आरवने घड्याळात पाहीलं. सकाळचे आठ वाजले होते.त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता.खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरु होईल अशी त्याला अपेक्षा होती. “आरव अंघोळ करुन घे रे”
किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता.
नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं? आरवने बारावी नापास झाल्यानंतर सगळ्या मित्रांशी संबंध तोडून टाकले होते. त्याच्या आईवडिलांनी,मित्रांनी त्याला किती समजावलं होतं की नापास होण्यात त्याची काहीही चूक नव्हती. आणि ते खरंच होतं. आरव काँलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी! तो मेरीटमध्ये येणार हे सगळ्यांनीच ग्रुहीत धरलं होतं पण परिक्षेच्या पाच दिवस अगोदर आरव डेंग्यूने आजारी पडला. डेंग्यूचं निदान झालं तसं डाँक्टरांनी त्याला अँडमीट व्हायला सांगितलं.
आरवने नकार दिला. परिक्षा ऐन तोंडावर असतांना अँडमीट होणं त्याला शक्यच नव्हतं. पण पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी आरव तापाने फणफणला. त्याच्या वडिलांनी धावपळ करुन त्याला अँडमीट केलं. आरवची अवस्था क्रिटिकल झाली. त्याला आईसीयू मध्ये ठेवावं लागलं. देवाची क्रुपा म्हणूनच तो वाचला. वीस दिवसांनी तो घरी परतला तेव्हा परिक्षा संपली होती. निकाल लागला. आरव अर्थातच नापास झाला. आरवचे अगदी सामान्य बुध्दीमत्तेचे मित्रमैत्रिणीही पुढे निघून गेले. कुणी इंजीनियरिंगला गेलं कुणी मेडिकलला. कधीही नापास न झालेला आणि करीयरची मोठमोठी स्वप्नं पहाणारा आरव डिप्रेशनमध्ये गेला. घरी आलेल्या मित्रांनाही तो भेटेनासा झाला.
त्यांचे फोन उचलेनासा झाला. मग काही दिवसांनी फोन येणंही बंद झालं. आँक्टोबरला तो परत परिक्षेला बसला पण त्याचं अभ्यासातलं मन उडून गेलं होतं. मेरीटचा विद्यार्थी होता तो पण चक्क चार विषयात नापास झाला. आईवडिलांच्या आग्रहाखातर आता परत मार्चमधल्या परिक्षेसाठी त्याने फाँर्म भरला होता. पण आताही त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. याही परिक्षेत आपण नापासच होणार अशी भिती त्याला वाटू लागली होती. त्याने तो अधिकच निराश होत होता.
साडेनऊ झाले तशी त्याच्या आईने त्याला हाक मारली “आरव आता बस झालं वाट बघणं. तुझे मित्र येतील असं वाटत नाही. करुन घे अंघोळ. मला मग पुढची कामं करायला बरं पडेल”
तो मित्रांचीच वाट बघतोय हे त्या माऊलीच्या लक्षात आलं होतं.
जड अंतःकरणाने आरव उठून अंघोळीला गेला. अंघोळ झाल्यावर पुस्तक घेऊन तो त्याच्या रुममध्ये जाऊन बसला. अर्थात काही वाचण्यात त्याचं मन लागणार नव्हतंच.
सव्वा दहा वाजले तशी दारावरची बेल वाजली. अक्षयने कान टवकारले.
“ए आऱ्या बाहेर ये”
तो आवाज ऐकताच आरवच्या मनाने एकदम उडी मारली. होय हा त्या सुम्याचाच आवाज. आरवने पुस्तक ठेवलं आणि तो झपाट्याने बाहेर आला. बाहेर त्याची तीच ती सुप्रसिद्ध गँग अर्धवट रंगलेल्या अवस्थेत बाहेर उभी होती.
“ए आऱ्या भुल गया क्या हमको?”
“अरे याने तर अंघोळ केलेली दिसतेय”
“बस का आरव. अरे थोडी तर वाट बघायचीस”
“अरे साडेनऊपर्यंत तुमची वाट बघितली. मला वाटलं तुम्ही मला विसरलात”
“असं कसं विसरु? अरे या शिरीषची गाडी पंक्चर झाली होती म्हणून वेळ लागला यायला”
“ए आता गप्पा पुरे. ए चल आरव. नेहमीसारखा हंगामा करायचाय आपल्याला!”
“अरे पण मी अंघोळ केलीय आणि माझ्याकडे रंगसुध्दा नाहीयेत खेळायला”
आरवने बचावात्मक पवित्रा घेतला
“अरे रंगाची फिकीर तू कशाला करतो बाँस. ये देख पुरा ड्रम भरके लाया है तेरे लिये”
एक मुलगी म्हणाली.
“नको. यावर्षी राहू द्या. इच्छा होत नाहिये रंग खेळायची” त्याने तसं म्हणायचा अवकाश दोन मुलं आत आली. त्यांनी आरवला उचलूनच बाहेर आणलं. तो बाहेर आल्यावर सगळे मित्रमैत्रिणी रंग घेऊन त्याच्यावर तुटून पडले. मग आरवलाही जोर चढला त्याने त्यांच्याचकडचे रंग घेऊन सगळ्यांना रंगवायला सुरुवात केली. सगळे रंगून झाल्यावर एक जण म्हणाला
” ए चला चौकात जाऊया.आपले सगळे मित्र वाट बघताहेत”
” चल आरव बस मागे”
आरव अवघडला.
“अरे पण ते तुमचे मित्र ना? मग मला…”
“ए आरव ये क्या लगाके रखा है तुमचे मित्र माझे मित्र? चल बैठ जल्दी,जादा शाणपणा मत कर”
आरव मुकाट्याने मागे बसला. सगळे चौकात आले. दोन तास सगळ्यांनी मनसोक्त धुम केली. सगळे रंगून थकल्यावर आरव सगळ्यांना म्हणाला “आज संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पावभाजीची पार्टी” लगेच सुम्या म्हणाला.
“नाही आरव आज तुलाच आमच्याकडून वेलकम पार्टी. एक वर्ष झालं तू मित्रांना भेटला नाहीस. अरे नापास झालास म्हणून काय मित्रांना तोडून टाकायचं? तू त्या जीवघेण्या आजारातून वाचलास हे काय कमी आहे? एक वर्ष वाया गेलं म्हणजे आयुष्य संपत नसतं आरव. तुझ्या तशा वागण्याने आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. खुप बरं वाटलं आज तुला आमच्यात बघून. आज की शाम तेरे नाम. दोस्त मरते दम तक ये दोस्ती टूटना नही चाहिये”
आरवने तशाच रंगलेल्या अवस्थेत सुम्याला मिठी मारली. ते पाहून सगळे मित्रमैत्रिणी जवळ आले. त्यांनी आरवला उचलून घेतलं आणि एकच जल्लोष केला. आरव हवेत तरंगतच घरी आला.मित्रांसोबत रंग खेळल्यामुळे त्याच्या मनावरची नैराश्याची धुळ उडून गेली होती.प्रसन्नतेचे नवीन रंग त्यावर चढले होते.अंघोळ झाल्यावर तो आईला म्हणाला.
“आई लवकर वाढ खुप भुक लागलीये.आणि हो मला लगेच अभ्यासाला बसायचंय.यावेळी मला मेरिटमध्ये यायचंच आहे”
आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू कधी बाहेर पडले हे तिलाही कळलं नाही.