तसा मी देवदेव करणारा नाही, पण नास्तिक ही नाही.
कसब्यात वेदपाठशाळा चालत असलेल्या वाड्यात रहात असल्याने संस्कार
आणि धारणा बनली पण कर्मकांडापेक्षा भाव आणि विश्वासच कायम महत्त्वाचे वाटले.
लहानपणी आषाढी एकादशी म्हणलं की सुट्टी आणि साबुदाणा खिचडी,
साबू वडे, दाण्याची आमटी, बटाटयाचे पापड, शिंगाड्याचा शिरा असे उपासाच्या फराळाचे पदार्थ डोळ्यापुढे यायचे.
शाळा पासोड्या विठोबाजवळ असल्यामुळे पुण्यात पालखी येण्याच्या
दिवशी शाळेला सुट्टी असायची पण घरी पालखी बनवून ग्यानबा-तुकाराम करत
मित्रांबरोबर वारकरी व्हायचो. माझे काका कुमठेकर रस्त्यावर रहायचे,
त्यांच्या घरासमोरून पालखी जायची तिचे दर्शन घ्यायला जायचो.
आठवी नववीनंतर आजोबांबरोबर दोन तीनदा आळंदी पुणे वारीही केली..
छान वाटायचं. पुढे विठ्ठलवाडीजवळ आनंदनगरला राहायला आल्यावर दरवर्षी
आषाढीला विठ्ठलाचं दर्शन चुकवलं नाही… पण आजोबा गेल्यावर वारीला जाणं झालं नाही.
गेली काही वर्ष कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींबरोबर आळंदी-पुणे,
सासवड-जेजुरी असे वारीचे टप्पे केले आणि ग्यानबा तुकारामाच्या गजरात न्हाऊन निघालो.
यावर्षी १८ जूनला वाल्हे ते लोणंद टप्पा करायचा ठरलं आणि
हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥
तुकारामाच्या या अभंगाप्रमाणे जसे लाखो वारकरी आषाढी येण्याची
आणि पंढरीच्या वारीची वाट पाहतात साधारण तसंच १८ जून आल्यावर
आम्ही वाल्ह्याची वाट धरली पहाटेच्या वातावरणात दिवे घाटातल्या
भव्य विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेऊन सासवड- जेजुरी मार्गे लोणंद कडे निघालो…
रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मोरगावच्या रस्त्याने मधल्या छोट्या
रस्त्यातून पंढरपूर वारी मार्गावर पोचलो आणि तिथल्या वारकऱ्यांच्या वावराने,
टाळ, मृदंग, वीणा यांच्या गजराने भक्तीमय झालो.
तिथं गेल्यावर आपोआपच वारकरी माऊलींच्या सहवासाने,
ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रसन्न अस्तित्वाने लीन होऊन मिसळून गेलो.
मनातल्या शंका कुशंका दूर होऊन शुद्ध भावाने वारीचा निर्मळ आनंद घेऊ लागलो.
एकमेकांना माऊली म्हणून हाक मारून विठूमाऊलीलाच जणू हाक देतोय असं वाटू लागलं.
चालत होतो, पाय दुखत नव्हते, रस्त्यातल्या खाचखळग्यांकडे लक्ष नव्हतं …
भजनं ऐकत…म्हणत पालखीपुढे वाटचाल करण्यात खूप समाधान आणि मनःशांती मिळत होती.
सुंदर नाम ओढणारे, तुळशीच्या माळा विकणारे, मोबाईल चार्जिंग करून देणारे,
वेवेगळ्या वस्तू- खेळणी विकणारे, झुंमका (झुणका) भाकर -सागर (साखरेचा) चहा, ऊसाचा रस विकणारे
आणि चक्क रस्त्यावर केशकर्तन, श्मश्रू काम करणारे नाभिक असे अनेक “उद्योजक” ही दिसले.
वाटेत वारकऱ्यांना नाश्ता -जेवण-पाणी देऊन एका प्रकारे माऊलींची सेवाच करणारे, रेनकोट, औषधांसारख्या आवश्यक वस्तू देणारे दानशूरही बघायला मिळाले.
वारी बरोबर जाताना जितक्या वेळा माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेता आलं तेवढं घेतलं आणि धन्य झालो.
“तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू,आम्हा लेकरांची विठू माऊली”
असं का म्हणत असावेत याची प्रचितीही आली.
खरंच, विठ्ठल या शब्दामुळे, विठ्ठल शब्द उच्चारण्यामुळे, विठ्ठल नामाच्या टाहूमुळे,
तनमनात एक विलक्षण आत्मविश्वास जागृत होतो.
चैतन्याची निर्मिती होते. हजारो लाखो वारकरी तहान भूक विसरून
विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीची वारी करतात. गावागावातले आबालवृद्ध
विठ्ठलनाम जपत पालखीत सामील होतात व वारकऱ्यांची सेवा करतात.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा तीन वेळा उच्चार केला तरी निर्माण होणारी
उर्जा आणि तिची अनुभूतीचे वर्णन अनेकांनी विविध प्रकारे केले आहे.
हृदयविकाराचा झटका आलेल्याने विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर प्रथमोपचार म्हणून करावा असे आपण.
वाचले असेल…त्याविषयी सोशल मीडियावरही ऑडियो .. व्हिज्युअल स्वरूपात पाहिले असेल
अनेक संत -कवी प्रभूतींनी लिहिलेले आणि भीमसेनजी–लता-आशा-
बाबूजी- वसंतराव –किशोरीताई इत्यादि दिग्गजांनी गायलेले विठ्ठलाचे
अभंग – भक्तिगीते आपण भावभक्तीने ऐकतो -गुणगुणतो.
या विठ्ठल भक्तीगीतांचे, अभंगांचे आणि संत साहित्याचे अध्ययन वर्षानुवर्षे होत आहे होत राहिल.
विठ्ठल – या शब्दाचा शब्दशः अर्थ विटेवर स्थल – वीटेवर स्थित.
विठ्ठलनामाचा उध्द्घोष ही किती वेगवेगळ्या पध्दतीने होतो – कुणी
त्याला विठोबा म्हणतात तर कुणी विठू माऊली, ज्ञानेश्वर त्याला माझी विठाई
तर तुकारामांची आवडी त्याला विठ्या आणी काही बाही म्हणते.
कुणासाठी तो पांडुरंग आहे तर कुणासाठी पंढरीनाथ आहे.
एका रचनेत त्याला पंढरीचा चोर तर एकात चक्क त्याला पंढरीचे भूत म्हटले आहे.
विष्णूसहस्रनामाप्रमाणे १६८ श्लोकांचे विठ्ठलसहस्रनाम हस्तलिखितात आहे
असे मी कुठेतरी वाचले होते. विठ्ठलाची नावे द्वारकेश्वर, मुरलीधर, गिरीधर,
कमलाबंधूसुखदा, पद्मावतीप्रिय:, गोपीजनलवल्लभ अशी कृष्णाशी मिळती जुळती आहेत.
कुणी त्याला काही म्हणो , महाराष्ट्रात शेकडो वर्षे विठ्ठलाची आणि विठ्ठलनामाची
ऊर्जा जनतेला जागृत करत आहे आणि देश परदेशातील विद्वान विठ्ठलभक्तिने
भारावून जाऊन वारीला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत आहेत.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या लोकयात्रेत राजकारणी जरी
आता बाधा आणत असले तरीही वारकऱ्यांत- भक्तांमध्ये जात पात नाही, उच्च- नीच नाही,
गरीब- श्रीमंत कुठलाच भेदभाव नाही. विठ्ठल म्हणजे प्रेम,दया, माया,शांती यांचा मिलाफ.
विठ्ठल म्हणजे वासनेचा नाश आणि विकारांवर विजय.
विठ्ठल म्हणजेच बंधुभाव विठ्ठल म्हणजेच सुखसमाधान, समता व समृद्धी.
विठ्ठल विठ्ठल गजरात आज पंढरीच काय आख्खा महाराष्ट्र- प्रत्येक
मराठी आणि अमराठी विठ्ठलभक्त बुडून गेला आहे.
आणि प्रत्येक वारकरी पुढची शेकडो वर्षे भजत रहाणार आहे….
आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हां
जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप
॥४॥