पावसाची छोटीशी सर,
उधळून गेली मातीचं अत्तर!
केले तिने पाण्याचे सिंचन,
अन् थरथरले धरतीचे अंगण!
धरती खालील पक्व बीजांची,
झाली कोवळी तृणपाती ,
सृजनाची ही किमया सारी,
दिसू लागली जागोजागी!
ग्रीष्मातून हा आज अचानक,
ऋतुबदल हा कुणी केला?
उष्ण झळा त्या किरणांच्या,
कुणी शीतल झुळुकीत बदलल्या?
स्वच्छ निळे आकाश जाऊनी
जलघट कसे हे अवतरले?
अन् साऱ्या आसमंती ,
शामल घट हे कुणी पांघरले?
सृष्टीची ही किमया सारी
दिसते मजला क्षणोक्षणी!
अंतर्बाह्य हे मन थरथरते,
मोरपिसाची किमया सारी!
सृष्टी कर्ता हा कुणी अनामिक
दिसत नसे तो द्रुष्टीने ,
पण त्याची सत्ता अनुभवते
मी चराचरातील बदलाने !