संपले तिमिर सारे, तेजात न्हाइली नगरे
पथ सर्व उजळती, विहरती आनंद लहरे
दीप लाखो प्रज्वले, मिटवण्या काळोख सारा
धुंद तो घेऊन सुगंध कुठूनसा आला वारा
लहान थोरच काय निसर्ग सुध्दा उल्हसित होई
आपल्या अंगणी ही आकाशकंदील झळकवी
मिरवतो आकाशकंदील टांगलेला ऊंचावरी
सडा रांगोळी सजली अन् तोरण सजे दारी
अभ्यंगस्नान मग होई उटणे सुगंधी लावूनी
तापलेले गरम पाणी, चढवीतसे न्यारीच धुंदी
गोडगुलाबी थंडी बोचरी, फुलवी रोमांच अंगी
नवनवीन वस्त्रे लेवूनी, सारे जाती रंगून रंगी
दिव्यांची ही रोषणाई असे प्राण दिवाळीचा
शकुनाची सुवर्णकिरणे, अंत करी वेदनांचा
सकाळ होता जमती सारे,तिखटगोड त्या फराळा
सणासुदीची गोडी वाढे जमे जेव्हा आप्तांचा मेळा
दिवाळीची महती सांगू किती, परमोच्च सुख आहे
आबालवृद्धांसंगे देव सुध्दा वाट पाहे
भोवताली भुकेले पोरके असतील किती
आनंद पोचवूया त्यांच्यापर्यंत…
….आज तुम्हाला ही विनंती