या वर्षी ही तो येतोय
सर्व संकटातून
बाहेर काढायला
विघ्नहर्ता येतोय
शिवपार्वतीचा हा पुत्र
दुर्मुखलेल्यांना उल्हसवायला येतोय
भोळाभाबडा रिध्दीसिध्दीचा दाता
हिरमुसल्यांना खुलवायला येतोय
दोन वर्षांची मरगळ घालवून
उत्साह भरायला येतोय
ओसाड रस्त्यांवर परत
थोडी जाग आणायला,
उदास मनाला
आश्वासायला तो येतोय..
मोदक, निवगिऱ्या , आणि
नाना खाद्यपदार्थ घेऊन
भूक भागवायला तो येतोय
गर्वाचं हरण करायला
सेवेचं व्रत शिकवायला
दुःखहर्ता तो येतोय
भक्तीची सवय जोडायला
शक्तीची आठवण करून द्यायला
तो आज पुन्हा येतोय
अजूनही त्याला नकोय कसलीच गडबड
नकोय त्याला अजूनही,अजिबात गोंधळ
पावित्र्य राखून पूजा करा असं तो बजावतोय
गर्दी जास्त करु नका , प्रेमानं दटावतोय
स्वतःवर विश्वास ठेवा. संदेश तो देतोय
काळजी करु नका…घ्या असंही सांगतोय
दिवस सुगीचे येत रहातील
नवीन काहीतरी चांगलंच होईल
ही आशा मनात ठेवायची
सुखकर्त्याची त्या रोज आरती करायची
त्याला नको सजावट
नको देखावा त्याला
सर्वांगी सुंदर देव माझा
फक्त भक्तीभावाचा भुकेला
दहा दिवसांनी त्याची मूर्ती विसर्जित होईल
पण मनात मात्र तो कायमच राहील
मनात मात्र तो कायमच राहील