हवा तरच निराशेची काजळी त्यावर धरणार नाही. रात्र आणि दिवस यांना जोडणारी ही ‘सांजवेळ’ देवासमोर दिवा लावून आपण मांगल्यमय केली की ही हुरहुर नाहीशी होऊन मन प्रसन्न होते!
आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा संबंध मानवी जीवनाशी जोडून हे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत!