स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं एक वाक्य खूप प्रचलित आहे. ते म्हणजे, “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो.” वाह! अंगात रक्त सळसळेल असं हे वाक्य. हो ना? अगदी ऐकलं किंवा वाचल्या बरोबर एक वेगळीच ऊर्जा आपल्यात संचारून जाते. असं वाटायला लागतं की, आत्ताच उठावं आणि देशात चाललेल्या साऱ्या समस्यांवर एका झटक्यात तोडगा काढून तात्यारावांना आदरांजली वाहावी. असं जर आपण केलं तर ते “मृत्युंजय”, वरून आपल्याला बघून आशीर्वाद देतील, अश्या सार्या भावना अगदी उफाळून येऊ लागतात. यासोबतच सावरकरांचा विरोध करणाऱ्यांचा राग देखील येऊ लागतो. आणि गंमत म्हणजे, फक्त आपणच विनायकरावांच्या वाक्याला समजू शकलो आहे असा उगाच अतीविश्वास आपल्याला येऊ लागतो.
.
खरं तर सावरकरांचे विचार, कार्य, उपदेश, मार्ग, इत्यादी सारंच खूप प्रेरणा देणारे आहे. त्यांचं सारं आयुष्यच प्रेरणा देणारं आहे. पण त्यांचे हेच विचार, उपदेश आपणच समजू शकलो आहे हा खरं तर प्रत्येकाचाच एक गैरसमज आहे. सावरकरांवर अभ्यास करणारे चांगले चांगले लोकं देखील आज त्यांना पूर्ण समजू शकले नाहीत. तात्याराव जेव्हा म्हणतात की, या देशाचे, या मातृभूमीचे आपण देणे लागतो म्हणजे देशात असलेल्या समस्यांचेच निवारण करणे इतकेच होत नाही. या भूमीने आपल्याला जे जे दिले त्यापेक्षा जास्त आपण त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा असा त्याचा अर्थ होतो, असं मला वाटतं. भारत किंवा तेंव्हाचा अखंड हिंदुस्थान हा अनेक वर्ष पारतंत्र्यात राहीला आहे. मुघलांनी तर आपल्या संस्कृतीवर घाव घातला पण इंग्रजांनी आपल्या विचारांवर घाव घातला. आपल्या राहण्यावर, वागण्यावर, एकात्मतेवर घाव केला. तोडा आणि राज्य करा या धोरणेनुसार आपल्यावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. भारतात लोकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भावना निर्माण केली, जातीयवाद वाढवला. हा अखंड भारत ज्या ज्या गोष्टींनी कधी काळी विश्वगुरू होता त्या त्या सार्या गोष्टींचा नाश मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि आपल्याच काही लोकांनी मिळून वेळोवेळी केला. सावरकर जेव्हा ह्या वाक्यातून ‘देणे’ या शब्दाचा वापर करतात तेव्हा या भारताने गमावलेल्या प्रत्येक ख्यातीला, प्रत्येक संस्कृतीला, एकात्मतेला, अखंडत्वाला पुनः स्थापित करण्याचे आपल्यावर ऋण आहे, हे ठळकपणे सांगतात आहे.
.
तात्यारावांची जयंती असो किंवा आत्मर्पण दिवस असो, फक्त त्याच दोन दिवशी आपल्यात ही उर्जा संचारते आणि दुसर्याच दिवशी ती सहज शांत होऊन जाते. आपल्याला विसर पडतो असं मुळीच नाही. पण आपल्या आयुष्यात आपल्या मागे लागलेले प्रपंच आपल्याला ती उर्जा शांत करायला लावते. ‘हम सब एक है।’ आपण असा नारा लावतो पण मुळात मी ब्राम्हण, मी मराठा, मी कुणबी, तू क्षत्रीय, तो क्षूद्र, हा हे, तो ते, या जातीयवादात आपण आजपण घिरट्या घालत असतो. राजकारणात तर आजकाल आमचं हिंदुत्व महान की, तुमचं हिंदुत्व लहान, हे सांगायची एक खोड लागली आहे. आपणच आपल्या इतिहासाला लोकांसमोर आपल्याला हवं तसं रंगवतो आहे. भ्रष्टाचारावर तर काही अंकुश नाहीच. शिक्षणात देखील आपल्या देशाचा मूळ इतिहास तसेच आपली मूळ संस्कृती आणि भाषा ह्यावर देखील प्रत्येकाने त्यांना हवा तसा ताबा मिळवला आहे. या मातृभूमीला प्रत्येकानेच गृहीत धरून यावर स्वतःचाच हक्क गाजवायचा प्रयत्न दिवसरात्र चालवला आहे. मग हे ‘देणं’ कसं फेडल्या जाईल?
.
वीर सावरकर जेव्हा ह्या ऋणाबद्दल आपल्याला सांगतात तेव्हा ते ह्या मातृभूमीला पुनश्च विश्वगुरू बनवण्यासाठी प्रत्येकाने आपलं संपूर्ण योगदान द्यावं, त्यासाठी झिजावं आणि वेळ आलीच तर प्राणार्पण करावं हे सांगतात आहे. ही भारतमाता जगाची ज्ञानगंगा आहे, विश्वाचा केंद्र बिंदू आहे, प्रत्येक जागतिक समस्येचा तोडगा आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचं उगम स्थान आहे. ही किर्ती जी आज हारवली आहे ती पुनः प्रस्थापित करणे हे आपलं सगळ्यांच प्रथम कर्तव्य आहे आणि हेच ते ‘देणं’ आहे. जर हे ऋण न फेडताच आपण निघून गेलो तर पुनः हे ऋण फेडायला आपल्याला इथेच यावं लागेल हे माझ्या दृष्टीने निश्चित आहे.
.
म्हणून आपला देह हा देवाला देण्या आधी हे ‘देणं’ याच जन्मात फेडून जा हेच भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सांगतात आहे आणि त्याला अमलात आणणं हेच आपलं परम कर्तव्य आहे.
.
जय हिंद !!!