आपल्या प्रत्येकांकडे दररोज एक पेपर येतो. प्रत्येक जण वेगवेगळे पेपर घेतात. सकाळचा गरम गरम चहा आणि पेपर वाचणे या एकत्रित गोष्टी घडणे हा एक अमृतयोगच म्हणावा लागेल.
दैनंदिन कामकाजाच्या धावपळीमुळे अनेकांना सकाळी पेपर पूर्ण वाचायला मिळत नाही तरीसुद्धा संपूर्ण पेपरवर एक ओझरती नजर निश्चितपणे टाकली जातेच. दूरदर्शन वरिल अक्षरशः हजारो वाहीन्या बातम्यांचा 24 तास धूमाकूळ घालत असतात पण तरीही पेपरचे महत्त्व अजूनही अबाधीतच आहे यात शंका नाही.
आपण भरपूर पेपर वाचतो पण आपण कधी पेपरवाल्याबद्दल कधीतरी विचार केला आहे का?? आपल्याला अगदी सकाळी ०६ वाजता पेपर हातात मिळतो पण तो मिळविण्यासाठी त्या पेपरवाल्याला पहाटे ०४ पासूनच कसरत करावी लागते. अगदी कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस असला तरीही या सर्व दिव्यातून जावून पेपरवाला आपले कर्तव्य पार पाडतोच.
पेपर टाकण्याची एक आगळी वेगळी आणि विशिष्ट अशी कला ही फक्त कसलेल्या पेपरवाल्याच जमते. पेपरची विशिष्ट पुंगळी करुन सायकलवरुन चालता ज्या ठिकाणी पेपर टाकायचा तेथेच पोहोचेल अशा पद्धतीने फेकणे ही एक कलाच आहे. अनेक ठिकाणी होतकरु, गरीब पण स्वाभिमानी मुले सकाळी पेपर टाकून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः भागविणारे अनेक मुले आहेत.
पेपर टाकून आणि चांगले शिक्षण घेवून मोठमोठया पदांपर्यत पोहोचलेली अनेक मुले मी पाहीलेली आहेत. अशा मुलांचा समाजालाही आभिमानच वाटतो. कोरोनाच्या महाभयंकर कठीण परिस्थितीत बराच काळ पेपर बंद होते त्यावेळी या पेपर टाकणा-या मुलांची खूपच गळचेपी झालेली सर्वांनी पाहीलेली आहेच. आपण पेपर तर दररोज वाचतोच पण कधीतरी पेपरवाल्याचे अंतर्भावही वाचायला काय हरकत आहे ?