“हेsssमी जिंकले ,मी जिंकले” दोन्ही हात हवेत उडवत सुमी थोडा वेळ नाचत बसली.बुध्दीबळाचा पहिला डाव जिंकल्यावर मी जाणून बुजून दोन डाव हरलो होतो हे तिच्या लक्षात आलं नव्हतं.मी डब्यात सोंगट्या भरता भरता तिला विचारलं.
“मग जिंकल्याबद्दल तुला काय हवं?चाँकलेट की आईस्क्रीम?”
“आईस्क्रीम!”
तिच्या त्या निरागस चेहऱ्यावर मोठं हसू फुललं.
“चल मग जाऊ या”
मी गाडी काढली.सुमी माझ्या मागे बसली.तिच्या त्या दोन कोवळ्या हातांनी माझ्या कमरेला मिठी मारली.
आमचं आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मी पैसे द्यायला निघालो तशी सुमी म्हणाली
“सुहासकाका उषा दिदी आणि मनिषा दिदीला पण घ्यायचं का आईस्क्रीम?”
मला त्या छोट्या जिवाचं कौतुक वाटलं.किती प्रेम होतं तिला मोठ्या बहिणींबद्दल!
मी हसलो.तिच्या बहिणींसाठीच नाही तर आईवडिलांसाठीसुध्दा मी आईस्क्रीम घेतलं.झोपडपट्टी आली तसं तिच्या घराजवळ मी तिला उतरवलं.चेहऱ्यावर एक मोठं हसू आणून तिने हात हलवून मला बाय केलं.
तिचं खरं नांव होतं सुमित्रा पण सगळे तिला सुमीच म्हणायचे.गोरीपान,चमकदार बोलके डोळे,उजव्या गालावर खळी आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी सुमी तिच्या आईबरोबर एकदा धुणीभांडी करायला माझ्या घरी आली होती.गोड आवाजातील तिची बडबड ऐकून मी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ती दिसली.पाहताक्षणीच ती मला आवडली.मी तिला घरात बोलवलं.तिला चाँकलेट दिलं.ती खुष झाली.तेव्हा पासून ती माझ्या घरी यायची.मी तिला बुध्दीबळ शिकवलं.कँरम शिकवला.तिच्या वयाच्या मानाने दोन्ही खेळ ती खुप छान खेळायची.
खरं तर दोन मुलींवर मुलगा हवा असतांना मुलगीच झाली म्हणून तिच्या आईने तिला पंधरा दिवस दुध पाजलं नव्हतं.बापाने तर तिला वर्षभर तिला जवळ घेतलं नव्हतं.बरं तरी पैसे नसल्यामुळे त्यांनी सोनोग्राफी केली नव्हती नाहीतर गर्भातच तिचा जीव घेतला गेला असता.थोडक्यात ती नकोशी होती.पण जसजशी ती मोठी होत गेली आणि अगोदरच्या दोन मुलींपेक्षा गोड आणि सुंदर दिसायला लागली,गोड बोलायला लागली तसं आईवडील तिच्याकडे लक्ष द्यायला लागले.सुमी तिच्या आईवर गेली होती.तिची आईही गोरी आणि सुंदर होती.घरच्या गरीबीमुळे तिला सुमीच्या बापाशी लग्न करावं लागलं होतं.सुमीचा बाप बांधकाम मजूर होता.आमच्या बंगल्याला लागूनच असलेल्या सरकारी जागेवरच्या झोपडपट्टीत ते रहायचे. सुरवातीला सुमी माझ्या घरी यायची तेव्हा झोपडपट्टीतल्या अशुध्द आणि उग्र भाषेत बोलायची.मी तिच्या भाषेत आणि बोलण्यात बदल घडवले.
ती आता नगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या इयत्तेत होती आणि मी इंजीनियरींगच्या शेवटच्या वर्षाला.आमच्या दोघांमध्ये बारा वर्षांचं अंतर होतं पण आमचं ट्युनिंग जबरदस्त होतं.शाळेतून आली की एकदा तरी ती माझ्या घरी यायची.कधीतरी मागून येऊन माझ्या गळ्याला मिठी मारायची.आम्ही दोघं मग गप्पा मारायचो,कधी काहीतरी खेळायचो.कधीकधी तिचा बाप दारु पिऊन तिच्या आईला आणि बहिणींना मारहाण करायचा.अशावेळी सुमी घाबरुन माझ्या घरी यायची.मी तिला जवळ घेऊन शांत करायचो.माझ्या घरातील पुस्तकं तिला फार आवडायची.त्यातली चित्रं पाहून अनेक प्रश्नं विचारुन मला ती भंडावून सोडायची.
सुमी चवथी पास झाली आणि मी इंजीनियरींग पुर्ण केलं.शहरात गरीब मुलांसाठी एक नवीनच इंग्लिश मिडीयमची शाळा सुरु झाली.माझ्या मित्राचे वडिल तिथे ट्रस्टी होते.त्यांना भेटून मी सुमीची अँडमिशन तिथे केली.सगळा खर्च शाळाच करणार असल्याने तिच्या आईवडिलांनीही हरकत घेतली नाही.झोपडपट्टीतली,गरीब कुटूंबातली सुमी कडक युनिफाँर्म,टाय,बुट घालून बसने शाळेत जावू लागली.
एकदा रविवारी सकाळी मी पुजा करत असतांना ती आली.माझी आरती झाल्यावर मी तिला प्रसादाची साखर देत असतांना ती मला म्हणाली “सुहासकाका किती छान वाटतं ना पुजा झाली की!पण आमच्या घरी कुणी पुजाच करत नाही.नुसते भांडत असतात.मला तू महालक्ष्मीचा फोटो आणून देशील?मी रोज तिची पुजा करेन”
मला हसू आलं.मी म्हणालो.
“अगं पण लक्ष्मीच का?बाकीचे देव का नको?”
“अरे लक्ष्मीची पुजा केली की ती आम्हांला खुप पैसे देईल.मग आमच्या घरातली भांडणं बंद होतील” मग देवांकडे नजर टाकून म्हणाली.
“सुहासकाका आज तू फुलं नाही वाहीलीस?”
“अगं आज झाडावर फार कमी फुलं होती”
“राहू दे उद्यापासून मी तुला खुप फुलं आणून देत जाईन”
तिने तिचा शब्द पाळला.रोज सकाळी लवकर उठून ती मला खुप फुलं आणून द्यायची.मीही तिला महालक्ष्मीचा फोटो आणून दिला.ती रोज पुजा करु लागली.
मला एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली.संध्याकाळी यायला उशीर व्हायचा.त्यामुळे सुमीची भेट रवीवारीच व्हायची.
एकदा आईबाबा सात दिवसासाठी बंगलोरला माझ्या बहिणीकडे गेले.सुमीला ते कळलं.ती माझ्याकडे आली.
“सुहासकाका तू जेवणाची काही काळजी करु नको.मी देत जाईन तुला डबा करुन”
सुमी आताशी आठवीत होती.म्हणजे साधारण १३-१४ वर्षांची असेल.तिचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं.
“तुला स्वयंपाक येतो?”
“हो मग!आजींनीच(माझ्या आईने)शिकवलाय.काही माझ्या उषा दिदीने शिकवला”
“नको राहू दे.सकाळी कंपनीत जेवण मिळतं.संध्याकाळी हाँटेलमध्ये….”
“अजिबात नाही.मी येत जाईन करायला”
तिच्या हट्टापुढे मला बोलता आलं नाही.ती संध्याकाळी यायची.स्वयंपाक करुन मला जेवायला वाढायची.अगदी आईच्या हाताची चव होती तिच्या स्वयंपाकाला.जेवून मी अगदी त्रुप्त व्हायचो.मी तिलाही जेवायचा आग्रह करायचो.पण आई रागवेल असं म्हणून ती नकार द्यायची.माझं जेवण झालं की ती सगळी भांडी घासून धूवून ठेवायची.
आई परत आल्यावर मी आईला हे सगळं सांगितलं. ती खुष झाली.पण म्हणाली.
“आपण तीला याचे पैसे देऊन टाकूया.तिच्या आईला बरं वाटेल.हे लोक पैशाचे भुकेले असतात रे”
ती आल्यावर आईने तिच्या हातात पाचशेची नोट ठेवली.तिचा चेहरा पडला.ती नोट तिने तशीच आईला परत केली आणि माझ्याकडे पहात म्हणाली.”सुहासकाका पैशासाठी केलं का मी ते?”
“अगं मोबदला म्हणून नाही.बक्षीस म्हणून देतेय.सुहासची तू गैरसोय होऊ दिली नाही त्याबद्दल”
तिच्या डोळ्यात पाणी आलं.काही न बोलता ती निघून गेली.तिला आपण ओळखू शकलो नाही याचं मलाही वाईट वाटलं.
अशातच माझं लग्न ठरलं.आँफिसमधून येतांना सुमी शाळेच्या बसमधून खाली उतरतांना दिसली.मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो.
“सुमी घरी ये.एक आनंदाची बातमी आहे.”
मला वाटलं मागच्या त्या प्रसंगामुळे ती रागात असेल पण नेहमीसारखी गोड हसून तिने मान हलवली.
“अगं माझं लग्न ठरलं” ती घरी आल्यावर मी तिला सांगितलं.
“अरे वा!फोटो दाखव ना मला काकूचा”
मी फोटो दाखवला.
“अरे वा!छान आहे रे दिसायला” मग थोडंसं उदास होत म्हणाली.
“सुहासकाका लग्नानंतर आम्हाला विसरणार नाही ना तू?आई म्हणते लग्न झाल्यावर सगळी मुलं आईवडिलांना विसरतात.मी तर काय झोपडपट्टीतली मुलगी!”
“नाही गं.असा कसा विसरेन मी तुला?तू तर माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना?”
ती खुशीत हसली.
लग्नाच्या सात दिवस अगोदरपासून आईने नातेवाईक येऊ लागले तसं सुमीला कामाला बोलावून घेतलं.मी आईला सांगून सुमीसाठी एक चांगला महागडा पंजाबी ड्रेस आणि तिच्या आईसाठी साडी घ्यायला लावली.लग्नात सुमी उत्साहाने सगळी कामं करत होती.माझ्या मिरवणूकीतही ती नाचली.
लग्नानंतर मी हनिमूनला जाऊन आल्यावर एक दिवस संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसलो असतांना सुमीची मोठी बहिण मनीषा घरी आली.माझ्याकडे पाहून म्हणाली.
“काका सुमीने सात दिवसाच्या कामाचे पैसे मागितलेत”
“काय्यsss सुमीने पैसे मागितलेत?”
मलाच काय आईलाही जबरदस्त धक्का बसला.क्षणभर काय बोलावं ते सुचेना.शेवटी आईनेच तिला विचारलं.
“किती पैसे मागितलेत तिने?”
“सातशे रुपये”
मी मुकाट्याने सातशे रुपये काढून तिला दिले.ती गेल्यावर आई मला म्हणाली.
“बघ किती जीव लावतो तू त्या पोरीला!अगदी आपल्या घरातली समजतोस तिला.काय नाही केलं तू त्या पोरीसाठी?लहानपणापासून लाड करतोय तिचे.आताही लग्नात तिला दोन हजाराचा ड्रेस घेऊन दिला.तिच्या आईलाही साडी घ्यायला लावली.बघ काय परतफेड केली तिने!ती समजते का तुला आपलं?नाही ना?शेवटी तीही झोपडपट्टीच्याच विचारांची निघाली ना?”
मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो.
माझी बायको आदिती तिथंच बसली होती.ती म्हणाली.
“या लोकांशी तेवढ्यास तेवढंच वागावं लागतं.त्यांच्यावर कितीही उपकार करा.आपले पैसे ते कधीही सोडत नाहीत.फार स्वार्थी असतात”
सुमीच्या वागण्याचा आता मलाही राग येऊ लागला होता.मी ठरवलं आता सुमीशी संबंध तोडून टाकायचा.एकदोनदा ती रस्त्यात दिसली पण मी ओळख दाखवली नाही.
दोन दिवसांनी संध्याकाळी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो असतांना सुमी आली.तिचा चेहरा उतरलेला होता.तिला पहाताच माझा राग उचंबळून आला पण मी मनावर संयम ठेवला ती काय बोलते याची वाट पाहू लागलो.ती माझ्यासमोर उभी राहीली.हात पुढे करुन तिने मुठ उघडली.त्यात शंभराच्या नोटा होत्या.
“सुहासकाका हे घे तुझे पैसे”
“आता का परत करते आहेस?तेव्हा मागतांना
लाज नाही वाटली?”आई संतापाने तिला म्हणाली.ते ऐकताच सुमी एकदम रडायला लागली.
”आजी,बाबा दारु पिऊन कामावर जातात म्हणून ठेकेदाराने त्यांना कामावरुन काढून काढलं.घरात खुप अडचण सुरु होती म्हणून सात दिवसाचे पैसे मागण्यासाठी सगळे माझ्या मागे लागले होते.मी नाही म्हणत होते.म्हणून मनीषा दिदी मला न सांगताच तुम्हाला पैसे मागायला आली.मला ते कालच कळलं.मी त्यांच्याशी भांडून पैसे परत घेतले तर आईने मला मारलं.” मग माझ्याकडे वळून म्हणाली.
”सुहासकाका तुलाही वाटलं मी पैसे मागेन असं?माझ्यावर विश्वास नाही तुझा?तुला पण मी मोलकरीण वाटली का रे?”
मला माझी लाज वाटायला लागली.खरंच मी तरी तिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता.मी केलेल्या संस्कारात वाढलेली सुमी असं वागणं शक्यच नाही याची जाण मला असायला हवी होती.माझ्या डोळ्यात पाणी आलं .मी तिला म्हंटलं
”साँरी सुमी माझं जरा चुकलंच”
मी असं म्हणायचा अवकाश,ती येऊन मला बिलगली आणि स्फुंदून स्फुंदून रडू लागली.ही इतकी गोड पोरगी चुकीच्या घरात जन्माला यावी याचं मला दुःख झालं.
सुमी दहावीत गेली.तिला एखादा चांगला क्लास लावून द्यावा असं मला वाटत होतं.पण एकतर तिची आर्थिक स्थिती तशी नव्हती आणि मी माझ्या खर्चाने तिला क्लास लावून नसत्या भानगडी करु नयेत असं घरातल्या सगळ्यांचं मत होतं.शेवटी अभ्यासात काही अडचण आली तर तिने मला विचारावं असं मी तिला सांगितलं.सुमी एकदोन दिवसाआड माझ्याकडे येऊन माझं मार्गदर्शन घेऊ लागली.
दरम्यान माझ्या घरी नवीन चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.त्याच्याशी खेळण्यात माझे दिवस जाऊ लागले.
दहावीच्या रिझल्टच्या दिवशी मी सुमीचा रिझल्ट ऐकण्या साठी मुद्दाम सुटी घेऊन घरी राहिलो.ती पास नक्की होईल यात मला शंका वाटत नव्हती पण तिने चांगले मार्क्स मिळवावेत अशी मला अपेक्षा होती.अकरा वाजले.दारावरची बेल वाजली.मी दार उघडलं बाहेर सुमी उभी होती.मी काही बोलण्याच्या आधीच ती घरात शिरली आणि मला घट्ट मिठी मारुन रडू लागली.बापरे ही नापास झाली की काय या भितीने मी तिला काहीच विचारलं नाही.थोड्या वेळाने तीच सावरली आणि दूर होऊन मला म्हणाली.
” सुहासकाका मी पास झाले”
”अरे वा छान!किती मार्क्स मिळालेत?”
”९९ टक्के” मला एकदम धक्का बसला.विश्वास न बसून मी विचारलं
”काय?किती?किती टक्के म्हणालीस?”
” ९९ टक्के!”
”माय गाँड सुमी काय सांगतेस?खुप छान सुमी खुप छान!अभिनंदन!मनःपुर्वक अभिनंदन!”मी तिचा हात हातात घेऊन हलवला.तशी ती परत रडू लागली.माझेही डोळे आनंदाश्रूंनी भरुन आले.तिला मी खुर्चीत बसवलं.
”आईवडिलांना सांगितलंस?”
”नाही.अगोदर तुझ्याकडेच आले”
”मग जा सांगून ये.आणि हे घे”मी पाचशेची नोट काढून तिला दिली.
”जातांना पेढे घेऊन जा.आजुबाजूच्या लोकांनाही दे”
”सुहासकाका तू शिकवल्यामुळेच हे घडू शकलं.”
”अगं मी कितीही चांगलं शिकवलं असतं आणि तू हुशार नसती तर काहीच घडलं नसतं.तेव्हा आपण ते नंतर बोलू.आणि हो परवाच्या रविवारी माझ्याकडून तुझ्या पुर्ण कुटुंबाला पार्टी.सगळ्यांना घेऊन ये”
ती आनंदाने घरी गेली.मी माझ्या पत्रकार मित्रांना ही बातमी दिली.दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात सुमीची मुलाखत छापून आली.एक झोपडपट्टीतली मुलगी कोणताही क्लास न लावता एवढं यश मिळवू शकते याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं.मी सांगितल्याप्रमाणे सुमीने आपल्या यशाचं श्रेय सातत्यपूर्ण अभ्यासाला आणि आईवडिलांना दिलं.पण हे सांगत असतांना माझ्याकडे बघून तिचे डोळे भरुन येत होते.
रविवारी संध्याकाळी आम्ही हाँटेलमध्ये जेवायला गेलो.आईबाबा मात्र आले नव्हते.प्रतिष्ठित डाँक्टर असलेले बाबा आणि एका काँलेजची प्राचार्या असलेली आई यांना झोपडपट्टीतल्या लोकांसोबत हाँटेलमध्ये जेवायला जाणं त्यांच्या स्टेटसला शोभणारं नाही असं कदाचित वाटलं असावं.
आम्ही हाँटेलमध्ये पोहोचलो.सुमीचे वडिल अजूनपर्यंत पोहचले नव्हते.आम्ही जेवणाची आँर्डर दिली तेव्हा ते आले.त्यांच्या चालण्यावरुनच माझ्या लक्षात आलं की ते दारु पिऊन आले होते.त्यांना पहाताच सुमीसकट तिची आई आणि बहिणी एकदम अस्वस्थ झाल्या.मी प्रसंग ओळखला.चटकन सुमीच्या वडिलांकडे गेलो.त्यांना एका लांबच्या टेबलवर बसवलं.त्यांच्याशी बोलून नाँनव्हेजची आँर्डर दिली.तमाशा न करण्याची त्यांना विनंती केली.नशीब म्हणजे त्यांनी ती मानली.
“दादा तुम्हाला मी खुप मानतो.तुमच्यामुळे आमची सुमी लई हुशार झाली.लई आनंद झाला म्हणून प्यायलो.तुम्हांला मी त्रास देणार नाही.जेवण झालं की मी निघून जाईन”
असं नशेत ते बरळले.मी त्यांना धन्यवाद दिले.
“सुहासकाका मला खुप शिकायचंय रे.खुप मोठं व्हायचंय.माझ्या आईबाबांना या नरकातून बाहेर काढायचंय” वडिलांच्या दशेकडे पहात सुमी बोलली.तिच्या डोळ्यात आईवडिलांबद्दल वाटणारी किंव आणि महत्वाकांक्षा प्रकट होत होती.
“होईल सगळं चांगलं.काही काळजी करु नकोस.”मी म्हणालो तशी तिच्या डोळ्यात अनामिक भीती दाटून आली.
“आमचा समाज फार वाईट आहे सुहासकाका. सरकार एवढ्या सवलती देतं पण कुणीच शिकत नाही.मुलं टगेगिरी करत फिरतात.सगळी व्यसनं त्यांना लागलेली असतात.मुलींना लग्न ही एकमेव महत्वाकांक्षा असते.ज्या मुलींना शिकण्याची इच्छा असते त्यांनाही कुणी शिकू देत नाही.माझं काय होईल माहीत नाही”
प्रश्न गंभीर होता.त्याचं उत्तर काळच देऊ शकणार होता.
“जाऊ दे.त्याचा विचार आपण बारावीनंतर करुया.आता जस्ट एंजॉय युअर सक्सेस”
एवढ्या मोठ्या हाँटेलमध्ये जेवतांना सुमी,तिची आई आणि बहिणी चांगल्याच संकोचल्या होत्या.त्यांची सारखी तारांबळ उडत होती.आजुबाजूचे प्रतिष्ठित लोक पाहून त्या अजूनच घाबरत होत्या.जेवण झाल्यावर वेटरने बिल नेमकं सुमीसमोर आणून ठेवलं.ते पाहून सुमीचे डोळे विस्फारले.कुजबुजल्या स्वरात ती मला म्हणाली
.”सुहासकाका एवढ्या पैशात तर आमचा महिन्याभराचा किराणा होतो रे”
मी तिला समजावत म्हणालो.
“असू दे सुमी.नेहमीनेहमी कुठं येतो आपण हाँटेलमध्ये जेवायला”
सुमी काँलेजला जायला लागली.महागडे क्लासेस लावायची तिची तयारी नव्हती.मी आता कंपनीचा जनरल मँनेजर झालो होतोे. वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तिचा अभ्यास घेणं मला शक्य होणार नव्हतं.पण तिच्या क्लासची फी भरण्याची माझी तयारी होती पण सुमीने त्याला साफ नकार दिला.
सुमी जसजशी मोठी होत होती तसतशी जास्तच सुंदर दिसायला लागली.झोपडपट्टीतच नव्हे तर आमच्या काँलनीतही तिच्याइतकी सुंदर कोणतीही मुलगी नव्हती.पण ही एक नवीनच डोकेदुखी होऊन बसली.काँलेज,काँलनी आणि झोपडपट्टीतली तरुण पोरं तिच्या मागेमागे फिरायची.पाठोपाठ सुमीबद्दलच्या अफवा कानावर यायच्या.कधी सुमी कुणा मुलाबरोबर बगिच्यात फिरतांना तर कुणाबरोबर टाँकिजमध्ये पिक्चरला बसलेल्या बातम्या सगळीकडे पसरायच्या.सुमी असं कधीच करणार नाही याची खात्री असतांनासुध्दा माझं मन अस्वस्थ व्हायचं.एखाद्या फालतू पोराने तिला फसवू नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करायचो.
एकदा सहज मी तिला गंमतीने म्हणालो.
“सुमी आजकाल बरीच मुलं तुझ्या मागे फिरतात असं ऐकलं.तुला कुणी पसंत असेल तर सांग बरं मला”
तशी नाराजीच्या सुरात ती म्हणाली
“सुहासकाका तुही अशा अफवांवर विश्वास ठेवतोस.मी तुला मागेच सांगितलंय मला खुप शिकायचंय.मोठं व्हायचंय.अशा प्रेम,बीम प्रकरणात मला काडीचाही रस नाही.आणि तुझ्या संमतीशिवाय मी कोणतंही पाऊल टाकणार नाही हे लक्षात ठेव”
सुमी बारावीत गेलीे आणि तिची मोठी बहिण उषा झोपडपट्टीतल्याच एका मुलाबरोबर पळून गेली.हा मुलगा नगरपालिकेत होता.दोघांची जात वेगळी असल्याने दोन्ही घरात लग्नाला विरोध होता.लग्नाअगोदरच उषा गरोदर असल्याचं उघडकीला आलं आणि दोन्ही कुटुंबात जबरदस्त भांडणं झाली.मारामाऱ्या झाल्या.एकमेकांविरुद्ध पोलिस कंप्लेंट झाल्या.शेवटी स्थानिक नगरसेवकाने समेट घडवून आणला.सुमीची बारावीची परीक्षा जवळ असतांना तिच्या मधल्या बहिणीचंही प्रेमप्रकरण उघडकीला आलं.तिने तोंड काळं करु नये म्हणून तिच्या वडिलांनी घाईघाईने बीजवराशी तिचं लग्न लावून टाकलं.बहिणींनी दिलेल्या धक्क्यांमुळे तिच्या आईची तब्बेतही आजकाल ठिक रहात नव्हती.त्यामुळे घरची सर्व काम सुमीलाच करावी लागायची.वडिलांचं दारु पिऊन तमाशा करणं रोजचाच नियम झाला होता .एवढ्या सर्व भानगडीत तिचा अभ्यास कसा होत असेल याचीच मला काळजी लागून राहिली होती.शेवटी न रहावून एका चांगल्या क्लासच्या क्रँश कोर्सला ती नाही नाही म्हणत असतांनाही मी तिला पाठवलं.कोर्सची महागडी फी मी भरली.
बारावीचा निकाल लागला.सुमीला ९५ टक्के मिळाले.मला खुप आनंद झाला.सुमीचं कौतुकही वाटलं.या मार्क्सवर भारतातल्या कोणत्याही चांगल्या काँलेजमध्ये तिला प्रवेश मिळत शकला असता.खगोलविषयक कार्यक्रमांना मी बऱ्याचवेळा सुमीला घेऊन गेलो असल्याने तिला एरोनाँटिक्स इंजीनियरींगमध्ये रुची निर्माण झाली होती.मी चौकशी केली. चेन्नईच्या एका काँलेजमध्ये तिला या शाखेत प्रवेश मिळू शकणार होती.सरकारकडून मिळत असलेल्या सवलतींमुळे आर्थिक भारही जास्त पडणार नव्हता.सुमीच्या आईवडिलांची तोही सहन करण्याची परिस्थिती नसली तरी मला तो सहन करणं सहज शक्य होतं.मी ते सुमीला सांगितलं.ती तयार झाली पण एका अटीवर.ती म्हणजे ती नोकरीला लागल्यानंतर मी तिच्या शिक्षणावर केलेला सर्व खर्च ती परत करणार होती.आढेवेढे घेत मी तयार झालो.
एक दिवस आँफिसमधून घरी परतल्यावर आदितीने मला सुमीच्या घरी ताबडतोब बोलावल्याचा निरोप दिला.मनात काळजी घेऊनच मी तिच्या झोपडीवजा घरात गेलो.घरात ४-५पुरुषांसोबत सुमीचे आईवडील बसले होते.भिंतीला लागून सुमी बसली होती.तिचा चेहरा रडून रडून सुजला होता.मी बसलो तसा त्यातला एक जण म्हणाला.
“साहेब तुम्ही आमच्या सुमीला चेन्नईला पाठवताय म्हणे”
“हो.का?”
“अहो मग तिच्या लग्नाचं काय?”
“तिचं इंजीनियरींग झालं,ती चांगल्या नोकरीला लागली की करा ना तिचं लग्न”
मी हसत म्हणालो.
“साहेब तुम्ही कोण लागता तिचे?”एकजण रागाने माझ्याकडे पहात म्हणाला.मी चपापलो.हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे याची मला जाणीव झाली.
“मी कोणी लागत नाही तिचा पण…”
“झालं तर मग!मी तिचा मामा आहे आणि हे दोघं तिचे काका आहेत.आम्हांला तुमच्यापेक्षा जास्त तिची काळजी आहे.मला सांगा.४-५ वर्ष ती चेन्नईला एकटी राहील तर ती काय कुवारी राहील?आणि अशा बिनकुवाऱ्या पोरीशी आमच्या समाजातलं एकतरी पोरगं लग्न करेल का?”
बापरे काय भयंकर माणसं आहेत ही!आपल्या सख्ख्या भाचीबद्दल या माणसाला असं बोलंवतं तरी कसं?
“अहो असं कसं म्हणता?तिथे मुलींच होस्टेल आहे.तिथंलं वातावरण कडक असतं.आणि मला एक सांगा सुमीच्या मोठ्या बहिणीने तुमच्या डोळ्यादेखत काय केलं हे तुम्हांला माहित नाहीत का?”
एक भयाण शांतता तिथे पसरली.सुमीच्या आईने शरमेने मान घातली.
“म्हणूनच आम्हांला सुमीला कुठंही पाठवायचं नाही” एक काका त्वेषाने म्हणाला.
“अहो डोळ्यादेखत त्या पोरीने असं केलं.सुमीला तर काय मोकळं रानच मिळेल.एका पोरीने इज्जत घालवली म्हणून दुसऱ्या पोरीला मोकळी सोडायची काय?ते काही नाही सुमी कुठेही जाणार नाही.तिला जे काही शिकायचंय ते इथेच शिकू द्या”
“तिला जे शिकायचंय ते इथे नाहीये म्हणून तर…”
“साहेब तुम्ही ना आमच्या नात्याचे ना जातीपातीचे.तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्यामध्ये बोलायचा?”
एक काका मला मध्येच थांबवून माझ्याकडे खुनशी नजरेने पहात म्हणाला.आतापर्यंत सुमीचा बाप मान खाली घालून बसला होता.आता त्याला वाचा फुटली.माझ्याकडे पाहून म्हणाला.
“दादा आमच्या समाजात मुलं शिकतच नाही.सुमी इंजीनियर झाली तर तिला इंजीनियर नवरा नको?कुठून आणायचा असा मुलगा?मग सुमीचं लग्न होणार कसं?”
“माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण मला शिकायचंय”सुमी मध्येच ठाम स्वरात बोलली.
“तू चुप बस,तुला काय समजतंय!हा बंगलेवाला साहेब काहीही सांगतो आणि तू त्याचं ऐकते”
मामा फुत्कारत म्हणाला.
“दादा जाऊ द्या तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका”सुमीची आई माझ्याकडे बघत बोलली.
आता मला या अपमानाचा राग येऊ लागला.मी उठून उभा राहिलो.
“ठिक आहे.एवढ्या हुशार मुलीला आयुष्यात पुढे जाऊ द्यायचं नसेल तर माझा नाईलाज आहे.आणि तुमचा निर्णय अगोदरच ठरला होता तर मला कशासाठी बोलावलंत?माझा अपमान करायला?”
एक हुंदका मला ऐकू आला .मी सुमीकडे बघितलं.गुढघ्यात तोंड लपवून ती रडत होती.तिच्या त्या हुंदक्याने माझ्या काळजावर जणू चरा उमटला.वाटलं तिला घेऊन सरळ घरी जावं आणि कायमचं तिथंच ठेवावं.पण त्यामुळे सुमीचीच बदनामी होणार होती.मी स्वतःवर संयम ठेवला.
“तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही.तुम्हांला आम्ही नाही या सुमीने बोलावलंय”
सुमीचा मामा माझ्याकडे जळजळीत नजरेने पहात म्हणाला.या लोकांसोबत वाद घालणं आणि त्यांना पटवून देणं अशक्य असल्याची जाणीव मला झाली.मी हात जोडून म्हणालो.
“ठिक आहे.तुम्हाला जे आवडेल ते करा.फक्त एकच विनंती आहे.सुमीला कमीतकमी इथे तरी शिकू द्या”
आणि मी संतापाने घराबाहेर पडलो.घरी येता येता जाणीव झाली की या लोकांनी मला साधं पाणी सुध्दा विचारलं नव्हतं.हीच सुमीची आई जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा तेव्हा आई किंवा माझी बायको तिला चहा पाजल्याशिवाय सोडायची नाही.सुमीचा बाप कितीतरी वेळा आजारी पडायचा.त्याच्या आजारपणात मी कायम आर्थिक मदत केली होती.गरिबाला माणूसकी असते असं म्हणतात.इथे तर माणूसकी सोडाच,माझ्याबद्दल वाटणारा तिरस्कारच त्यांच्या वागण्याबोलण्यातून ओसांडत होता.
सुमीने सायन्स काँलेजला प्रवेश घेतल्याचं कळलं.चला एवढी तरी माझी विनंती मान्य केली त्यांनी.त्या प्रसंगानंतर सुमीची आणि माझी भेट दुर्मिळ झाली.या दरम्यान मला दुसरा मुलगा झाला.कंपनीने काही जागतिक काँट्रॅक्ट्स् घेतले होते.त्यानिमित्ताने माझ्या वारंवार विदेशवाऱ्या होऊ लागल्या.संसार आणि नोकरी यात मी गुरफटून गेलो.या सगळ्या गडबडीत वर्ष कसं उलटून गेलं तेच कळलं नाही.सुमी आता सेकंड इयरला होती.
एक दिवस आँफिसातच सुमीचा फोन आला.
“सुहासकाका मला अर्जंट तुला भेटायचंय”
“का गं?”
“सुहासकाका माझे आईवडील माझं लग्न ठरवताहेत”
तिचा आवाज रडवेला झाला होता.
“काय?अगं तू तर आताशी १८ वर्षाची असशील.पण इतक्या लवकर का?”
“तेच तर तुझ्याशी बोलायचंय.केव्हा भेटशील?”
“आज संध्याकाळी मी लवकर घरी येतो.मग बोलू आपण”
“हो चालेल.मी येते”.
संध्याकाळी ती घरी आली.तिचा चेहरा पडलेला होता.
“पण अशी अचानक त्यांना तुझ्या लग्नाची घाई का झाली?”
“मागच्या महिन्यात झोपडपट्टीच्या दादाच्या पोराने माझा हात धरला.पिक्चरला चल म्हणाला.मी त्याच्या थोबाडीत मारली.खुप भांडणं झाली.तेव्हापासून माझे आईवडील माझ्यासाठी स्थळं पहात होते.एक स्थळ त्यांना पसंत पडलंय”
“बापरे फार भयंकर आहे हे!पण तू मला सागितलं का नाही?बाबांची एस.पी.साहेबांशी चांगली मैत्री आहे.त्यांना सांगून आपण त्या दादाला आणि त्याच्या पोराला चांगला धडा शिकवला असता.”
“तुला किती त्रास द्यायचा सुहासकाका!मागे माझ्यामुळे तुला किती अपमान सहन करावा लागला”
“बरं ते जाऊ दे.कुठला मुलगा आहे?काय करतो?”
तिने एक फोटो पुढे केला.काळाभडक गाँगल घातलेल्या एका थोराड माणसाचा फोटो होता तो.चेहऱ्यावर कमालीचा उर्मटपणा होता.बापरे गोड ,सुंदर सुमीसाठी हा कोण राक्षस पाहिला होता तिच्या आईवडिलांनी!
” फार मोठा वाटतो गं हा वयाने!”माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले.ती अधिकच चेहरा पाडून म्हणाली.
“माझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे”
“कायssबापरे!आणि तुला आवडला?”
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
“सुहासकाका मला इतक्यात लग्नच नाही करायचंय.मला खुप शिकायचंय,मोठं व्हायचंय.तू माझ्या आईवडिलांना समजावून सांगशील?”
मी विचारात पडलो.माझा अनुभव वाईटच होता.पण सुमीसाठी काहीतरी करावं लागणारच होतं. नाहीतर एका हुशार मुलीचं टँलेंट अक्षरशः मातीमोल होणार होतं.
“मी तुझ्या घरी काही येणार नाही.आणि तुझ्या वडिलांशीही बोलण्यात अर्थ नाही.ते तुझ्या काकामामाला बोलावून माझा अपमान करतात.मात्र तुझ्या आईला समजावता येईल.शेवटी मुलीचं मन आईलाच कळतं असं म्हणतात.तेव्हा तुझ्या आईला पाठवून दे उद्या.पाहू प्रयत्न करुन”
तिच्या चेहऱ्यावर आशेचे किरण उमटले.ती गेली पण माझं मन शंकाकुशंकांनी भरुन आलं.
दुसऱ्या दिवशी तिची आई आली.
“दादा तुम्ही बोलवलं?”
“मावशी इतक्या लवकर का करताय सुमीचं लग्न?तिची शिकायची इच्छा आहे.कमीतकमी ग्रँजुएट तर होऊ द्या तिला!”
“दादा तुमचं म्हणणं खरं आहे पण लोकांच्या घाणेरड्या नजरांपासून कसं वाचवू तिला सांगा.
मागे त्या पोराने तिचा हात धरला उद्या तिला पळवून नेली आणि तिच्यासोबत काही बरंवाईट …”तिचा कंठ दाटून आला.मी तिला पाणी प्यायला दिलं.
“दादा तुम्ही पहाता सातसात आठआठ वर्षाच्या चिमण्या पोरींना सोडत नाही हे राक्षस.माझी सुमी तर तरणीताठी आणि सुंदर आहे.सुमीचा बाप नेहमी दारु पिऊन पडलेला असतो.पोरगं असतं तर काहीतरी हिंमत आली असती.मी एकटी कशी सांभाळू तिला?”
मी निशब्द झालो.काय बोलावं ते कळेना.
“पण मावशी मुलगा तर चांगला पहा.बारा वर्षांनी मोठा आहे तो सुमीपेक्षा.”
“मग काय झालं?माझ्यात आणि सुमीच्या बापातही बारा वर्षांचं अंतर आहे.हा! दिसायला मुलगा एवढा खास नाही पण दादा मुलगा बांधकामाचा ठेकेदार आहे.चांगली कमाई आहे.स्वतःचं घर आहे.चारचाकी गाडी आहे.दोन फटफट्या आहे.अजून काय पाहिजे?सुखात राहील माझी सुमी तिथे.तिच्या बहिणींपेक्षाही जास्त सुखात!”
मी चुप बसलो.त्या गरीब,अडाणी बाईच्या लाँजिकपुढे माझी हार झाली होती.
“पहा बुवा. सुमीची काळजी वाटते म्हणून तुम्हांला बोलवलं”
“समजतं दादा ते मला.लई केलं तुम्ही सुमीसाठी.म्हणून तर हिऱ्यासारखी चमकतेय माझी सुमी.पण दादा आमचं आयुष्य तुमच्यासारख्या बंगलेवाल्या लोकांपेक्षा लई वेगळं असतं.तुम्हाला नाही कळणार आमच्या अडचणी!”
ती गेली.मी तिला समजवण्याऐवजी तीच मला जीवनतत्व समजावून गेली.
सुमीच्या लग्नाला आम्ही सगळेच गेलो.एका शाळेच्या आवारात मंडप टाकला होता.लग्नाला खुप गर्दी होती.उन्हाळ्याचे दिवस.अंगाची लाही लाही होत होती.मंडपात एकही पंखा नव्हता.बसलेले सगळे घामाघुम झाले होते.अकराचं लग्न होतं पण नवरदेवच दिड वाजता मिरवणूकीला निघाला.नवरदेवाचे मित्र पिऊन तर्र झाले होते.मिरवणूक निघाली तसं मंडपातील उपस्थित लोकांची पंगत मांडल्या गेली.मी एकाला लग्न केव्हा लागणार याबद्दल विचारलं तेव्हा त्याने ‘दोन तास तरी मिरवणूक परत येणार नाही.त्यानंतर लग्न लागेल.तुम्ही जेवून घ्या’ असा सल्ला दिला.ते ऐकून आईबाबा निघून गेले.लग्नाअगोदर जेवण प्रशस्त वाटेना म्हणून मी आणि आदिती थांबून राहिलो.साडेतीनला मिरवणूक परत आली.लग्नासाठी वधूवरांना स्टेजवर बोलवण्यात आलं.सुमी आली.नववधूच्या रुपात अतिशय सुंदर आणि गोड दिसत होती.पण तिच्या चेहऱ्यावर चांगलाच उदासपणा जाणवत होता.सूमीच्या तुलनेत तिचा नवरा चांगलाच थोराड दिसत होता.तिला तो शोभतही नव्हता.मला खुप वाईट वाटलं.
वरवधू स्टेजवर आले.मला वाटलं आता लग्न लागेल पण सुमीच्या समाजाच्या नेत्यांनी भाषणं सुरु केली.नंतर राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी माईक हातात घेतला.दोन महिन्यांनी निवडणूका होत्या.आपणच कसे गरीबांचे कैवारी हे सांगण्याची त्यांच्यात चढाओढ लागली.झोपडपट्टीतल्या मुलीचं लग्न हा जणू त्यासाठीचा मोठा प्लँटफाँर्म होता.अनायसे पब्लिक जमली होती.त्याचा ते फायदा करुन घेत होते.हे सगळं सुरु असतांना सुमीची नजर कुणाला तरी शोधत होती .तो मी तर नव्हतो ना?
अखेरीस लग्न लागलं तेव्हा चार वाजून गेले होते.मला का कुणास ठाऊक गहिवरुन आलं.पाच वर्षांची असतांनापासूनची माझ्यासोबत खेळणारी,प्रत्येक बाबतीत माझा सल्ला घेणारी सुमी डोळ्यांसमोर तरळून गेली.माझी ही अवस्था आदितीने जाणली असावी.माझा हात दाबून ती मला म्हणाली.
“जास्त इमोशनल होऊ नका.कोणी लागत नाही तुमची ती”
तिचंही म्हणणं खरंच होतं.
सुमीला आहेर देण्यासाठी आम्ही स्टेजवर गेलो.माझ्या हातात पाच हजार रुपये घातलेलं पाकिट होतं.घरच्यांना मी पाचशे रुपये टाकतोय असं खोटंच सांगितलं होतं.सुमीजवळ पोहचल्यावर तिने माझा आणि आदितीचा परीचय करुन दिला.नमस्कारासाठी ती दोघं खाली वाकताहेत तोच ‘आमदार साहेब आले, बाजुला सरका,त्यांना वधुवरांना आशिर्वाद देऊ द्या’ असा गलका झाला आणि आम्ही बाजुला ढकलल्या गेलो.मी कसंबसं सुमीच्या हातात आहेराचं पाकिट कोंबलं.आणि स्टेजच्या खाली उतरलो.जेवणाच्या पंगती परत सुरु झाल्या होत्या पण साडेचार झाले होते.जेवायची इच्छा पार मरुन गेली होती.
चारपाच दिवसांनी आँफिसमध्ये सुमीचा फोन आला.
“सुमी मजेत आहेस ना?कशी वाटतात सासरची मंडळी?”
ती काही बोलायच्या आत मीच बोलायला सुरुवात केली.
“ठिक आहे.अजूनतरी पाहुणेच आहेत घरात.पुढे बघू कसे वागतात ते!सुहासकाका तू त्या दिवशी मला निरोप देईपर्यंत थांबला का नाहीस?मी तुलाच शोधत होते.मला आशिर्वाद घ्यायचे होते तुझे.इतकी परकी झाले का रे मी?”
ती रडत असल्याचं मला जाणवलं.
“तसं नाही सुमी.निरोप द्यायला नात्यातलीच माणसं असतात.मी तुझ्या ना नात्याचा ना जातीचा.मी तिथे थांबलेला तुझ्या नातेवाईकांना आवडलं नसतं म्हणून थांबलो नाही.”
“ते कोणीच नाहीत माझ्यासाठी!त्यांनी कधीच माझं हित बघितलं नाही.माझा खरा हितचिंतक तूच होतास सुहासकाका.तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून खुप रडायचं होतं रे मला”
मला एकदम गहिवरुन आलं.डोळ्यातून कधी अश्रू वाहू लागले ते कळलंच नाही.
“जाऊ दे सुमी.झालं गेलं विसरुन जा”मी स्वतःला सावरुन तिला म्हणालो.” नव्याने आयुष्याला सुरुवात कर.मिळून मिसळून रहा.आयुष्य ही तडजोडच असते हे लक्षात ठेव.”
“मी प्रयत्न करेन सुहासकाका.पण सगळं मनाविरुद्ध घडल्यामुळे फार अवघड वाटतंय रे.आपल्या सुमीचा संसार पहायला तू येशील ना?”
“जरुर येईन सुमी.काही प्राँब्लेम असले तर मला जरुर कळव”
“माझं मन मोकळं करायला मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे सुहासकाका!बरं ठेवते कुणीतरी हाक मारतंय”
सुमीचं लग्न झाल्यानंतर तीनच महिन्यात सरकारने सरकारी जागेवरची ती झोपडपट्टी उठवली.तिथल्या रहिवाशांना शहराबाहेर घरं बांधून दिली.सुमीचे आईवडीलही तिकडे निघून गेले.झोपडपट्टी उठली तसा काँलनीतल्या उच्चभ्रू लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.आतापर्यंत एकदम कमी असलेल्या प्लाँटस् आणि घरांच्या किंमती प्रचंड वाढून गेल्या.त्यामुळे सगळे खुष होते. पण या झोपडपट्टीतल्या लोकांनी कधी काँलनीतल्या रहिवाशांना त्रास दिला नव्हता उलट इथूनच कोणत्याही कामाला स्वस्तात मजूर,धुण्याभांड्यासाठी बायका मिळत होत्या.लग्न वगैरेसारख्या मोठ्या समारंभात झोपडपट्टीतले तरुण स्वतःहून मदत करायचे.अंत्यविधीला तर हे तरुण आपला कामधंदा सोडून सामानाची जुळवाजुळव, स्मशानात लाकडांची,राँकेलची व्यवस्था कर अशी कामं स्वखुशीने करायचे.जातपातधर्म अशावेळी कुणी बघत नसत.अंत्ययात्रेला तर ही गर्दी असायची.
झोपडपट्टी वरुन येताजाता बायकांची भांडणं,मोठमोठ्या आवाजातली गाणी ऐकू यायची.काळीसावळी गुटगुटीत पोरं रस्त्यावर खेळत असायची.दिवाळी असो, ईद असो की डाँ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दणक्यात साजरी व्हायची.दसरा,संक्रांतीला माझ्या घरी चाँकलेट्स मिळतात म्हणून शंभरदिडशे मुलं माझ्या घरी सोनं आणि तिळगुळ वाटायला यायची.सकाळसंध्याकाळ झोपडपट्टीतून येणाऱ्या मसाल्याच्या आणि भाज्यांच्या खमंग वासाने भुक खवळून उठायची.
या झोपडपट्टीमुळे एक प्रकारचा जिवंतपणा आमच्या काँलनीत होता.आता एक विचित्र शांतता पसरली होती.या झोपडपट्टीच्या जागी रिकामा चौकोन पाहून मला सुमीची आठवण यायची आणि गहिवरुन यायचं.
सुमीचे अधूनमधून फोन यायचे.मी मात्र तिला फोन करायला टाळायचो.मी तिच्या नवऱ्याच्याच वयाचा होतो.उगीच संशयाचं बीज रोवल्या जाऊ नये यासाठी माझी धडपड असायची.फोनवर सुमी मी ठीक आहे,आनंदी आहे असं सांगायची पण ती पुर्वीसारखी मोकळं बोलत नाही हे माझ्या लक्षात आलं होतं.अर्थात कोणतेही नातेसंबध नसलेल्या पुरुषाशी सविस्तर बोलणं एका विवाहितेसाठी धोकादायक असतं हे मी जाणून होतो.
पाचसहा महिन्यांनी सुमीचे वडिल वारल्याची बातमी आली.सातत्याने दारु प्यायल्यांने त्यांचं लिव्हर खराब झालं होतं त्यामुळे या बातमीने मला धक्का बसला नाही.अंत्यसंस्काराला मी गेलो तेव्हा सुमी ओझरती नजरेस पडली.निस्तेज दिसत होती.अर्थात कसेही असले तरी ते तिचे वडिल होते त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख तिला होणारच होतं.
दिवस सरकत होते.माझा मोठा मुलगा आता नर्सरीत जाऊ लागला.धाकटा आता घरात चालायला शिकला होता.आई निव्रुत्त झाली होती.वडिलही आता दवाखाना असिस्टंटसवर सोपवून यायचे.इमर्जन्सी असेल तरच दवाखान्यात जायचे.
सुमीच्या लग्नाला आता दिड वर्ष झालं होतं.एव्हाना गुड न्यूज यायला हवी होती.पण गेले कित्येक महिने सुमीचा फोन नव्हता.त्यामुळे काही कळत नव्हतं.सुमी प्रकरण माझ्या आयुष्यातून संपलं असंच मी मानायला लागलो होतो.
एका रविवारी दुपारी मी घरी पुस्तक वाचत बसलेलो असतांना बेल वाजली.दार उघडलं तर एक निस्तेज चेहऱ्याची बाई उभी होती.पहिल्यांदा ती कोण हे माझ्या लक्षातच नाही आलं.आल्यावर मी एकदम ओरडलो.
”सुमी तू?बापरे काय दिसते आहेस!ये आत ये”
ती आत आली आणि आल्याआल्या मला घट्ट मिठी मारुन रडायला लागली.तिच्या सांत्वनासाठी मी तिच्या पाठीवर हात फिरवला तशी ती जोरात कण्हली.मी काय झालं म्हणून विचारलं तशी ती वळली आणि पाठीवरचा पदर तिने बाजूला केला.बापरे तिच्या पाठीवर अनेक रक्ताळलेले व्रण होते.
”काय आहे हे सुमी?”मी चिंतातूर होऊन विचारलं
”मारलं मला,बेल्टने मारलं”ती रडतरडत म्हणाली.
”कुणी?कुणी मारलं तुला?”
”नवऱ्याने,माझ्या नवऱ्याने मारलं”
संतापाची एक तिडीक माझ्या डोक्यातून गेली.मी तिचा चेहरा माझ्याकडे वळवला.
”तू अगोदर बस.मग आपण शांततेत बोलू”
तिने मान डोलावली.तेवढ्यात माझं लक्ष तिच्यामागे असलेल्या तिच्या आईकडे गेलं.तीसुद्धा पदराने डोळे पुसत होती.मी तिलाही बसायला सांगितलं.तेवढ्यात आदिती आणि आई बाहेर आल्या.मी आदितीला पाणी आणायला सांगितलं.त्या पाणी प्यायल्यावर मी म्हंटलं
“हं आता सांगा बरं सविस्तर काय झालं ते!”
त्या दोघींनी जे सांगितलं ते भयंकर होतं.सुमी लग्न करुन गेली आणि तिला कळलं की तिच्या नवऱ्याचं अगोदरच एक लग्न झालं होतं.ही गोष्ट सुमीच्या काका आणि मामा,जे मध्यस्थ होते, दोघांनाही माहित होती पण त्यांनी सुमीच्या आईवडिलांपासून लपवून ठेवली होती.त्याबदल्यात त्यांना सुमीच्या नवऱ्याकडून भरपूर पैसे मिळाले होते.सुमीचा नवरा बाहेरख्याली होता.त्याने एक बाईही ठेवली होती.तो सतत तिच्याकडेच पडलेला असायचा.त्याला इतरही व्यसनं होती.मुलबाळ होत नाही म्हणून त्याने पहिल्या बायकोला घटस्फोट न घेताच टाकून दिलं होतं.तो तिला नियमित पैसे पाठवत होता.सुमीशी लग्न झाल्यावर त्याने ते पैसे पाठवणं बंद केलं.त्याचा राग येऊन ती सुमीच्या सासरी भांडायला आली तेव्हा हे भांडं फुटलं.सुमीने याचा जाब नवऱ्याला विचारला.त्याचा राग येऊन त्याने सुमीला मारलं.सुमी तात्काळ माहेरी आली.आईवडील, मध्यस्थांना घेऊन तिला परत सासरी घेऊन गेले.जावयाला समजावलं.सुमीचा संसार सुरु झाला पण नवऱ्याच्या घाणेरड्या वागणूकीने सुमी रोजच मरत होती.तिची सासू,नणंद आणि दिर तिलाच छळायचे.खायलाप्यायला मिळतंय,चांगलेचुंगले कपडे मिळताहेत तर सुमीला नवऱ्याला बोलायची गरजच काय असं त्यांचं म्हणणं होतं.एक दिवस घरी कुणी नसतांना तिच्या दिराने तिच्यावर हात टाकायचा प्रयत्न केला.सुमीने आरडाओरड करुन शेजाऱ्यांना एकत्र केल्यावर त्याने उलट कांगावा केला की ‘ सुमीला नवऱ्याचं सुख मिळत नाही म्हणून ती मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती.मी विरोध केला तर ती तमाशा करतेय’.सुमीच्या नवऱ्याला हे कळल्यावर भावाला रागावण्याऐवजी त्याने सुमीलाच मारहाण केली.सुमीने हा प्रकार माहेरी कळवू नये म्हणून त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला तो शेवटपर्यंत तिला परत केला नाही.शिवाय घरच्या सर्वांना सुमीला त्यांचा मोबाईल वापरु न देण्याची सक्त ताकीद देऊन ठेवली.अशा रितीने सुमीचा सर्व जगाशी त्याने संपर्कच तोडून टाकला.सुमीचे वडील वारले तेव्हा ती संधी साधून ती मला भेटणार होती.पण तिच्यावर नजर ठेवायला त्याने आई आणि बहिणीला पाठवलं होतं त्या तिला कुठेही हलू देत नव्हत्या.त्यानंतर लग्नाला एक वर्ष होऊनही सुमीला दिवस का जात नाही याची चर्चा होऊन सुमीचा छळ होऊ लागला.इकडे पळून येण्याच्या एक दिवस अगोदर सुमीच्या नवऱ्याने तिला बेल्टने मारलं होतं.
सुमीची छळकथा ऐकून मी सुन्न झालो. माझ्या डोक्यात आता संताप शिरु लागला.जवळजवळ ओरडतच मी तिच्या आईला म्हणालो.
”एवढ्या हुशार,स्काँलर मुलीला अशा नरकात ढकलून आता चांगलाच आनंद मिळत असेल नाही तुम्हाला!ह्यापेक्षा ती बिनलग्नाची राहीली असती तर ते परवडलं असतं.केला ना सत्यानाश तिच्या आयुष्याचा !” तिची आई मान खाली घालून रडू लागली.एकदम आठवून मी सुमीला विचारलं.
”सुमी तुझ्या बहिणींना हे कळलं नाही का?त्यांनी तुझ्यासाठी काहीच कसं केलं नाही?”
त्याचं उत्तर तिच्या आईने दिलं.
”दादा आमच्या समाजात बायकोला मारणं मर्दपणाचं लक्षण मानलं जातं.जे पैसेवाले असतात ते दोन दोन लग्न करतात.बाई ठेवतात.सुमीच्या बहिणींचे नवरेही त्यांना मारतात.पण ते गरीब आहेत म्हणून बाई ठेवत नाहीत.सुमीच्या बहिणीही खमक्या आहेत.सुमीचा नवरा जे करतो त्या साधारण गोष्टी असतांना त्या कशाला लक्ष देतील?पण सुमीची गोष्ट निराळी आहे.तुमच्यामध्ये राहून आणि इंग्रजी शाळेत शिकून ती स्टँडर्ड झाली पण तेवढीच लेचीपेचीही झाली .तिच्या बाबतीत हे घडायला नको होतं”
ते लाँजिक ऐकून मी परत एकदा सुन्न झालो.
”पण मग आता करायचं काय?सुमीने परत तिच्या सासरी जावं असं तुमचं म्हणणं आहे की काय?”
”फारकत घेऊन द्या दादा तिला.ती तिथे टिकणार नाही.एकदिवस जीवाचं बरंवाईट करुन घेईल ती”
आणि ती एकदम रडू लागली.रडतरडता बोलू लागली.
”आता ही तरणीताठी पोर कशी सांभाळू मी दादा?कोण करेल तिच्याशी लग्न?लोकांची धुणीभांडी करुन माझं मी कसंतरी भागवते.हीचं कसं भागेल?”
आपल्या आईला आपण जड झालोय हे ऐकून सुमीही रडू लागली.ते पाहून मी ठामपणे निर्णय घेतला.
”मावशी तुम्ही काही काळजी करु नका.सुमीच्या लग्नाचं मी पाहीन.पण तुमच्या नातेवाईकांचं काय?ते काय म्हणतील?”
”खड्ड्यात गेले ते नातेवाईक!”ती त्वेषाने म्हणाली “काय भलं केलं त्यांनी सुमीचं?माझ्या सख्ख्या भावाने आणि दिराने आम्हांला फसवलं.सुमीचे एवढे हाल करत होते तिचे सासरचे.कधी गेला कुणी नातेवाईक समजावयाला?सगळे दूरुन तमाशा बघत होते.ते काही नाही दादा.सुमीला तुमच्यावर सोपवली.तुम्हीच आता तिचे माय बाप”
”ठिक आहे मग अगोदर तिच्या नवऱ्याला आपण धडा शिकवू”मी निग्रहाने म्हणालो.
त्या गेल्यावर मी माझ्या वकीलमित्राशी बोललो.मित्राने मला या भानगडीपासून दूर रहाण्याचा सल्ला दिला.”नवराबायकोची नाती फार क्लिष्ट असतात.कोर्टात केस गेल्यावर सुमी बदलली,नवऱ्याला सोडायचं नाही म्हंटली तर तू तोंडावर आपटशील.तू पिक्चरमध्ये आलास तर तिच्या नवऱ्याचा वकील तुझे आणि सुमीचे अनैतिक संबंध आहेत असं म्हणायलासुध्दा कमी करणार नाही.तुला काही करायचंच असेल तर सुमी आणि तिच्या आईला पुढे कर.तू फक्त मार्गदर्शक रहा.फार सावधतेने पाऊल टाक”
मला त्याच्या सल्ल्याने धक्का बसला.मी वडिलांशी बोललो.एस.पी.त्यांचे मित्र होते.आम्ही भेटायला गेलो.त्यांनी सर्वात अगोदर सुमीतर्फे तिच्या नवऱ्याविरुध्द पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला सांगितली.मदतीचं आश्वासनही दिलं.
मी सुमीला महिला दक्षता समितीकडे पाठविलं.त्यांनीही मदतीचं आश्वासन दिलं.
सगळं समीकरण जुळलं आणि सुमीच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली.सुमीला आर्थिक मदत व्हावी म्हणून मी तिला एका माँलमध्ये महिना पाच हजाराची नोकरी लावून दिली.वडिलांनी सुमीची स्त्रीरोगतज्ञाकडून शारीरिक तपासणी करुन घेतली.तिच्यात कोणताही दोष नव्हता.याचा अर्थ तिच्या नवऱ्यातच दोष होता.कोर्टात केस उभी राहीली.पोलिसांनी सुमीच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोलाही साक्षीला बोलवलं. सगळे फासे योग्य रितीने पडले आणि सुमीला सहा महिन्यातच घटस्फोट मिळाला.सुमीच्या नवऱ्याला सजा झाली.
मी सुमीचं नांव अनेक वधूवर मंडळात नोंदवलं होतं.पण यश येतं नव्हतं.घटस्फोटिता आणि झोपडपट्टीची पार्श्वभूमी यामुळे कुणी तयारी दाखवत नव्हतं.
एक दिवस अचानक माझ्या दुरच्या नात्यातल्या आतेभावाची हेमंतची आठवण झाली.सातारा जिल्ह्यातल्या एका गावी तो आणि आत्या दोघंच रहात होते.शंभर एकर बागायती शेती होती.वर्षाला १०-१२ लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं.दोन ट्रँक्टर होते.एक कार होती.गावात मोठं घर होतं.तो स्वतः अँग्रीकल्चरचा पदवीधर होता.एकूलता एक होता.देखणा होता.निर्व्यसनी होता. पण फक्त शेती करतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं.शहरातल्या मुली खेड्यात यायला तयार नव्हत्या आणि खेड्यातल्या मुलींना पुण्यामुंबईतला दहा हजाराची का असेना नोकरी करणाराच मुलगा हवा होता.
आज तो बत्तीस वर्षाचा होता.माझ्या वडिलांनी सुध्दा त्याच्यासाठी अनेक स्थळं आणली होती.पण व्यर्थ.त्याच्या लग्नाच्या काळजीने आत्या वारंवार आजारी पडायची.मी हेमंतचा विषय घरात काढला.पण जुन्या विचारांची आत्या सुमीसारख्या वेगळ्या जातीच्या,घटस्फोटित आणि झोपडपट्टीत रहाणाऱ्या मुलीला कधीही सुन म्हणून स्विकारणार नाही असं सगळ्यांचं मत पडलं.मी मात्र एकदा चान्स घ्यायचा ठरवलं.मी आत्याकडे गेलो.जातांना सुमीचा एक सुंदर फोटो सोबत घेऊन गेलो.सुमीबद्दल माहिती देताच आत्या माझ्यावर उखडलीच.’हेमंत काय वाटेवर पडलाय का की अशी टाकावू मुलगी त्याने करावी’असा तिचा प्रश्न होता.मी सुमीचा फोटो तिला आणि हेमंतला दाखवला.हेमंतला सुमी आवडली.पण आत्याने फोटो फेकून दिला.मी आत्याला म्हंटलं”ती मुलगी जरी झोपडपट्टीतली असली तरी तिच्यावर संस्कार आपल्या घरातले आहेत.तिचं नशीब वाईट की तिने चुकीच्या घरात जन्म घेतला आणि अयोग्य ठिकाणी तिचं लग्न करुन देण्यात आलं.त्यात त्या बिचारीचा काय दोष?” मग मी सुमीची पुर्ण कहाणीच सांगितली. ती ऐकून तिच्या वागण्यात सौम्यपणा आला.पण तरी ती म्हणाली.”ते सगळं ठिक आहे रे पण मी माझ्या एकुलत्या एक मुलासाठी घटस्फोटित आणि झोपडपट्टीतली मुलगी का करायची?गावात आपल्याला मान आहे.गावातले लोक काय म्हणतील?नाही जमणार.आणि या विषयावर आता वाद नको” हेमंत हिरमुसला.पण आत्याचं म्हणणंही चुकीचं नव्हतं.मी उदास होऊन परतलो.
या घटनेला एक महिना उलटला.एक दिवस हेमंतचा फोन आला.
”दादा अरे आई तयार झालीय लग्नाला.त्या मुलीचं लग्न तर झालं नाही ना?”
”अरे वा छान बातमी दिलीस.नाही त्या मुलीचं लग्न नाही झालं.पण आत्या तयार कशी झाली.?”
”अरे या महिन्यात तीन स्थळं आली होती पण माझं वय जास्त म्हणून त्यांनी नकार दिला.खरं तर तो बहाणाच होता.शेतकरी नवरा कुणालाच नकोय आजकाल.मग मी आईच्या गुरुंना ही गोष्ट सांगितली.त्यांनी आईला समजावलं.मुलीच्या फोटोवरुन ही मुलगी आमच्यासाठी खुप भाग्यवान ठरेल असं आईला सांगितल्यावर आई तयार झाली.पण दादा ती मुलगी तयार आहे ना?”
”काळजी करु नको.तिचा माझ्यावर खुप विश्वास आहे.मी तिला तुझा फोटो दाखवला पण तिने न पहाताच तयार असल्याचं सांगितलं.सुहासकाका तू जे करशील ते चांगलंच करशील असं मला ती म्हणाली.चला कधी येऊ बोलणी करायला?”
हेमंत हसला.
दोन महिन्यांनी सुमी आणि हेमंतचं लग्न हेमंतच्या गावी दणक्यात झालं झालं.अख्खा गांव उलटला होता लग्नाला.लग्न लागल्यावर सुमी सर्वात आधी माझ्या पाया पडली.मी तिला जवळ घेतल्यावर माझ्या गळ्यात पडून खुप रडली.माझं कर्तव्य मी पार पाडल्याचं एक वेगळंच समाधान मला मिळालं होतं.
तीन महिन्यांनी हेमंतचा फोन आला.खुशीत होता.
”दादा अरे सुमीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.आईला तर तिच्यावाचून अगदी करमत नाही.तिचं वागणं,बोलणं पाहून तर गावातले तिला उच्च खानदानातलीच समजतात.असं वाटतंच नाही ती झोपडपट्टीतली आहे.खुप चांगले संस्कार केलेत तू तिच्यावर.स्वयंपाक तर अगदी अप्रतिम करते.थोड्याच दिवसात चांगला जाडजूड होणार आहे मी. सारखं तुझं नांव घेत असते.कधी कधी मत्सर वाटतो मला तुझा” तो जोरात हसला.तसा मी समाधानाने हसलो.तो पुढे म्हणाला.
”ती आमच्यासारखी खरंच लकी आहे.आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या मी बिनविरोध सरपंच निवडला गेलो”
”अरे वा!खुप खुप अभिनंदन. सुमीलाही अभिनंदन सांग”
”खरं तर तुलाच धन्यवाद द्यायला हवे दादा.खुप छान बायको दिलीस तू मला.खुप सुंदर,गोड,हुशार,समजदार आणि कष्टाळू आहे दादा ती”
माझे डोळे भरुन आले.मी सुमीच्या आईला हेमंतचं बोलणं सांगितलं. तिला खुप आनंद झाला.म्हणाली “पोरीचं कल्याण केलं तुम्ही दादा”
दिवस उलटत गेले.एके रविवारी मी आरामात बसलो होतो.दार वाजलं.आईने उघडलं.
”अरे सुहास लवकर ये सुमी आलीय”
माझ्या काळजात धस्स झालं.मी पटकन बाहेर आलो.सुमी आणि हेमंत उभे होते.
”सुमी तू !अशी न कळवता!”मी काळजीने विचारलं.तशी तिने पुढे येऊन मला मिठी मारली आणि रडू लागली.मी चिंतेने हेमंतकडे पाहिलं.तो हसत होता.
”काही नाही दादा.गुड न्युज आहे म्हणून रडतेय”हेमंत डोळा मारत म्हणाला.माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.
”काय गं सुमी खरंय का हे?”
”हो”ती डोळे पुसतापुसता एकदम लाजली.
मी तिला सोफ्यावर बसवलं.
”अरे आम्ही शिर्डीला आलो होतो.सुमीचा आग्रह चालला होता सुहासकाकाकडे जायचा.ही गुड न्युज कधी तुला सांगते असं तिला झालं होतं.म्हणून मग गाडी इकडे वळवली”
आदिती पाणी घेऊन आली.हेमंत परत बोलू लागला.
”अजून एक गुड न्युज आहे दादा.”
”कोणती?”
”नुकताच मला प्रगतीशील शेतकरी हा शासनाचा पुरस्कार मिळाला आणि इस्त्रायलच्या दौऱ्यासाठी माझी निवड झाली.तिकडून आमचा ग्रुप युरोप दौऱ्याला जाणार आहे.मी सुमीलाही नेणार आहे सोबत.मी म्हटलं ना ती लकी आहे आमच्यासाठी म्हणून”
”वा वा खुप छान”मी सुमीकडे पाहीलं ती खुप वर्षांनी इतकी आनंदात दिसत होती.गप्पा मारत असतांना आदिती चहा घेऊन आली.सुमीला आनंदात पाहून म्हणाली
”सुमी तुला मी आता पुतणी समजायचं की माझी जाऊ समजायचं?”
”फार विचीत्र नातं आहे ना वहिनी?”
हेमंत हसत म्हणाला.
”भाऊजी विचीत्र असलं तरी सुहास आणि सुमीचं फार सुंदर नातं आहे हे!म्हंटलं तर हे बापलेकीचं नातं आहे,म्हंटलं तर भावाबहिणीचं किंवा मित्रमैत्रिणीचं.या नात्याला नांव नाही देता येणार.नात्याला नाव दिलं की अपेक्षा वाढतात.या नात्यात अपेक्षा नाहीत.आहे ते फक्त निष्पाप प्रेम!सुरवातीला मला या नात्याचा संशय यायचा.एक तरुण सुंदर मुलगी माझ्या नवऱ्याच्या मागे मागे फिरते.सगळ्यांना सोडून फक्त त्याचा सल्ला घेते.माझा नवराही तिच्या सुखासाठी,तिच्या भल्यासाठी धडपड करतो.कोणत्याही बायकोला संशय येणारच.हळूहळू मला या जगावेगळ्या प्रेमाची अनुभुती यायला लागली.या प्रेमात कुठंही शारीरिक आकर्षण दिसतं नव्हतं.सुमीचं ठिक होतं ती बापाच्या आणि भावाच्या प्रेमाला पारखी होती.कदाचित सुहासमध्ये तिला बाप आणि भाऊ दिसत असेल पण सुहासचं काय?त्यांना कोणत्याही स्थितीत सुमीची गरज नव्हती.सुमीच्या लग्नाआधी जवळीकीचा आणि घटस्फोटानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा ते घेऊ शकले असते.विशेष म्हणजे कोणाच्याही पुरुषत्वाला आव्हान देण्याइतकी सुमी सुंदर आणि आकर्षक असतांना!सुमीचा नवरा सुहासच्याच वयाचा होता हे बघितल्यावर आणि स्त्रीच्या वयाचा विचार न करता तिच्यावर अत्याचार करणारे पुरुष पाहिले की सुहासचं मोठेपण लक्षात येतं.सुहासची आर्थिक आणि सामाजिक स्थिती चांगली असल्याने सुमीला त्याच्यासाठी काही करावं लागलं नाही पण गरज पडली तर सुहाससाठी ती जीवसुध्दा द्यायला तयार होईल इतकं प्रेम आहे तिचं सुहासवर.हो ना सुमी?”सुमीचे डोळे भरुन आले होते.माझा हात घट्टट धरुन तिने मान डोलावली.
”मगाशी तिने सुहासला मारलेली मिठी तुम्ही पाहिली?लग्नानंतर पहिल्यांदाच माहेराला आलेल्या मुलीने जणू आईला मारलेली मिठी होती ती!म्हणूनच म्हणते या नात्यावर कधीही संशय घेऊ नका भाऊजी.लाखात सापडणारं एक अतिशय निष्कलंक आणि अप्रतिम नातं आहे हे!”
आदितीने आपले डोळे पुसले.मी सुमीकडे पाहिलं.तोंडाला पदर लावून ती हुंदके देत होती.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या.
”बस कर सुमी किती रडशील”मी गहिवरल्या आवाजात म्हंटलं.तशी ती उठली आणि माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली.आईसकट सगळ्यांचेच डोळे भरुन आले होते.
”आणि हो सुमी.सुहास तुझे कोण लागतात हे मला माहित नाही.पण आजपासून हेच तुझं माहेर समज”
मी आदितीकडे आश्चर्याने पाहिलं तिच्या मनाचा थोरपणा मला आज समजला होता.
सुमी डोळे पुसत म्हणाली
”काकू माहेरवाशीण असले तरी आज स्वयंपाक मी करणार आहे.सुहासकाकाच्या आवडीचे पदार्थ बनवणार आहे.आणि सुहासकाका जेवण झाल्यावर माझ्याशी बुध्दीबळ खेळशील?पण माझ्या लहानपणी जसा तू जाणूबुजून हरायचास तसं आज करायचं नाहीस बरं का?”
मी जोरात हसलो.
”बरं.पण खेळून झाल्यावर आपण दोघांनी आईस्क्रीम आणायला जायचं.चालेल ना?” ती हसली.
“हो चालेल ना!पण आज मी डबल आईस्क्रीम खाईन”
आमच्या दोघातल्या या बालीश संवादावर सगळे हसले.