आज वासंतीच्या घरात बरीच गडबड चाललेली होती.. कारणही तसेच होते, तिच्या लाडक्या लेकीची ‘ चोर चोळी ‘भरण्याचा कार्यक्रम होता, तसे बघायला गेले तर साधेच कारण… पण आजकाल छोट्याशा कुटुंबात आनंद साजरा करण्यासाठी आणि जी काही दोन-चार नातेवाईक मंडळी जमू शकतात यांच्यासाठी हे कारण फारच मोठे वाटत होते…
त्यानिमित्ताने तिच्या सासरची मंडळी म्हणजे इन मीन तीन माणसे, स्वतः नवरा म्हणजे ती चा लाडका जावई अजय आणि त्याचे आई-वडील…
आणि वासंती कडे म्हणाल तर.. ती स्वतः तिचा नवरा रमण आणि मुलगा चिन्मय झाली फक्त सहा डोकी.. वासंतीची मोठी बहीण येतेच म्हणाली आणि व्याह्यांचीही मोठी बहीण जवळच रहात असल्याने ती पण आली.. फार हौशी बाई… सगळे तिला अक्का म्हणतात..
अशी एकंदर आठ माणसे जमली.. पण घरामध्ये आनंदाला नुसते उधाण आलेले होते
वासंती ची मुलगी मयुरी अतिशय आनंदात होती, कारणही तसेच होते म्हणा लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर ही गोड बातमी तीच्या सार्या देहबोलीतून आणि टवटवीत फुललेल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती, तिच्या सासूबाई म्हणजेच नीलाताई त्यांना तर सुनेचे कौतुक किती करू आणि किती नको असे झालेले..
संध्याकाळी सोसायटीमधील पाच सवाष्ण बायका बोलावून त्यांनी ‘चोर-चोळीचे ‘हळदी कुंकू थाटात करून घेतले…. दिवसभराचा शिणवटा घालवायला म्हणून सगळेजण’ लॉंग ड्राईव्हला ‘बाहेर जायचे म्हणून तयारी करू लागले..
इतक्यात व्याही बुवांची मोठी बहीण अक्का वय वर्षे 77 ती म्हणू लागली की, आता बाहेर जाणे नको, घरातच राहू.. पहिलटकरीण आहे, दृष्ट लागेल माझ्या परीला… फार लाडकी होती ना ती!… त्यातच आता उशीर झालेला आहे.. घरातच थोडासा वरण भात खाऊ आणि आराम करू….
मग काय! जावई, मुलगी तिचा भाऊ आणि बाकीचे सारे हिरमुसले, अक्काबाई ना म्हणू लागले तुम्ही बसा घरात आम्ही जाऊन येतो.. त्यावर अक्काबाई म्हणाल्या माझे जरा ऐका! हवे तर उद्या आपण सकाळ पासून बाहेर पिकनिकला जाऊ, पण आता नको.. असे त्या वारंवार सांगू लागल्या, त्यांना कशाची जाणीव होत होती बरे! त्यामुळे थोडाश्या नाराजीने सगळ्यांनी जाणे रहित केले… आणि वासंती अनिच्छेने स्वयंपाक घरात पोट पूजेच्या तयारीला लागली…
मयुरी पण कपडे बदलायला म्हणून तिच्या खोलीत गेली आणि पाच मिनिटात मयुरीच्या रडण्याच्या आवाजाने सारे तिच्या खोलीकडे धावले.. पाहतात तर काय तिच्या खोलीतील वॉशरूम चा दरवाजा सताड उघडा होता, आणि मयुरी सिंक जवळ आधार घेऊन अस्ताव्यस्त बसून रडत होती… चेहरा पार घाबरलेला होता, वासंती तिच्याजवळ धावली तर तिला जाणवले मयुरी चे सर्व अंग थरथरत असून तिला धड उभे देखील राहवत नाही.. अजयने म्हणजेच तिच्या जावयाने अलगद उचलून मयुरीला बेडवर आणून बसविले, त्याआधीच तिच्या बाबांनी ऑलरेडी एसी चालू करून ठेवला होता.. वासंतीने मयुरीचा चेहरा आपल्या ओढणीने पुसून आणि चिंतेने व्याकुळ होऊन तिला विचारले.. मयुरी बाळा काय झाले? तर तिने आईला सांगितले काही नाही…
मला बाहेर जायचे नाही म्हणून खूप राग आला होता म्हणून मी रागानेच कपडे बदलत असताना, मला मळमळायला लागले आणि उलटी झाली, चेहरा धुवून आरशात पहात असताना, माझी मीच घाबरले… आणि परत तोंडावर पाणी मारून आरशात पाहिले तर काय! माझ्यासारखीच एक छोटीशी मुलगी मागून डोके काढून माझ्या चेहऱ्याला चेहरा घासत मला म्हणाली..’ आई मला मुरलेले लोणचे हवे ‘… आणि मयुरी वासंतीला आत्ताच्या आत्ता मला मुरलेले लोणचे लिंबाचे दे तूss माझी मुलगी मागते आहे… आणि आईला म्हणजेच वासंतीला गच्च मिठी मारून रडू लागली… आईने म्हणजेच वासंतीने तिची मिठी अलगद सोडवून मयुरी चा चेहरा आपल्याकडे वळवून प्रेमभराने तिला म्हणाली, मयुरी बाळा! अगं अक्काआत्या तुझ्यावर अतिशय माया करतात ग. माझ्यापेक्षाही तुझ्याशी त्यांनी अंतरंगाने जिव्हाळ्याची नाळ जोडलेली आहे, तू त्यांच्याकडे आत्या बाई म्हणून किती हट्ट करतेस आणि पुरवुन घेतेस ! मग त्यांनी बाहेर जाऊ नकोस, असे उगीच नाही सांगितले, अगं ही जुनी अनुभवी माणसं.. जुन्या मुरलेल्या लोणच्यासारखी असतात, लक्षात येते का बाळा तुझ्या? म्हणजेच लोणचे मुरल की, त्याचे औषधी गुण जास्त वाढतात… त्याच बरोबर चवही वाढते.. तसेच ह्या अक्का आत्याचे… तिने तुला झालेली दिवसभराची धावपळ, दगदग अनुभवी नजरेने ओळखली होती, आणि तुला लागलेले कडक डोहाळे, जाणून होती म्हणूनच थोडासा धाक दाखवून तिने घरात बसविले… हे सारे मायेपटीच बरं…
एरवी सर्वात मोठी म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्यावरच टाकून आपण निर्धास्त असतो ना! मग त्यांनी एखादी गोष्ट अधिकाराने सांगितली तर त्यामागे सुद्धा आपल्याबद्दल असलेली काळजीत असते ग.. आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो! आत्ताच पहा बरं..’माझी लेक मुरलेलं लोणचं मागते म्हणून कळवळून रडलीस ना! अगदी तसेच अक्का आत्याला वाटले… अगं त्या पण मुरलेल्या लोणच्या सारख्या आहेत… आयुष्याचे अनुभव घेऊन, त्यांच्या मुरलेल्या नजरेने तुझे कडक डोहाळे जाणून त्या तुला जपत आहेत … आईच्या सांगण्याने मयुरीला गलबलून आले.. तिचे डोळे पाणावले आणि म्हणाली खरंच ग आई, आपल्या अक्का आत्या मुरलेलं लोणचं आहेत….
सगळ्यांचे उतरलेले चेहरे जादूची कांडी फिरवल्यासारखे हास्याने फुलले… आणि सगळ्यांनी एकच गलका केला आम्हाला पण पाहिजे… मुरलेले लोणचे 😀😀.. तेवढ्यात आक्का बाई म्हणाल्या चला आता पान घेतलीत, आणि येताना मी लिंबाचं मुरलेलं लोणचं पण आणलय बरणी भर… अन काय परत एकदा साऱ्या घरात हास्याचे कारंजे फुलले…
सगळ्यांनी वरण-भात तूप आणि लिंबाचे मुरलेले लोणचे यावर ताव मारला आणि मयुरी ला म्हणाले, ‘बघ बाई आता! खुश झालीस ना तू!… अजय म्हणजेच मयुरीचा नवरा तिच्याकडे सहेतुक हसला… मयुरी खूपच लाजली… अन हळूच त्याला म्हणाली, मला कुठे रे हवे होते मुरलेले लोणचे! तुझ्याचं लेकीला हवं होतं’ मुरलेलं लोणचं ‘… बघ आता! असे रोज रोज हट्ट करेल ह़ ती…
असं हे अक्का आत्या सारखंच,.. मुरलेलं लोणचं, चोर-चोळीची लज्जत वाढवून गेलं….