“ दे … दान … सुटे गिरानं …!! रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बाईच्या तोंडून अशी खणखणीत हाळी ऐकू आली आणि मागोमाग आईचा आवाज कानावर आला … “अमु …जा रे …! त्या बाईंना ह्या सुपात ठेवलंय ते देऊन ये..” मी गुमान उठलो आणि सूप घेऊन बाहेर आलो. ती बाई कडेवर छोटंसं मूल आणि डोक्यावर परफेक्ट बॅलन्सड केलेली टोपली घेऊन दोन पावलं पुढं आली. मी त्या सुपातलं सगळं तिच्या ओटीत घातलं आणि वळणार इतक्यात ती बाई हात जोडून म्हणाली, “ दादा , पोर सकाळ पास्न उपाशी हाय. वाईच थोडं दूध मिळंल का? “ आरं भाऊ, हे गिरान सुटपातूर कोनी बी खायला दिलं नाय बग.” मी तिला हातानेच थांबायची खूण केली. आत जाऊन ग्लासभर दूध घेऊन बाहेर आलो. त्या बाळाने आणलेले दूध घटघट पिऊन टाकलं आणि तो लहानगा जीव शांत झाला. त्या बाईच्या डोळ्यांत कमालीचं ओशाळलेपण होतं आणि माझ्या… ???
घरात आलो तर आईचा चेहरा रागाने लाल झालेला. मला कळेना कीं काय चुकलं ते ? एक होतं … आईला न विचारता मी दूध नेऊन बाळाला दिलं होतं. आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात असताना आई म्हणाली “ तू दूध नेऊन दिलंस त्याचं मला काहीच वाटलं नाही. उलट तुझ्या ह्या कृतीने मला आनंदच झाला. पण…? “ आता मात्र मी गोंधळलो. पण ? नक्कीच काहीतरी चुकलं होतं. “ पण काय आई..? मी दूध तुला सांगून द्यायला हवं होतं का?” आई काही बोलेल म्हणून मी तिच्याकडे नजर टाकली. आता तिच्या डोळ्यांत रागाच्या ऐवजी एक वेगळीच चमक होती. माझा हात धरून ती उद्गारली… “ बस इथे.” एक क्षण थांबून ती पुढे म्हणाली ..” अमित, तू दूध देताना मी पहात होते. ती भिक्षा मागायला आलेली बाई लाचार नसली तरी अगतिक मात्र नक्कीच होती. तिच्या डोळ्यांत तू देत असलेलं दान घेताना मला अगतिकता दिसली आणि तुझ्या डोळ्यांत दानशूरतेचा अहंभाव. मी म्हणजे किती मोठा दाता आणि ती घेणारी बाई… ती तर फक्त याचक??? अमित… दुधाचं दान करतेवेळी तुझ्या चेहऱ्यावर मला उन्मत्तपणाचा भाव दिसला. मी म्हणजे कोण..? आज माझ्यामुळेच त्या बाईच्या मुलाला दूध मिळालं असा गर्व दिसत होता तुझ्या अंगोपांगी. अमु, अरे जरा महारथी कर्णाला आठव.अजूनही त्याच्यासारखा श्रेष्ठ दाता झाला नाही आणि ह्या जगाच्या अंतापर्यंत होणारही नाही. कधीच नाही. अरे त्या दानश्रेष्ठ कर्णाकडून दान स्वीकारताना याचकसुद्धा स्वतःला भाग्यवान समजायचा.” आई बोलून शांतपणे उठून आत गेली.
मी शून्यावस्थेत तिथेच बसलो होतो. आईने अचूक घाव घातला होता…थेट वर्मावरच. क्षणात आठवला तो कर्ण … अंगराज कर्ण. त्याहीपेक्षा मित्रत्वाचं अमूल्य असं दान दुर्योधनाच्या पदरात टाकून आपल्या मृत्यूपर्यंत निभावून नेणारा चिरंजीव मित्र. एकदा दान दिल्यावर काय दिलं आणि त्यात आपला फायदा काय ह्याचा क्षणमात्रही विचार मनात न आणणारा महान… उत्तुंग… दिलदार आणि सच्चा वीरदाता. स्वतःच्या मृत्यूचेही दान प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या ओंजळीत आपल्या अंग- कवचाच्या रूपाने देणारा अतुल्य श्रेष्ठ दाता. अख्ख कर्णायन डोळ्यासमोरून सरकलं आणि अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आठवलं … कर्ण दान देत असताना ते घेणाऱ्या त्या याचकाकडे कधीही पहात नसे. आपली दृष्टी जमिनीकडे स्थिर ठेवून कर्ण दानधर्म करीत असे. हृदयात केवळ एकच भाव… मी दान करीत असताना त्या याचकाच्या नजरेतला अगतिकतेचा ओशाळेपणा न दिसावा आणि माझ्या नजरेत दान करीत असतानाचा गर्व- अहंकार नसावा. अहाहा… काय हा भाव. किती थोर विचार आणि आचरण.
मी उठलो. धावत जाऊन आईच्या कुशीत शिरलो. “ आई..! मी चुकलो. मला माझी चूक समजली. तुझी शप्पथ घेऊन सांगतो पुन्हा असं होणार नाही.” आई प्रसन्न हसली. माझ्या केसांत बोटं फिरवत मला नुसतीच थोपटत राहिली. मला तिचा क्षमेचा स्पर्श समजला. त्या जगनियंत्याने आपल्यावरचा क्षमाशीलनाचा भार हलका करण्यासाठीच तर आईच्या रूपाने स्त्रीला पृथ्वीवर पाठवलं होतं …
बरोबर मातृ- कर्तृत्वाचे दान देऊन … कायमचं.