पाऊस पाऊस, पाणीच पाणी
वळचणीला ओला कावळा ओली चिमणी….
इथे तिथे विसावा शोधू लागले,
घर बांधायाचे राहून गेले…
पाऊस पाऊस, पाणीच पाणी
बाजारी रमलेले नरनारी,
दुकानाच्या आडोशाला उभे राहिले,
विस्मरण छत्रीचे आज जाहले ,
पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले,
हाती धरिल्या पिशव्यांचे ओझे वाटू लागले…
पाऊस पाऊस, पाणीच पाणी
आठवुनी शैशव अपुले, वृद्ध पलंगी दबकून बसले,
गवाक्षातील शिडकाव्याने अंग तयांचे गारठु लागले,
ओढुनी शाल अंगावरी घोटभर चहाची वाट पाहू लागले…..
पाऊस पाऊस, पाणीच पाणी
ओहोळ, नाले पिसाट जाहले,
उन्मत्त होऊनी नदीस मलीन करू लागले…..
पाऊस पाऊस, पाणीच पाणी
गढूळली सरिता
अश्रूभरीत डोळ्यांनी, सागराकवेत जाण्यासाठी आसुसली,
झरझर वाहुनी खळाळत सागरास मिळाली,
सरितेचे अश्रू पिऊनी सागर खारट जाहला,
होता बाष्प जल थेंबांचे पाऊस होऊनी कोसळू लागला……
पाऊस पाऊस, पाणीच पाणी
धांदल गडबड, भिन्न विचार अन् भिन्न गाणी…….