२०२० साला ची सुरूवातच कोरोनाने झाली आणि आपण मास्क वापरू लागलो. आज पर्यंत मुखवटा म्हणजे चेहऱ्यावरील एक काही काळापुरते घेतलेले रूप हाच अर्थ डोळ्यासमोर येत होता, पण ‘मास्क’ या शब्दाचा खराखुरा अर्थ आपल्याला आता कळला! उन्हापासून संरक्षण करायला पूर्वी मोठा रूमाल वापरला जात असे पण जीवाचे संरक्षण करण्यासाठी सतत मास्क वापरावा लागेल असे आपल्याला स्वप्नात सुध्दा कधी वाटले नव्हते!
सध्यातरी ‘मास्क’ हा शरीराचा अविभाज्य भाग झाला आहे. या ‘मुखवटे’ किंवा ‘मास्क’ या शब्दावरून मला माणसांचे वेगवेगळे मुखवटे आठवायला लागले! चेहऱ्यावरील भावना लपवण्यासाठी काहीवेळा असे वेगवेगळे मुखवटे वापरले जातात. राग, लोभ, मत्सर किंवा भीती यासारखे भाव चेहऱ्यावर दिसू नयेत म्हणून माणसे समाजात वावरताना मुखवटे वापरत असतात. ‘चेहरा हा माणसाच्या भावनांचा आरसा असतो’ असं म्हटलं जातं, ते खरंच आहे पण बरेचदा एखाद्याच्या आतील भावना वेगळ्याच असतात पण चेहऱ्यावर मात्र वेगळाच मुखवटा चढवलेला असतो!
नाटकामध्ये कलाकार भावनाविष्कार करतात तेव्हा त्यांनी तो खोटाच मुखवटा चेहऱ्यावर चढवलेला असतो. काहीवेळा वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून नटाला नाटक वठवावे लागते. यासंदर्भात बालगंधर्वांची एक गोष्ट मला आठवते. त्यांचे मूल खूप आजारी अवस्थेत असताना त्यांना ठरल्याप्रमाणे नाटकाचा प्रयोग करण्यासाठी जावे लागते आणि काही वेळातच ते मुल गेल्याची बातमी कळूनही आपल्या ‘मायबाप’ प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर नाटक करावे लागते. अशावेळी मुखवट्याआडचे दुःख दिसू न देता ते सादर करणे केवढे कठीण असेल!
श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, स्मिता पाटील, सुलभा देशपांडे या सारख्या अनेक नाट्य-चित्र क्षेत्रातील कलाकारांनी भूमिका जगल्या. वैयक्तिक सुखदुःखाकडे लक्ष न देता कामात झोकून देऊन भूमिका सजीव केल्या. असे हे मुखवटे त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर साकार केले!
साध्या जीवनातही आपल्याला कित्येकदां मुखवटे घेऊन जगावे लागते. अनपेक्षित आलेले, कधी नको असलेले किंवा अवेळी आलेले पाहुणे असले तरी घरच्या स्त्रीला हसतमुख चेहरा करून स्वागत करावे लागते. तोही एकप्रकारचा मुखवटा असतो. प्रत्येकाला आपली जीवनातली भूमिका बजावण्यासाठी मुखवट्याचा आधार घ्यावा लागतो! आजच्या ‘करोना’ च्या काळात
मुखवट्याने ‘मास्क’चे वेगळेच रूप धारण केले आहे. लोकांपासून विलग रहाताना, एकमेकांशी कमी संपर्क ठेवताना ‘मास्क’ वापरावा लागतोय! जीवनाच्या या रूपाला सामोरे जाताना आपला जीव सुरक्षित राहावा म्हणून हे मुखवटयाचे रूप आपण धारण केले आहे.
पल्याला सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातही ‘मुखवट्या चें जग’ प्रामुख्याने दिसते. स्वार्थ आणि सत्ता याचा ध्यास घेऊन या क्षेत्रातील कित्येक लोक सतत मुखवटे बदलत असतात. त्यामुळे त्यांची कृती आणि वृत्ती यात बरीच तफावत दिसत असते. या मुखवट्या मागे त्यांना त्यांचे भावही लपवता येतात.
कोरोना च्या काळात हे ‘मास्क’बाजारात सुंदर आकारात, रंगात, मॅचिंगचे मिळू लागले आहेत. त्यातही मनुष्याची कलात्मकता दिसून येत आहे. आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे, आनंदाने सामोरे जाण्याची माणसाची वृत्ती दिसून येते. हे मुखवटे ‘कोरोना’ पासून संरक्षण करतील या विश्वासाने जगायचे बळही त्यामुळे वाढले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीने माणूस कोरोना चा सामना करत आहे. कोरोना रोगाचा प्रतिकार केला जाईल, काही काळातच तो रोग जाईलही पण या ‘मास्क’ मध्ये वावरायची माणसाची सवय जाईल का?
एकूण समाजात जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी होईल का? चेहऱ्यावरचा ‘कापडी मास्क’ दूर करणे एक वेळ सोपे आहे पण मनावर जे अनेक प्रकारचे ‘मास्क’आपण चढवतो ते दूर करणे माणसाला शक्य होईल का?