सुवचन – अति सर्वत्र वर्जयेत।
अतिदानात बलिर्बद्धो अतिमानात सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत॥
अर्थ :-
अत्यधिक दानशील असल्याने दैत्यराज बळीला पाताळात बंदी होऊन रहावं लागलं. अतिशय अभिमानी अगदी दुराभिमानी असल्याने सुयोधनही दुर्योधन म्हणून कुख्यात झाला व शेवटी भीमसेनाकडून वधला गेला. अति लोलंगतेमुळे असुरराज महाबळी रावणाचाही नाश झाला म्हणूनच कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत अतिरेक करणे टाळावेच.
टीप-
‘अती तिथे माती’ अशी मराठीमध्ये म्हण आहेच परंतु संस्कृतमधील ‘अति सर्वत्र वर्जयेत’ ही उक्ती आपण मराठीतही व्यवहारात बोलताना वापरतो.
वरील श्लोकाच्या बाबतीत एक पाठभेदही आढळतो तो असा,
अतिदानात बलिर्बद्धो अतिमानात सुयोधन:।
अति दानात् बलिर्बद्धः अभिमानात् सुयोधनः |
याच श्लोकाचे ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे चौथे चरण ठेऊन लिहिलेले इतरही श्लोक संस्कृतमधे आहेत. ते पाहूयात,
अतिदानात बलिर्बद्धः अतिमानात सुयोधनः।
रावणोति मदान्नष्टः अति सर्वत्र वर्जयेत्।।
या श्लोकात अति मदाने (अति माज केल्याने) रावण नष्ट झाला असे म्हटले आहे.
अतिदानाद्धतः कर्णस्त्वतिलोभात् सुयोधनः।
अतिकामाद्दशग्रीवस्त्वति सर्वत्र वर्जयेत्॥
अतिदानशूरतेमुळे कर्णाचा नाश झाला (दानशूरतेला कलंक लागू नये म्हणून याचकरुपात आलेल्या इंद्राला कवचकुंडले दान करावी लागली.) अतिलोभाने (राज्यलोभाने) दुर्योधनाचा नाश झाला. अतिकामामुळे दशानन (दशग्रीव) रावणाचा वध झाला खरोखर अतिरेक सर्वत्र टाळायलाच हवा.
अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः।
अतिदानाद्बलिर्बद्धोह्यति सर्वत्र वर्जयेत्।।
अतिसुंदरता या गुणामुळे सीतेचे हरण झाले आणि अत्यंत गर्विष्ठतेमुळे रावणचा अंत झाला. अति दानशूरपणाच्या गुणामुळे बळीराजाला आपलं राज्य गमावून पाताळात अडकून पडावं लागलं त्यामुळे अतिरेक सर्वत्र त्यागावा. या श्लोकातून हे सुद्धा लक्षात येतं की अवगुणच नव्हे तर चांगले गुणही अतिप्रमाणात असतील तर त्यानेही मनुष्य धोक्यात येतो म्हणून विवेक-विचार चातुर्य महत्त्वपूर्ण होय.
एक हिंदी दोहासुद्धा अतिप्रमाण त्रासदायक असते असे सांगतो.
अति भली न बरसना अति भली न धूप।
अति भली न बोलना अति भली न चुप॥ अती पाऊसही वाईट आणि अती ऊनही चांगले नाही. अती बोलणेही चुकीचे आणि अतिमौनही नुकसानदायकच.