डाँक्टरांनी श्यामलाबाईंच्या छातीवर स्टेथास्कोप ठेवून थोडा वेळ तपासणी केली. मग वैभवकडे पहात ते म्हणाले
” साँरी शी इज नो मोअर “
ते ऐकताच वैभवने “आईsss” असा जोरात हंबरडा फोडत आईच्या पार्थिवाला मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडू लागला.जरा सावरल्यावर त्याने बाजूला पाहिलं. त्याचे वडील-जयंतराव खुर्चीवर बसून रडत होते. गेली पाचसहा वर्ष श्यामलाबाईंच्या आजारपणामुळे जे हाल बापलेकांचे झाले होते त्यांचं स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसत होतं.
पाचसहा वर्षं प्रचंड प्रयत्न करुन आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही हाती शुन्य लागलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न बघायची श्यामलाबाईंची खुप इच्छा होती पण तीही अपूर्ण राहिली होती.
त्याच्या खांद्यावर हात पडला तसं वैभवने वळून पाहिलं. शेजारपाजारचे बरेच जण जमा झाले होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या पाटील काकांनी त्याला नजरेने इशारा केला तसा तो उठून त्यांच्यासोबत बाहेर आला.
” वैभव कुणाला फोन करुन कळवायचं असेल तर मला नंबर दे मी फोन करतो “
” मामा, मावशीला सोडून सगळ्यांना कळवून टाक वैभव ” अचानक जयंतराव मागून येत म्हणाले
” असं कसं म्हणता बाबा? त्यांची सख्खी बहिण होती आई “
” असू दे.मला नकोत ती दोघं इथं “
” कमाल करता जयंतदादा तुम्ही! अहो तुमची काहिही भांडणं असोत. सख्ख्या भाऊबहिणीला कळवणं आवश्यकच आहे “पाटील काका आश्चर्य वाटून म्हणाले
” बरोबर म्हणताय पाटील काका तुम्ही. अहो भाऊबहिण आले नाही तर बाईंच्या पिंडाला कावळा तरी शिवेल का? काही काय सांगताय जयंतदादा?”
घोळक्यात बसलेली एक म्हातारी रागावून म्हणाली तसे जयंतराव चुप बसले. वैभवने त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत मोबाईल काढला आणि पहिला फोन संजूमामाला लावला.
” मामा अरे आई गेली “रडतरडत वैभव बोलला
“काय्य्यsss?कधी आणि कशी?” मामा ओरडला आणि रडू लागला.
” आताच गेली. आणि तुला तर माहितीच आहे की ती
पाचसहा वर्षापासून आजारीच होती. तिला काय झालंय हे डाँक्टरांना शेवटपर्यंत कळलं नाही. मागच्या आठवड्यात तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या म्हणून आयसीयूत अँडमीट केलं होतं. काल डाँक्टरांनी ट्रिटमेंटचा काही उपयोग होत नाहिये हे पाहून तीला घरी घेऊन जायला सांगितलं होतं. म्हणून काल घरी घेऊन आलो होतो. कालपासून ती मला मामाला बोलव असं म्हणत होती “
“अरे मग कळवलं का नाही मला? मी ताबडतोब आलो असतो “
वैभव बाहेर अंगणात आला. आसपास जयंतराव नाहीत हे पाहून हळूच म्हणाला
” बाबांनी मला तुला कळवायला मनाई केली होती”
एक क्षण शांतता पसरली मग मामा जोरात ओरडून म्हणाला
“हलकट आहे तुझा बाप. मरतांना सुद्धा त्याने माझ्या बहिणीची इच्छा पुर्ण केली नाही “
आता मामा जोरजोरात रडू लागला.ते ऐकून वैभवही रडू लागला.
थोड्या वेळाने भावना ओसरल्यावर मामा म्हणाला
“मी निघतो लगेच. विद्या मावशीला तू कळवलंय का?”
“नाही. बाबांनी मना केलं होतं “
” खरंच एक नंबरचा नीच माणूस आहे. पण आता त्याच्यावर बोलण्याची ही वेळ नाही. मी कळवतो विद्याला आणि मी लगेच निघतो. तरी मला तीन तास तरी लागतील पोहचायला.तोपर्यंत थांबवून ठेव तुझ्या बापाला. नाहितर आमची शेवटची सुध्दा भेट होऊ नये म्हणून मुद्दाम घाई करायचा “
” नाही मामा. मावशी आणि तू आल्याशिवाय मी बाबांना निघू देणार नाही. खुप झाली त्यांची नाटकं. आता मी त्यांचं ऐकून घेणार नाही “
” गुड. बरं तुला पैशांची मदत हवीये का?”
वैभवला गहिवरून आलं. बाबा मामाशी किती वाईट वागले पण मामाने आपला चांगूलपणा सोडला नव्हता.
“नको. सध्यातरी आहेत. अडचण आलीच तर तसं तुला सांगतो “
” बरं.ठेवतो फोन “
मामाने फोन ठेवला आणि वैभवला मागच्या गोष्टी आठवू लागल्या. संजूमामा आणि जयंतराव यांचं भांडण अगदी जयंतरावांच्या लग्नापासून होतं आणि त्यात चूक जयंतरावांच्या वडिलांचीच होती. लग्नाला “आमची फक्त पन्नास माणसं असतील” असं अगोदर सांगून जयंतरावांचे वडील दोनशे माणसं घेऊन गेले होते. बरं वाढलेल्या माणसांची आगावू कल्पनाही त्यांनी मुलीकडच्या लोकांना दिली नाही. अचानक दिडशे माणसं जास्त आल्यामुळे संजूमामा गांगरला. त्यावेळी कँटरर्सना जेवणाचे काँट्रॅक्ट देण्याची पध्दत नव्हती.
अर्थातच ऐनवेळी किराणा आणून जेवण तयार करण्यात साहजिकच उशीर झाला. जेवण्याच्या पंगतीला उशीर झाला, वराकडच्या मंडळींना ताटकळत बसावं लागलं म्हणून जयंतरावांच्या वडिलांनी आरडाओरड केली. आतापर्यंत शांततेने सगळं निभावून नेणाऱ्या संजूमामाचा संयम सुटला आणि त्याने सगळ्या लोकांसमोर जयंतरावांच्या वडिलांची चांगलीच कान उघाडणी केली. नवरामुलगा म्हणून जयंतराव त्यावेळी काही बोलले नाहीत पण वडिलांचा अपमान केला म्हणून त्यांनी संजूमामाशी कायमचा अबोला धरला.
मात्र संधी मिळाली की ते चारचौघात संजूमामाचा पाण उतारा करत. त्याला वाटेल ते बोलत.इतर नातेवाईंकांमध्येही त्याची बदनामी करत. पण आपल्या बहिणीचा संसार व्यवस्थित रहावा म्हणून संजू सगळं सहन करत होता. सात आठ वर्षांपूर्वी संजूचा जुना वडिलोपार्जित वाडा विकल्या गेला. त्यावेळी वैभवच्या आईने जयंतरावांना न सांगताच एक रुपयाही हिस्सा न घेता हक्कसोड पत्रावर सह्या केल्या होत्या. तिचंही साहजिकच होतं. ज्या माणसाने आयुष्यभर आपल्या भावाचा अपमान केला त्याला आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीतला एक रुपयाही द्यायची त्या माऊलीची इच्छा नव्हती.
एक वर्षाच्या आतच जयंतरावांना ही गोष्ट कुठूनतरी कळली आणि त्यांनी एकच आकांडतांडव केलं. श्यामलाबाईंना आणि संजूला खुप शिव्या दिल्या. संजूशी आधीच संबंध खराब होते ते आता कायमचेच तोडून टाकले. तीन महिने ते श्यामला बाईंशी बोलले नाहीत. त्या दिवसांनंतर त्यांनी आपल्या सासरी पाऊलही टाकलं नाही. संजूने मात्र आपलं कर्तव्य सोडलं नाही. दर दिवाळीला तो आपल्या बहिण, मेव्हण्याला न चुकता निमंत्रण द्यायचा पण जयंतराव त्याच्याशी बोलायचे नाहीत शिवाय श्यामला बाईंनाही माहेरी पाठवायचे नाहीत. श्यामलाबाईंच्या शेवटच्या दिवसात त्यांची भावाला भेटायची इच्छाही त्यांनी पुर्ण होऊ दिली नव्हती.
बरोबर तीन तासांनी संजू आला. आल्याआल्या आपल्या मेव्हण्याला भेटायला गेला. आपल्यापरीने त्याने जयंतरावांना सांत्वन करायचा प्रयत्न केला. पण जयंतराव त्याच्याशी एक शब्दानेही बोलले नाहीत. सुंभ जळाला पण पीळ मात्र तसाच होता. थोड्या वेळाने विद्या आली. तिने मात्र काळवेळ न बघता बहिणीच्या तब्येतीबद्दल काहीही न कळविल्याबद्दल जयंतरावांची चांगलीच खरडपट्टी काढली. तिच्याशीही जयंतराव एक शब्दानेही बोलले नाहीत.
अंत्यविधी पार पडला. सगळे घरी परतले. जयंतराव वैभवला घेऊन मागच्या खोलीत आले.
“वैभव कार्य पार पडलं. मामा मावशीला घरी जायला सांग “
वैभव एक क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिला. मग संतापून म्हणाला.
” कमाल करता बाबा तुम्ही! आईला जाऊन आताशी पाचसहा तासच झालेत आणि तिच्या सख्ख्या भावाबहिणीला मी घरी जायला सांगू?”
” मला ते डोळ्यासमोर सुध्दा नको आहेत “
आता मात्र वैभवची नस तडकली. वेळ कोणती आहे आणि हा माणूस आपलं जुनं वैर कुरवाळत बसला होता. तो जवळजवळ ओरडतच म्हणाला
” मी नाही सांगणार. तुम्हांला सांगायचं असेल तर तुम्हीच सांगा. अशीही या दु:खाच्या प्रसंगी मला मामा मावशीची खुप गरज आहे”
तो तिथून निघून बाहेर आला. बाहेरच्या खोलीत विद्या मावशी संजू मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. तिला तसं रडतांना पाहून वैभवला ही भडभडून आलं आणि तो मावशीला मिठी मारुन रडू लागला. मामा त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला
” वैभव काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत ना!तुझ्या वडिलांमुळे आम्हांला मनात असुनही तुम्हांला मदत करता आली नाही. पण तू मात्र बिनधास्त आमच्याशी बोलत रहा. काही गरज लागली तर नि:संकोचपण सांग “
कित्येक वर्षात असं कुणी वैभवशी प्रेमाने बोललंच नव्हतं. ” खरंच आईच्या आजारपणात मामाचा आधार असता तर किती बरं वाटलं असतं. काय सांगावं कदाचित आई बरी सुद्धा झाली असती “वैभवच्या मनात विचार येऊन गेला.
” चल आम्ही निघतो. तिसऱ्या दिवशी परत येतो “मामा म्हणाला
“का?थांबा ना. मी इथे एकटा पडेन. तुम्ही दोघं थांबलात तर बरं वाटेल “
” मला कल्पना आहे. पण नको. तुझा बाप आम्ही कधी जातो याकडे डोळे लावून बसला असेल. ते आमच्याशी बोलत नसतांना आम्हालाही घरात कोंडल्यासारखं होईल “
मामा बरोबरच म्हणत होता त्यामुळे वैभवचा नाईलाज झाला. मामामावशी गेले तसा वैभव उदास झाला. त्याला लहानपणीचे दिवस आठवले. खुप मजा यायची मामाकडे रहायला. दिवाळी आणि उन्हाळ्यातल्या सुट्यांची तो आतुरतेने वाट बघत असायचा.
केव्हा एकदा सुट्या लागतात आणि मामाकडे जातो असं त्याला होऊन जायचं. वैभवला सख्खे भाऊबहिण नव्हते. त्यातून वडिलांचा स्वभाव असा शिघ्रकोपी. त्यामुळे स्वतःच्या घरी असंही त्याला करमायचं नाही. मामाकडे मात्र मोकळेपणा असायचा. तिथे गेल्यावर मामाची मुलं, विद्या मावशीची मुलं आणि तो स्वतः खुप धिंगाणा घालायचे. गंमत म्हणजे त्यावेळीही मोबाईल होते पण मामा मुलांना मोबाईलला हात लावू द्यायचा नाही. त्यामुळे ही मुलं दिवसभर खेळत असायची. प्रेमळ आजी जितके लाड करायची त्यांच्या दुप्पट लाड मामा करायचा. तेव्हा मामाची आर्थिक स्थिती जेमतेमच होती तरीही मामा खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेत नसे.
खाण्यापिण्याची तर खुप रेलचेल असायची. रात्री गच्चीवर झोपता झोपता मामा आकाशातल्या ग्रह ताऱ्यांची माहिती द्यायचा. मामाकडे सुटीचे दिवस कधी संपायचे तेही कळत नसायचं.
” गेले ते आनंदाचे दिवस “वैभव मनातल्या मनात बोलला. त्याला आठवलं तो मोठा झाला, इंजिनीयर झाला तरीही मामाच्या घरी जायची त्याची ओढ कधीही कमी झाली नाही. सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते.
जयंतराव संजूचा रागराग करण्याचं अजून एक कारण होतं. जयंतरावांच्या लग्नाच्या वेळी आणि पुढची दहाबारा वर्षं संजूची परिस्थिती जवळजवळ गरीबीचीच होती. पण पुढे संजूने बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्याचं नशीब फळफळलं. गरीब संजू म्हणता म्हणता धनाढ्य शेठ होऊन गेला. सात आठ वर्षांपूर्वी त्याने मोठा बंगला बांधला. घरी दोन दोन चारचाकी आल्या..गावांतल्या मोठमोठ्या लोकांशी, राजकीय पुढाऱ्यांशी त्याची चांगली घसट वाढली..जयंतरावांचा एक नातेवाईक संजूच्या घराजवळच रहात होता. त्याच्याकडून त्यांना संजूच्या प्रगतीबद्दल कळायचं आणि मग त्यांचा जास्तच जळफळाट व्हायचा.
तिसऱ्या दिवशी संजू आणि विद्या परत आले. निमंत्रण नसतांना ते आल्याचं पाहून जयंतराव खवळले. वैभवला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं.
” वैभव तुझ्या मामा, मावशीला कोणी बोलावलं होतं?”त्यांनी रागाने विचारलं
“मी बोलावलं होतं. का?”वैभव त्यांच्या नजरेला नजर भिडवत धिटाईने बोलला. जयंतराव क्षणभर चुप झाले. मग उसळून म्हणाले
“आता पुढच्या विधींसाठी तरी त्यांना बोलावू नकोस. त्यांची बहिण गेली संपले त्यांचे संबंध “
” विधी संपेपर्यंत तरी त्यांचे संबंध रहातील बाबा आणि तोपर्यंत तरी मी त्यांना बोलावणारच. मग पुढचं पुढे पाहू “वैभव जोरातच बोलला पण मग त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. आजपर्यंत तो वडिलांशी अशा भाषेत बोलला नव्हता. का कुणास ठाऊक पण आता त्याला वडिलांची भिती वाटेनाशी झाली होती.
दशक्रिया विधी झाला पण पिंडाला कावळा शिवेना. कावळे घिरट्या घालत होते पण पिंडाला शिवत नव्हते. श्यामलाबाईंची शेवटची इच्छा काय होती हेच कुणाला कळत नव्हतं. सगळे उपाय थकले. वैभव रडू लागला. जयंतरावांचेही डोळे भरुन आले होते. अचानक संजूमामाला काय वाटलं कुणास ठाऊक. तो पुढे आला आणि वैभवला जवळ घेऊन म्हणाला
” ताई काही काळजी करु नकोस. आम्ही मरेपर्यंत तुझ्या मुलाला अंतर देणार नाही. त्याचं लग्न, संसार सगळं व्यवस्थित करुन देऊ “
तो तसं म्हणायचा अवकाश, कावळ्यांची फौज पिंडावर तुटून पडली. वैभव मामाला घट्ट मिठी मारुन रडू लागला. जयंतरावांना मात्र अपमान झाल्यासारखं वाटलं. याचा अर्थ स्पष्टच होता की मेल्यानंतरही बायकोचा त्यांच्यावर विश्वास नव्हता.
तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यावर मामा वैभवजवळ आला. “वैभव आम्ही आता निघतो. आता यापुढे तुझ्या घरी आमचं येणं होईल की नाही ते सांगता येत नाही. पण तू आमच्याकडे नि:संकोच येत जा. काही मदत लागली तर आम्हांला सांगायला संकोचू नको. तुझ्या लग्नाचंही आम्ही बघायला तयार आहोत पण तुझ्या वडिलांना ते चालेल का? हे विचारुन घे. तुझ्या आईला तुझी काळजी घ्यायचं मी वचन दिलंय ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. अडचणीच्या वेळी रात्रीबेरात्री केव्हाही काँल कर, मी मदतीला हजर असेन. बरं. ताईच्या आजारपणात तुझा खर्च खुप झाला असेल म्हणून मी तुझ्या खात्यात दोन लाख ट्रान्सफर केले आहेत.
पाहून घे. आणि हो. परत करायचा वेडेपणा करु नकोस. माझ्या बहिणीच्या कार्यासाठी मी खर्च केलेत असं समज “
वैभवला भडभडून आलं. त्याने मामाला मिठी मारली. रडतारडता तो म्हणाला
” मी खुप एकटा पडलोय रे मामा. हे बाबा असे तिरसट स्वभावाचे. कसं होईल माझं ?”
“काही काळजी करु नकोस. आता बायको गेल्यामुळे तरी त्यांच्या स्वभावात फरक पडेल असं वाटतंय “
वैभव काही बोलला नाही पण मामाचं बोलणं कितपत खरं होईल याचीच त्याला शंका वाटत होती.
सगळे पाहुणे गेल्यावर दोनतीन दिवसांनी वैभव वडिलांना म्हणाला
“तुम्ही त्या मामाचा नेहमी रागराग करता पण बघा, शेवटी तोच मदतीला धावून आला. आईच्या अंत्यविधीसाठी त्यानेच मदत केली. शेवटी जातांनाही मला दोन लाख रुपये देऊन गेला. तुमच्या एकातरी नातेवाईकाने एक रुपया तरी काढून दिला का?”
एक क्षण जयंतराव चुप बसले मग उसळून म्हणाले
“काही उपकार नाही केले तुझ्या मामाने! वडिलोपार्जित वाडा ८० लाखाला विकला. तेव्हा तुझ्या आईच्या हिश्शाचे ८ लाख त्याने स्वतःच खाऊन टाकले. एक रुपया तरी दिला का त्याने?”
” चुकीचं म्हणताय तुम्ही. आई आणि मावशीनेच विनामुल्य हक्क सोडपत्र करुन दिलं होतं. मामा तर त्यांचा हिस्सा द्यायला तयार होता असं आईनेच मला तसं सांगितलं होतं “
” खोटं आहे ते! गोडगोड बोलून त्याने त्यांच्याकडून सह्या करुन घेतल्या आणि नंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी पाठवलं. महाहलकट आहे तुझा मामा “
आता मात्र वैभव खवळला
“बस करा बाबा. आख्खं आयुष्य तुम्ही मामाला शिव्या देण्यात घालवलं. आता आई गेली. संपले तुमचे संबंध. आणि मला तर कधीच मामा वाईट दिसला नाही. तुम्ही किती त्याच्याशी वाईट वागता. त्याला हिडिसफिडीस करता. पण तो नेहमीच तुमच्याशी आदराने बोलतो. फक्त तुम्हांलाच तो वाईट दिसतो. विद्यामावशीच्या नवऱ्याचं तर त्याच्याशिवाय पान हलत नाही. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते कुठलंही काम करत नाहीत. इतके त्या दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत “
” बस पुरे कर तुझं ते मामा पुराण “जयंतराव ओरडून म्हणाले “मला त्यात आता काडीचाही इंटरेस्ट उरला नाहिये. आणि आता यापुढे मामाचं नावंही या घरात काढायचं नाही. समजलं “
त्यांच्या या अवताराने वैभव वरमला. आपल्या बापाला कसं समजवावं हे त्याला कळेना.
वैभव दिवसभर ड्युटीनिमित्त बाहेर असल्यामुळे जयंतराव घरी एकटेच असायचे. हुकूम गाजवायला आता बायको उरली नसल्याने त्यांना आयुष्यभर कधीही न केलेली कामं करावी लागत होती. घरच्या कामांसाठी बाई होती तरीसुद्धा स्वतःचा चहा करुन घेणं, पाणी भरणं इत्यादी कामं त्यांना करावीच लागायची. त्यामुळे त्यांची खुप चिडचिड व्हायची. स्वयंपाकाला त्यांनी बाई लावून घेतली होती पण बायकोच्या हातच्या चटकदार जेवणाची सवय असणाऱ्या जयंतरावांना तिच्या हातचा स्वयंपाक आवडत नव्हता. तिच्या मानाने वैभव छान भाज्या बनवायचा. म्हणून संध्याकाळी तो घरी आला की ते त्याला भाजी करायला सांगायचे.
थकूनभागून आलेला वैभव कधीकधी त्यांच्या आग्रहास्तव करायचा देखील. पण रोजरोज त्याला शक्य होत नव्हतं. त्याने नाही म्हंटलं की दोघांचेही खटके उडायचे. एक दिवस वैभव संतापून त्यांना म्हणाला “एवढंच जर चटकदार जेवण तुम्हांला आवडतं तर आईकडून शिकून का नाही घेतलंत?”
” मला काय माहीत ती इतक्या लवकर जाईल म्हणून!”
“हो. पण कधी तरी आपण स्वयंपाक करुन बायकोला आराम द्यावा असं तुम्हांला वाटलं नाही का? आईच्या आजारपणातही तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावायचात.तिचे हाल पहावत नव्हते म्हणून मीच स्वयंपाक शिकून घेतला पण तुम्हांला कधीही तिची किंव आली नाही “
” मीच जर स्वयंपाक करायचा तर बायकोची गरजच काय?”
“याचा अर्थ तुम्ही आईला फक्त स्वयंपाक करणारी, घरकाम करणारी बाई असंच समजत होतात ना? माणूस म्हणून तुम्ही तिच्याकडे पाहिलंच नाही ना?”
“चुप बैस. मला शहाणपणा शिकवू नकोस. नसेल करायची तुला भाजी तर राहू दे. मी बाहेर जाऊन जेवून येतो “
“जरा अँडजस्ट करायला शिका बाबा. एवढंही काही वाईट बनवत नाहीत त्या स्वयंपाकवाल्या मावशी “
जयंतरावांनी त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलं मग ते कपडे घालून बाहेर निघून गेले. ते हाँटेलमध्ये जेवायला गेलेत हे उघड होतं. वैभवला आता कंपनीतून घरी यायचीच इच्छा होत नव्हती. एकतर घरी आल्याआल्या हातात चहाचा कप हातात ठेवणारी, सोबत काहीतरी खायला देणारी आई नव्हती शिवाय घरी आल्याआल्या वडिलांचा चिडका चेहरा बघितला की त्याचा मुड खराब व्हायचा. त्यांच्या तापट स्वभावामुळे वडिलांबद्दल त्याला कधीही प्रेम वाटलं नव्हतं. जयंतरावांनी नोकरीत असतांना कधी घरात काम केलंच नव्हतं पण निव्रुत्तीनंतरही सटरफटर कामं सोडली तर दिवसभर टिव्ही पहाण्याव्यतिरिक्त ते कोणतंही काम करत नव्हते. बायको होती तोपर्यंत हे सगळं ठिक होतं पण ती गेल्यावरही वैभवच्या अंगावर सगळी कामं टाकून ते मोकळे व्हायचे. वैभवची त्याच्यामुळे चिडचिड व्हायची.
एक दिवस त्याने वैतागून मामाला फोन लावला
” मामा या बाबांचं काय करायचं रे? खुप वैताग आणलाय त्यांनी. आजकाल घरातच थांबावसं वाटत नाही बघ मला “
” हे असं होणार याची कल्पना होतीच मला. तुझ्या वडिलांना मी गेल्या तेहतीस वर्षांपासून ओळखतोय. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे.तुझ्या आईलाही खुप त्रास दिलाय त्यांनी. विचार कर कसा संसार केला असेल तिने. पण इतका त्रास सहन करुनही कधीही तिने आम्हांला नवऱ्याबद्दल वाईट सांगितलं नाही. कधी तक्रार केली नाही.” पदरी पडलं आणि पवित्र झालं “एवढंच ती म्हणायची. तू एकदोन महिन्यातच त्यांना कंटाळून गेला. तिने तेहतीस वर्ष काढली आहेत अशा माणसासोबत. आम्हीही सहन केलंच ना त्यांना.
माझा तर कायम दुःस्वास केला त्या माणसांने. कधी आदराने, प्रेमाने बोलला नाही. उलट संधी मिळेल तेव्हा चारचौघात अपमान करायचा. खुप संताप यायचा. कधीकधी तर ठोकून काढायची इच्छा व्हायची. पण बहिणीकडे बघून आम्ही शांत बसायचो. तुही जरा धीर धर. लवकरात लवकर लग्न करुन घे म्हणजे तुलाही एक प्रेमाचं माणूस मिळेल”
“मी लग्नाला तयार आहे रे पण येणाऱ्या सुनेशी तरी बाबा चांगले वागतील का? की तिलाही आईसारखाच त्रास देतील?”
” हो. तोही प्रश्न आहेच. पण लग्न आज उद्याकडे करावंच लागणार आहे. आता तुही २८ वर्षाचा असशील. मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल. मी असं करतो, मुली बघायला सुरुवात करतो “
“पण तू पाठवलेली स्थळं बाबांना चालणार नाहीत “
” तेही खरंच आहे. पण तुझ्या बाबांचे नातेवाईकही तुझ्यासाठी स्थळं पाहतील असं वाटत नाही “
” बरोबर. बाबांचं त्यांच्याशीही पटत नाही. तूच मुली पहा पण मुलीकडच्यांना सांगून ठेव की ते बाबांना भेटल्यावर तुझ्या ओळखीचा उल्लेखही करणार नाहीत “
“चालेल. तू काही काळजी करु नकोस. मी करतो सगळं व्यवस्थित “
” मामा मुलगी अशी खमकी पहा की तिने बाबांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे “
मामा हसला
” बरोबर आहे तुझं. मनात आणलं तर तीच सरळ करु शकते त्यांना. बघतो तसं “त्याने फोन ठेवला. वैभवला हायसं वाटलं. बहिण गेली तरी मामाने भाच्याशी संबंध तोडले नव्हते.
एक दिवस वैभव संध्याकाळी घरी आला पण घरात शांतता पाहून त्याला आश्चर्य वाटलं.यावेळी त्याचे वडील टिव्हीवरच्या बातम्या बघत बसलेले असत.
“बाबा ss”त्याने हाक मारली.पण उत्तर आलं नाही. बुट काढून तो जयंतरावांच्या बेडरुमकडे गेला.पाहतो तर जयंतराव पलंगाखाली अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते.
“काय झालं?” त्याने विचारलं “पलंगावरुन पडलात का?”
त्यांनी ओठ हलवले. पण तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही.
“बोला ना! काय झालं?”
त्यांनी परत ओठ हलवले. पण घशातून आवाज बाहेर आला नाही.
“बरं ठिक आहे. उठा पलंगावर झोपा “
त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाकडे इशारा केला. वैभवने उजव्या पायाला हात लावून पाहिला. त्यांचा पायजमा वर करुन पाहिला.तिथेही काही जखम नव्हती.
” काही तर झालेलं नाहिये. बरं ठिक आहे. मी तुम्हांला उचलतो “
त्यांच्या काखेतून दोन्ही हात घालून त्याने त्यांना उचललं पण जयंतराव पायच टेकवत नव्हते. मोठ्या मुश्कीलीने त्याने त्यांना पलंगावर बसवलं.
“झोपा आता “
जयंतरावांनी परत एकदा डाव्या हाताने उजवा पाय आणि हाताकडे इशारा केला. वैभवने त्यांच्या उजव्या पायाकडे पाहिलं. तो निर्जीवपणे लटकत होता. वैभव चमकला. एकदम त्याच्या लक्षात आलं आणि तो मुळापासून हादरला. त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला होता. त्यात त्यांची वाचा तर गेली होतीच पण उजवा पाय आणि हात कामातून गेले होते. तो बराच वेळ सुन्नावस्थेत बसून राहिला. हजारो विचार त्याच्या डोक्यात दाटून आले. मग त्याच्या लक्षात आलं. असं बसून चालणार नव्हतं. त्यांना ताबडतोब हाँस्पिटलमध्ये अँडमीट करणं गरजेचं होतं. त्याने अँम्ब्युलन्सला फोन लावला. एका चांगल्या हाँस्पिटलमध्ये अँडमीट केलं. त्याचा संशय खरा ठरला होता. तो पँरँलिसीसचाच अटँक होता.
“डाँक्टर ते बरे होतील का यातून?” त्याने चिंतातूर आवाजात डाँक्टरांना विचारलं
“आपण प्रयत्न करु. पण रिकव्हरीला किती वेळ लागेल आपण सांगू शकत नाही. तुम्हांला आता त्यांची खुप काळजी घ्यावी लागेल. त्यांचं सगळं बेडवरच करावं लागणार आहे. तेव्हा त्यांना स्वच्छ ठेवणं, रोज मालीश करणं, वेळच्या वेळी मेडिसीन देणं या गोष्टी तुम्हांलाच कराव्या लागणार आहेत “
वैभवने मान डोलावली आणि तो विचारात गढून गेला. थोड्या वेळाने त्याने सगळ्या नातेवाईकांना कळवलं. नातेवाईक येतीलही. दोनचार सहानुभूतीचे शब्द बोलतील पण जयंतरावांच्या सेवेसाठी कुणीही थांबणार नाही हे त्याला माहित होतं. मामा आला तेव्हा तो त्याच्या गळ्यात पडून खुप रडला.
“वैभव एखादा माणूस लावून घे त्यांचं सगळं करायला. म्हणजे तू मोकळा रहाशील “
” अशी माणसं खुप पैसे मागतात मामा शिवाय मी घरात नसेन. त्याने घरात चोऱ्याबिऱ्या केल्या तर?”
” ती रिस्क तर आहेच पण पर्याय तरी काय आहे? तुला एकट्याला ते करणं कठीण आहे. आणि पैशांची काही काळजी करु नकोस. मी देत जाईन “
“ज्या बाबांनी तुला आयुष्यभर शिव्या दिल्या त्यांच्या सेवेसाठी तू पैसे देणार?”
” मी तुझ्यासाठी करतोय हे सर्व. तुझं आरोग्य आणि मनःस्वास्थ्य बिघडू नये म्हणून “
वैभव गहिवरला. त्याने परत मामाला मिठी मारली.
पंधरा दिवसांनी तब्येतीत काहीही सुधारणा होत नाही हे पाहून जयंतरावांना घरी पाठवण्यात आलं. वैभवने घरात आल्यावर त्यांना पलंगावर झोपवलं. त्यांच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं. तिथे कोणत्याही भावना त्याला दिसल्या नाहीत. त्याच्या मनात विचार आला ‘या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्यात घालवलं. आज हा असा लाचार होऊन पडलाय. बरी जिरली. आता कुणावर हुकूमत गाजवणार? ती घमेंड, अहंकार यांना कसं कुरवाळणार?
खरंच छान झालं. देवाने छान शिक्षा केली. आता तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून रहाणार. आता मीच कसा तुम्हांला नाचवतो बघा’
त्याने आनंदाने जयंतरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते त्याच्याचकडे पहात होते. मात्र आता त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं. ते वैभवबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं स्मित होतं की वैभवची थट्टा करणारं होतं ते वैभवला कळलं नाही. थोड्या वेळाने त्याला कळलं आणि तो हादरुन गेला. त्या स्मितामागचा अर्थ त्याला कळला होता. ते विजयाचं हसू होतं. विकलांग होऊनही जयंतरावांची सरशी झाली होती. लोकलाजेस्तव का होईना वैभवला वडिलांची सेवा करावीच लागणार होती. त्यांची तब्येत अजून बिघडू नये म्हणून त्यांच्या आरोग्याची जास्तच काळजी त्याला घ्यावी लागणार होती.
वडिल विकलांग आहेत म्हणून त्याच्याशी कुणी मुलगी लवकर लग्न करणार नव्हती. कदाचित ते जिवंत आहेत तोपर्यंत त्याचं लग्न होणं कठीण होतं किंवा मग रुप, शिक्षण, सामाजिक दर्जा विसरुन, अनेक तडजोडी स्विकारुन वैभवला मुलगी निवडावी लागली असती. म्हणजे बायकोबद्दल ज्या ज्या कल्पना त्याने केल्या होत्या, जी जी स्वप्नं रंगवली होती ती पुर्णत्वाला येणं अशक्यच दिसत होतं.
त्या विचारासरशी वैभवचं डोकं तापू लागलं. वडिलांकडे पहात तो संतापाने ओरडला
“झालं समाधान?आयुष्यभर माझ्या आईचा छळ केलात, तिच्या माहेरच्यांचा छळ केलात. आता मीच उरलो होतो तर माझाही छळ सुरु केलात ना? मी आता कामंधामं सोडून फक्त तुमच्याकडेच बघत रहायचं का? माझीही काही स्वप्नं आहेत, काही महत्वाकांक्षा आहेत. त्या सगळ्यांवर मी तुमच्यासाठी पाणी सोडायचं का?…..……”
तो संतापाने ओरडत होता. त्यांच्या दुष्ट वागणुकीचा इतिहास उकरुन काढत होता. जयंतराव बोलू तर शकत नव्हते पण मुलाच्या अशा ओरडण्याने ते घाबरुन गेल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. जोरजोराने बोलता बोलता एका क्षणी वैभवचा तोल गेला आणि तो किंचाळून म्हणाला
“असा माझा मानसिक, शारीरिक छळ करण्यापेक्षा तुम्ही मरुन का नाही गेलात?”
ते ऐकून आधीच भेदरुन गेलेले जयंतराव घशातून विचित्र आवाज काढत ढसाढसा रडू लागले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. बापाला इतकं केविलवाणं रडतांना वैभव आज पहिल्यांदाच पहात होता. त्याच्यातल्या संतापाची जागा हळूहळू करुणेनं घ्यायला सुरुवात केली. ह्रदयाला पीळ पडू लागला. त्याला लहानपणापासूनचे वडील आठवायला लागले. एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे लाड करणारे, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे, त्याला थोडंही काही लागलं की कासावीस होणारे, सायकलवरुन त्याला शाळेत पोहचवणारे, त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करणारे, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवणारे वडील त्याला आठवू लागले. एकदा त्याचा अपघात होऊन तो पंधरा दिवस हाँस्पिटलमध्ये अँडमीट होता तेव्हा दिवसरात्र ते त्याच्याजवळ बसून होते. बायको आणि मेव्हण्याशी ते वाईट वागत असले तरी वैभवशी ते नेहमीच प्रेमाने वागत आले होते.
त्यांच्या तापट स्वभावामुळे वैभव मोठा झाल्यावर दोघा बापलेकांचे थोडेफार खटके उडायचे पण तेव्हा जयंतरावच बऱ्याचवेळा नमतं घ्यायचे. वैभव नागपूरला शिकण्यासाठी निघाला तेव्हा त्याला निरोप देतांना त्यांनी मारलेली मिठी आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी वैभवला आजही आठवत होतं. त्या आठवणींनी वैभव कासावीस झाला. ‘आज वडिलांची वाईट अवस्था झाली म्हणून आपण त्यांच्यावर संतापतोय, ओरडतोय. समजा त्यांच्याऐवजी आपलीच अशी अवस्था असती तर ते असेच आपल्याशी वाईट वागले असते?नाही. आपल्याला असंच मरुन जा म्हणाले असते? शक्यच नाही. दुसऱ्यांशी ते कसेही वागले तरी बाप म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य चोख पार पाडलं. आणि मुलगा म्हणून आपलं कर्तव्य निभावण्याची वेळ आली तर आपण अशी चिडचिड करतोय.
त्यांना सरळ मरुन जा असं म्हणतोय ‘ या विचारासरशी वैभवला आपल्या वागण्याची लाज वाटली. त्याला एकदम गहिवरुन आलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली.
“नका रडू बाबा. नका रडू. मी चुकलो. मी असं बोलायला नको होतं. तुम्हाला माझ्याशिवाय आणि मलाही तुमच्याशिवाय या जगात दुसरं कोण आहे? काही काळजी करु नका मी तुमचं सगळं व्यवस्थित करेन “
त्याने त्यांच्याकडे पाहिलं. ते अजूनही केविलवाणे रडत होते. वैभवला एकदम भडभडून आलं. तो रडू लागला तसं जयंतरावांनी डाव्या हाताने त्याला जवळ ओढलं आणि ते त्याच्या डोक्यावरुन, पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागले.