वळीव मजला आज दिसला वेगळ्या रूपात!
नित्यासारखा नाचता थिरकता वाटे ना प्रत्यक्षात!
वळिवाचा, गारांचा पाऊस खेळवी मुलांची मस्ती !
नाचत नाचत सर्वांगाने बहरे तरुणांची प्रीती!
वादळवारा, वीज कडकडे, रौद्र रूप निसर्गाचे!
तुटून गेल्या निसर्ग नात्याची जाणीव करून देते!
साध्या, छोट्या आनंदाला ग्रहण लागले कशाचे!
समजून न येई मज हे गूढ निसर्गाचे!
कोरोनाच्या छायेखाली मनी दडली होती भीती!
जणू वादळ घोंगावतेय,
वेढेल कधी अन् किती!
क्षणात दिसली मज आभाळी कमान इंद्रधनुची !
आतूरतेने मनास समजवी ही किनार आनंदाची!
जातील निघून काळे ढग हे,
येईल टिपूर चांदणे नभी!
जे करील सर्वा समजदार,
अन् आनंद येईल जगी !