प्रसाद घरात शिरला पण त्याचा पडलेला चेहरा पाहून काहितरी वाईट घडलंय याची जाणीव प्राचीला झाली. घरात आल्याआल्या त्याला प्रश्न विचारुन दुखवण्यापेक्षा त्याचा चहा झाल्यावरच विचारु असं ठरवून ती आत गेली. प्रसाद जीव नसल्यासारखा सोफ्यावर पडून राहिला. दोन्ही हातांनी त्याने तोंड झाकून घेतलं. प्राचीने त्याच्यासाठी पाणी आणलं तेव्हाही तो तसाच बसून होता.
“खुप थकल्यासारखे दिसताय. फँक्टरीत जास्त काम पुरलं का?” विचारायचं नाही असं ठरवूनही न रहावून प्राचीने विचारलं.
“माझी नोकरी गेली. शेवटी कंपनीने आम्हांला काढून टाकलं” तो खचलेल्या आवाजात म्हणाला.
“अरे देवा!” प्राचीला जबरदस्त धक्का बसला. तसं पाहिलं तर गेल्या सहा महिन्यापासून याचा अंदाज आला होताच. कोरोनामुळे कंपनीचं दिवाळं निघालं होतं. बऱ्याच कामगारांना अगोदरच डच्चू देण्यात आला होता. प्रसादसारख्या इंजीनियर्सचे तीन महिन्यांपासून पगार नव्हते. पण कोरोनाची लाट कमी झाली. वातावरण बऱ्यापैकी सुधारलं तेव्हा कंपनी परत एकदा व्यवस्थित चालायला लागेल अशी सर्वांची अपेक्षा होती.दुर्दैवाने तसं झालं नव्हतं.
“तुम्ही थोडं फ्रेश व्हा. मी चहा करुन आणते. मग नंतर बोलू आपण” ती स्वतःला सावरत म्हणाली. तिने चहा करुन आणला तरी प्रसाद तसाच खुर्चीवर बसून होता. भविष्याच्या काळजीने त्याचा चेहरा पिळवटून गेला होता. बरोबरच होतं. या वयात आता नोकरी मिळणं अवघडच होतं. मुलं आता मोठी होणार होती. त्यांचे शिक्षणाचे खर्च, घराच्या कर्जाचे हफ्ते याचा मेळ बसवणं कठिण होऊन बसणार होतं. असलेली शिल्लक संपल्यानंतर पुढे काय हा मोठा यक्षप्रश्न उभा रहाणार होता.
“थोडं तोंड धुवून घ्या. म्हणजे जरा बरं वाटेल” त्याला तसं बघून प्राची समजावत म्हणाली. तो नाईलाजाने उठला आणि तोंड धुवून आला. चहाचा एक घोट घेऊन त्याला बरं वाटलं खरं पण मनावरचं मळभ काही दुर झालं नाही.
“काही काळजी करु नका. मिळेल दुसरी नोकरी”
“नोकऱ्या काय अशा वाटेवर पडल्या आहेत का सहजासहजी मिळायला?” तो जरा जोरातच बोलला.त्याचा तो कठोर स्वर ऐकून ती दुखावली. पण त्याची मानसिक अवस्था ठिक नाहिये हे तिच्या लक्षात आलं. प्रत्युत्तर न देता ती चुप राहिली. त्याचा चहा झाल्यावर ती कप किचनमध्ये घेऊन आली तेव्हा तिच्या मनात शेकडो विचारांचं वादळ घोंघावत होतं. नोकरी नसलेला आणि घरी रिकामा बसलेला नवरा सांभाळणं किती कठिण असतं हे ती अनेक जणांकडून ऐकून होती. असे बेकार नवरे व्यसनांच्या आहारी जातात.त्यामुळे नंतर त्यांना काम करण्याची इच्छाच रहात नाही. असे नवरे समाजाच्या, नातेवाईकांच्या नजरेतून तर उतरतातच पण मुलंही आपल्या बापाचा तिरस्कार करतात.
“देवा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं होऊ देऊ नको रे. त्याला लवकरात लवकर दुसरी नोकरी लागू दे “तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. ती जेव्हा लग्न करुन या घरात आली तेव्हा तीची नोकरी करण्याची खुप इच्छा होती. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यावेळी प्रयत्न केला असता तर नोकरीही सहज मिळू शकली असती. तिने तो विषय एकदा प्रसाद आणि सासूजवळ काढलाही होता. पण “तू नोकरी करायला लागलीस की साहजिकच तुला वाटेल की नवरा आणि सासूने घरकामात मदत करावी. माझं ठिक आहे पण मी गेल्यावर प्रसादला तू कामाला लावशील. ते त्याला आणि मलाही सहन होणार नाही.
आमच्या घराण्यात पुरुष घरकामाला हातही लावत नाहीत. तुझ्या सासऱ्यांनी कधी इकडची काडी तिकडे केली नाही आणि प्रसादलाही आम्ही करु दिली नाही. त्यामुळे नोकरीचा विचारही मनातून काढून टाक “असं तिच्या सासूने बजावून सांगितलं होतं.त्यादिवसानंतर तिने तोंडाला कुलूप लावून टाकलं होतं. प्रसादलाही तिने कोणतंही काम सांगितलं नव्हतं. घरातली कामं तर सोडाच पण भाजी आणणं, किराणा आणणं, लाईटबिल भरणं ही कामही तीच करायची. मुलं झाली पण मुलांना अंघोळ घालणं,त्यांना तयार करणं, त्यांना जेवू घालणं ही कामसुध्दा तिनं कधीही प्रसादला सांगितली नव्हती.
तिच्या मनात सहज विचार आला. आज ती नोकरी करत असती तर प्रसादची नोकरी जाणं एवढ्या काळजीचा विषय बनलं नसतं.तिनं एक विषादाचा सुस्कारा सोडला. दुसऱ्या दिवसापासून प्रसादचं नोकरीसाठी भटकणं सुरु झालं. पण ती सोपी गोष्ट नव्हती.एकतर या शहरात इंडस्ट्रीज कमी होत्या. ज्या होत्या त्यांची परिस्थिती वाईट होती. घरदार सोडून पुण्यामुंबईकडे जाणं आणि तिथं कमी पगारावर नोकरी करणं जिकीरीचं होणार होतं. तरीसुद्धा जाँब पोर्टलवर तो जिथे शक्यता वाटत होती तिथे अर्ज पाठवत होता. पण कुठूनच काही जमत नव्हतं.
पंधरा दिवस उलटून गेले, एक महिना झाला, दोन महिने उलटले तरी नोकरी मिळण्याची चिन्हं दिसत नव्हती. शिल्लक असलेल्या रकमेला हळूहळू पाय फुटू लागले होते. जास्तीत जास्त सहा महिने त्या रकमेत भागवता आलं असतं. मग मात्र अडचणींचे डोंगर उभे रहाणार होते. प्रसाद आता तालुक्याच्या गांवात, शेजारच्या जिल्ह्यातही नोकरी शोधू लागला. ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना त्याने त्याच्यासाठी नोकरी शोधण्याची विनवणी केली होती.
पण सगळेच मदतीची आश्वासनं देतात, प्रत्यक्षात कुणीच मदत करत नाही हा अनुभव त्याला आता येऊ लागला होता. असाही आपल्यावर वाईट प्रसंग आले की काही नातेवाईकांना आसुरी आनंद होत असतो आणि शक्य असुनही ते मदत करण्याचं मुद्दामच टाळतात हे काय तो जाणून नव्हता? त्याची आता चीडचीड होऊ लागली होती. घरात असला की तो विनाकारणच मुलांवर खेकसायचा, चिडायचा. एकदा तर त्याने खेळताखेळता टीपाँयवरचा फ्लाँवरपाँट तोडला म्हणून छोट्या प्रवीणलाही खुप मारलं होतं.
तेव्हापासून प्राची मुलांना त्याच्यासमोर जाऊ देत नव्हती. मुलंही त्याला घाबरुन रहात होती. प्राचीला स्वतःला त्याची भीती वाटत होती. कुठल्याही बोलण्यातून किंवा वागण्यातून त्याचा अपमान होणार नाही याचा ती कसोशीने प्रयत्न करत होती. पण थोडं जरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की प्रसाद सगळ्या परिस्थितीचा राग प्राचीवर काढायचा. तिला वाटेल ते बोलायचा.
एक दिवस तो बाहेरून आला तशी ती त्याला म्हणाली “अहो आज माझ्या मैत्रीणीचा फोन आला होता. तिच्या ओळखीच्या १० लोकांना सकाळ संध्याकाळ जेवणाचे डबे करुन हवेत. एका डब्याचे महिन्याला तीन हजार देणार आहेत. करुन देत जाऊ का?”
“आईला विचारलंस?”
“हो.त्या हो म्हणताहेत पण “‘मला आणि प्रसादला कोणतंही काम सांगायचं नाही ‘अशी अट त्यांनी घातलीये”
“बरोबर. तू कर पण मला तरी काहिच काम सांगू नकोस. मी आधीच टेंशनमध्ये आहे. आणि ते डबे बिबे मी पोहचवणार नाही हं”
“नाही. ते स्वतःच घ्यायला येणार आहेत”
“आणि मला पैसेही मागू नकोस”
“नाही. मी प्रत्येकाकडून पाचशे रुपये अँडव्हान्स मागून घेणार आहे”
“मग ठिक आहे”
दुसऱ्या दिवसापासून प्राचीची धावपळ सुरु झाली. मिळालेल्या अँडव्हान्समधून तिने तांदूळ, डाळी,गहू ,भाज्या आणल्या. सकाळी लवकर उठून डब्यांची तयारी, मुलांचे डबे, त्यांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवणं. सासुला आणि नवऱ्याला चहा नाष्टा करुन देणं या सगळ्यात सकाळ जाऊन दुपार कधी येते हे तिला समजेनासं झालं. संध्याकाळीही तेच व्हायचं.
प्राचीच्या हाताला चव होती.पंधराच दिवसांनी १० डब्यांचे २० डबे झाले. तीचा दिवस आता प्रचंड धावपळीत जात होता. सासू आणि नवऱ्याची तिला थोडीशीही मदत होत नव्हती. पाचवीत जाणाऱ्या आपल्या मुलीला-प्रज्ञाला ती हाताशी धरुन निभावून नेत होती. महिन्याभरानंतर पहिल्या दहा डब्यांचे तीस हजार तिच्या हातात पडले तेव्हा तिला गहिवरुन आलं.
प्रसादला तिची धावपळ, तिचे कष्ट याची थोडीफार जाणीव व्हायला लागली होती. रोज सकाळ संध्याकाळ २० डब्यांच्या ८० पोळ्या लाटणं सोपं काम नाही हे त्यालाही कळत होतं. तिला मदत करावी असं त्याला कधीकधी तीव्रतेने वाटून जायचं पण आईने केलेले संस्कार त्याला ती मदत करायला थांबवत होते. शिवाय ‘शेवटी झालाच ना बायकोचा गुलाम ‘हे वाक्य आईच्या तोंडून ऐकणं त्याला अपमानास्पद वाटणार होतं.
एक दिवस शेजारच्या जिल्ह्यात एका कंपनीत इंजिनिअर्सच्या जागा असल्याचं मित्राकडून कळल्यावर तो आणि त्याचा मित्र कंपनीत वाँक इन इंटरव्ह्यू द्यायला गेले. इंटरव्ह्यू झाल्यावर ते चहा प्यायला कंपनीच्या बाहेर असलेल्या टपरीवजा हाँटेलमध्ये शिरले. तिथे भजी तळत असलेल्या बाईला दोन भज्यांची आँर्डर त्याच्या मित्राने दिली. प्रसादने पाहिलं. आतमध्ये एक १२-१३ वर्षाची मुलगी उष्ट्या प्लेट्स साफ करत होती. तर एक १०-११ वर्षाचा मुलगा वेटरचं काम करत होता. खेळण्याबागडण्याचं वय असलेल्या त्या मुलांना अशी कामं करतांना पाहून प्रसादचं मन कळवळलं.
“शाळेत नाही जात का रे तुम्ही?”
“जातो ना!सकाळी असती.दुपारी इथं काम करतो “
“हे तुमचंच हाँटेल का?”
“हां. ती माय आहे आमची” भजी तळणाऱ्या बाईकडे बोट दाखवून तो म्हणाला. त्या बाईने तो संवाद ऐकला असावा. ती स्वतःच दोन प्लेट भजी घेऊन आत आली.प्लेटस् बाकड्यावर ठेवून म्हणाली
“काय करता दादा. पोरांचा बाप मार्केटमध्ये हमाली करायचा. त्याले टिबी झाला. आता काय त्याचेकडून काम व्हत नाई. दिवसभर घरात पडलेला असतो. घर तर चालवणंच पडीन ना? म्हणून ही टपरी टाकली” प्रसादच्या डोळ्यासमोर प्राची उभी राहिली. नवऱ्याची नोकरी गेली म्हणून पहाटे उठून लोकांचे डबे करुन देणारी. जिद्दीने संसार चालवणारी. या बाईसारखीच.
आपल्या गावी परतल्यावर मित्राला भाजी घ्यायची म्हणून तो त्याच्यासोबत भाजीबाजारात गेला. तिथेही अनेक बायका भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. एक भाजीवाली तर आपल्या लहान बाळाला शेजारी ठेवून भाजी विकत होती.
“काय अडचण असेल बरं या बाईची?” प्रसादच्या मनात विचार आला. याच बायका भाजीबाजारात येण्यापूर्वी स्वयंपाक करुन ,घरातलं सगळं आवरुन आल्या असतील. संध्याकाळी घरी गेल्या की परत घरकामाला त्यांना जुंपावं लागणार होतं. का करावं लागतं यांना हे सगळं? नवरा कमवत नसेल किंवा कमवतही असेल पण ते पुरेसं नसेल म्हणून तर या एवढी धडपड करतात ना! संसार चालवण्यासाठी, तो सुखाचा होण्यासाठी नवऱ्याला साथ देणाऱ्या या बायकांना पाहून त्याला स्वतःची लाज वाटू लागली.
“आपलीही बायको एवढी धडपडतेय, कष्ट करतेय आपल्याला ते दिसतंय तरी आपण तिला साथ देत नाही. सरळसरळ तिला आपण घरातली कामं करणार नाही असं सांगतो. साथ द्यायची नाही तर मग जीवनसाथी असून आपला उपयोग तरी काय?” मनातल्या मनात त्याने स्वतःलाच खुप शिव्या दिल्या. तो घरी आला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते.प्राची छोट्या प्रवीणला कुशीत घेऊन झोपली होती. सध्याच्या धावपळीने आणि कष्टांनी तिच्या चेहऱ्यावर थकल्यासारखे भाव होते.
ते पाहून प्रसादला गलबलून आलं. तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवण्यासाठी त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. पण त्या स्पर्शाने ती पटकन जागी झाली.
“अगं बाई. आलात तुम्ही? काही हवंय का तुम्हांला? चहा करुन देऊ?”
“नको. झोप तू. सकाळी लवकर उठावं लागतं ना तुला”
झोपेत असतांनाही समाधानाचं एक स्मित तिच्या चेहऱ्यावर झळकलं.
“अर्ध्या तासाने उठते. मग तयारीला लागावं लागेल” ती पुटपुटली आणि कुस बदलून परत झोपली.
चार वाजता ती उठली तेव्हा तो पेपर वाचत बसला होता. थोड्या वेळाने तिने त्याच्यासाठी चहा करुन आणला.
“कसा झाला इंटरव्ह्यू?” तिने विचारलं
“चांगला झाला. पण दोनच जागा आहेत आणि एकशेबारा उमेदवार इंटरव्ह्यूला होते. त्यामुळे शक्यता कमी वाटतेय “तो निराशेने म्हणाला “जाऊ द्या. अर्ज करत रहा.कधी ना कधी मिळेलच नोकरी”
“घरी बसून खुप कंटाळा आलाय आता प्राची. खुप वाईट विचार येतात मनात” ती धास्तावली. हे असं होणार हे तिला माहित होतं. प्रसादला कुठंतरी गुंतवणं आवश्यक होतं नाहीतर तो जीवाचंही बरंवाईट….त्या कल्पनेनेच ती शहारली.
“नका काळजी करु. आणि पैशाची तर अजिबातच करु नका. सध्या बरं चाललंय आपलं “
तो काही बोलला नाही. ती किचनमध्ये येऊन तयारीला लागली. थोड्या वेळाने त्यालाच काय वाटलं कुणास ठावूक. तो किचनमध्ये जाऊन प्राचीला म्हणाला. “प्राची ते कांदे बटाटे चिरायचे असतील तर दे माझ्याकडे.मी देतो चिरुन” त्याच्या या वाक्यावर ती आश्चर्यचकीत होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. साधा पाण्याचा ग्लासही उचलून न ठेवणारा तिचा नवरा चक्क तिला स्वयंपाकात मदत करायचं विचारत होता. तिचा आपल्या कानांवर विश्वास बसेना.
“अहो राहू द्या. तुम्ही नुकतेच प्रवास करुन आला आहात. आराम करा. माझं काय नेहमीचं काम आहे. मी करेन”
“असू दे प्राची. मलाही रिकामं बसण्याचा कंटाळा आलाय. तेवढाच माझाही टाईमपास होईल”
“अहो नको. आई शेजारच्या काकूंकडे गेल्यात. त्या आल्या आणि त्यांनी तुम्हांला काम करतांना बघितलं तर मला त्या रागवायच्या
“रागवू दे. मी समजावून सांगेन तिला. चल आण तो चाकू”
त्याने तिच्या हातातून चाकू घेतला आणि तिने काढून ठेवलेले कांदे बटाटे चिरायला बसला. कांदे चिरायला लागला आणि त्याच्या डोळ्यांची आग होऊ लागली. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. “बघा मी तुम्हाला म्हंटले नव्हते? होतोय ना त्रास ? राहू द्या मी चिरुन घेईन “त्याला डोळ्यातलं पाणी पुसतांना पाहून ती म्हणाली “असू दे प्राची. होईल सवय. तुलाही तर होतच असेल ना असा त्रास?”
“हो मग! पण झालीये आता सवय”
“तशी मलाही होईल” तो हसून म्हणाला.
ते दोनतीन किलो कांदे बटाटे चिरताचिरता तो थकून गेला.
“बापरे कठिण प्रकरण आहे हे. नुसतं भाज्या चिरताचिरताच आपण थकून गेलो. प्राची तर रोज वीस जणांचा वरणभात भाजीपोळीचा स्वयंपाक करते. घरातल्या पाच जणांचा स्वयंपाक वेगळाच. खरंच कमाल आहे तिची “तो मनातल्या मनात पुटपुटला.
“जरा कोथिबीरही चिरुन द्याल का? “प्राचीने विचारलं.
“हो. आण”
तो कोथिंबीर चिरत असतांनाच प्रसादची आई आत आली. प्रसादला काम करतांना पाहून ती ओरडली
“अरे प्रसाद काय आहे हे?”
“काही नाही आई प्राचीला जरा मदत करतोय”
“तुला माहितेय ना आपल्या घरात पुरुष घरकाम करत नाहीत ते? आणि प्राची तुला तरी काही लाज वाटायला पाहिजे ना नवऱ्याला अशी कामं सांगताना!”
“आई मी त्यांना नाहिच म्हणत…”
“आई तिची काहिच चुक नाहिये. ती नाहीच म्हणत होती पण मी स्वतःच मदतीला आलो”
“उठ तिथून आणि यापुढे स्वयंपाकघरात येत नको जाऊस” ती ओरडून म्हणाली आणि मग प्राचीकडे वळून म्हणाली
“शेवटी माझ्या पोराला बायकोचा गुलाम करुनच टाकायचं ठरवलंस ना तू?” प्राचीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पण प्रसाद उठला. आईच्या हाताला धरुन तो तिला आतल्या रुममध्ये घेऊन गेला. आतूनही सासूबाईंची चाललेली बडबड प्राचीला ऐकू येतच होती.
“प्राची तू आईचं मनावर घेऊ नकोस. आणि मी आईला ठणकावून सांगितलंय की मी नोकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्राचीला मदत करतच रहाणार आहे. दोनतीन दिवस ती बडबड करेल नंतर शांत होईल” प्रसाद तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. तिला ते ऐकून खुप बरं वाटलं. आता प्रसाद तिला सकाळ संध्याकाळ मदत करु लागला. डब्यांना लागणाऱ्या भाज्या ,किराणा सामान तोच आणून देऊ लागला. त्याशिवाय भाज्या चिरुन देणं, स्वयंपाक झाल्यावर डबे भरुन देणं ही कामंही तो करु लागला.
त्याला असं काम करतांना पाहून प्राचीच्या सासूबाईंची बडबड सुरु व्हायची. शेजारच्या बायकांकडे सुनेच्या चुगल्या करायला त्यांना चांगला विषय मिळून गेला होता. काही वेळा प्राचीला त्यांचं बोलण असह्य व्हायचं पण प्रसाद तिला आणि आईलाही समजावायचा. एक दिवस मात्र त्याने आईला चांगलंच खडसावलं तेव्हापासून त्यांची बडबड बंद झाली.
एक दिवस प्राची त्याला म्हणाली. “अहो अजून दहा डब्यांची आँर्डर आपल्याला मिळतेय.पण त्यांना डबे घरपोच हवे आहेत. तुम्ही घेऊन जाऊ शकाल? तुम्ही तयार असाल तर त्यांना हो सांगते” प्रसाद अडखळला. आपल्यासारख्या इंजीनियरने असं डबेवाल्याचं काम करावं हे त्याला रुचेना. तो काही म्हणायच्या आतच प्राची म्हणाली “मला स्वतःला तुम्हाला ते काम सांगायला कसंतरीच होतंय हो. पण एकदम महिन्याला तीस हजाराचा व्यवसाय वाढतोय म्हणून जीव वरखाली होतोय. तुम्ही तयार नसाल तर मी घेऊन जाईन ते डबे. होईल माझी धावपळ पण असं येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणणं बरं वाटत नाहिये”
“ठिक आहे प्राची मी तुला उद्या सांगतो” रात्रभर तो विचार करत होता. खरं तर प्राचीही तशी उच्चशिक्षितच होती पण नवरा घरी बसलाय,कुटूंबाचे हाल होताहेत हे पाहून हे असं सामान्य बाईसारखं तिने डब्यांचं काम स्विकारलं होतं. श्रीमंत मैत्रिणी आणि नातेवाईक काय म्हणतील याची तिने जराही पर्वा केली नव्हती.कुटुंबावर जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा या बायका कोणत्याही कामाची लाज न बाळगता कुटूंबाला सावरण्याची धडपड करतात अशी अनेक उदाहरणं त्याच्या डोळ्यासमोर आली.
“प्राची घे त्या दहा डब्यांची आँर्डर.मी पोहचवत जाईन “दुसऱ्या दिवशी तो प्राचीला म्हणाला तसा तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला. खरं तर काम वाढवल्याने तिचीच मेहनत वाढणार होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कौतुकाने त्याने तिचे हात हातात घेतले. “किती कष्ट घेशील प्राची आपल्या संसारासाठी.मी बघतोय दिवसभर तू कामाला जुंपलेली असते.जराही आराम करत नाहिस तू”
ती हसली.म्हणाली
“अहो त्यात विशेष काय आहे? संसार आपला आहे. त्याच्यासाठी कष्ट घेतले तर बिघडलं कुठे? मीच नाही तर हजारो, लाखो बायका घरदार सांभाळून नोकऱ्या करतात. आणि मी नोकरी करत असते तर हे करावंच लागलं असतं ना?”
“माझी नोकरी गेली तेव्हा मला वाटलं होतं तू खुप त्रागा करशील. मला उठता बसता नोकरीवरुन टोमणे मारशील. पण तू मलाच नाही तर आपल्या संसारालाही खुप चांगलं सांभाळून घेतलंस”
“अहो संकटात जो सांभाळून घेत नाही त्याला जीवनसाथी कशाला म्हणायचं? आणि तुम्ही काही स्वतःहून नोकरी सोडली नव्हती तुम्हाला टोमणे मारायला!तुम्हीही तर मला मदत करताच आहात ना मला एवढे मोठे इंजीनियर असून”
“हो तर.ते माझं कर्तव्यच आहे. मग जीवनसाथी कशाला म्हणायचं?” तो हसत म्हणाला.
तो कामासाठी वळला पण तिचे डोळे अश्रूंनी भरुन आले. अखेर बायकांना हवं तरी काय असतं.दोन कौतुकाचे शब्दही त्यांना कष्ट विसरायला लावतात.
पंधरा दिवसांनी एका संध्याकाळी प्राची त्याला म्हणाली. “आपल्या जेवणावर खुष होऊन एका ठिकाणाहून आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीची आँर्डर आलीये.साठ जणांचं जेवण आहे. मी माणशी दोनशे रुपये सांगितले आहेत. ते तयार आहेत. घ्यायचं का काँट्रॅक्ट?”
“प्राची रोजचे चाळीस जणांचे डबे करण्यातच तू थकून जातेस.परत हे साठ जणांचं जेवण. म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी तुला शंभर जणांचा स्वयंपाक करायचाय.जमेल?”
“मला जमेल. फक्त तुम्ही मला मदत करा. एका झटक्यात बारा हजाराचा व्यवसाय होणार आहे. करुन बघायला काय हरकत आहे? नाही जमलं तर पुढे करायचं नाही”
“माझी काही हरकत नाही. मी करेन मदत”
वाढदिवसाची पार्टी उत्तमरीत्या पार पडली. प्राचीच्या जेवणावर तर सगळी मंडळी बेहद खुश होती. पंधराच दिवसांनी प्राचीला साखरपुड्याची आँर्डर मिळाली. शंभर माणसांचं जेवण होतं. आता मात्र आपल्या एकटीकडून एवढी मोठी आँर्डर पेलवणार नाही हे प्राचीच्या लक्षात आलं. ती प्रसादला म्हणाली. “अहो मी मदतीसाठी दोनतीन मुली लावून घेते. अशा आँर्डर्स नेहमी मिळत गेल्या तर रोजचे डबे करणं मुश्किल जाईल”
“हो खरंय.लावायला हरकत नाही. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणीही आपल्याला एखादा माणूस लागेल.माझ्या कंपनीतले बरेच कामगार रिकामे आहेत. त्यातल्या एखाद्याला बोलावून घेऊ का?”
“घ्या बोलावून.बरं ज्यांच्याकडे साखरपुडा आहे ते मला कुणी इव्हेंट मँनेजमेंटवाला ओळखीचा आहे का विचारत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना बरीच सजावट करायचीये”
प्रसाद विचारत पडला. आणि अचानक त्याला कल्पना सुचली. “प्राची कंपनीतल्या कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी मीच सांभाळायचो. मला अशा सजावटीचा खुप अनुभव आहे.या कार्यक्रमाचीही सजावट वगैरे मीच केलं तर…?”
प्राचीचा चेहरा खुलला.पण साशंक मनाने ती म्हणाली. “हो पण तुम्ही केलेलं त्यांना नाही आवडलं तर?राहू द्या एखाद्या प्रोफेशनल माणसाकडूनच ते करायला हवं”
“प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे? आपण फक्त अँरेंजमेंटकरिता लागलेला खर्च घेऊ “
” बरं.मी त्यांना विचारुन बघते “
साखरपुडा एकदम झकास पार पडला.प्रसादने केलेलं डेकोरेशन आणि इतर व्यवस्था सगळ्यांना इतकी आवडली की उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने एका संमेलनाच्या आयोजनाची संपुर्ण जबाबदारी प्रसादला देऊन टाकली. आता प्राची,प्रसादला फुरसत मिळेनाशी झाली.अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या जेवणाच्या आणि इव्हेंट मँनेजमेंटच्या दोघांना आँर्डर्स मिळू लागल्या.घरातलं किचन आता स्वयंपाकासाठी कमी पडू लागलं तेव्हा त्यांनी शेजारचं रिकामं असलेलं घर भाड्याने घेतलं.डब्यांची संख्याही आता ५० च्या पुढे गेली होती. डबे पोहचवण्यासाठी आता प्रसादने एक माणूस लावून घेतला होता.प्राचीनेही पोळ्या लाटायला दोन बायका लावून घेतल्या होत्या.
एक दिवस प्राची प्रसादला म्हणाली “अहो एका लग्नाचं काँट्रॅक्ट आपल्याला मिळतंय.मात्र सहाशे माणसांचं जेवण दोन दिवस करावं लागणार आहे.शिवाय नाश्ता आणि वेळोवेळी चहा,स्नँक्स लागणार आहेत.काय करायचं?एवढं मोठं काँट्रॅक्ट आपल्याला पेलवेल का?आपल्या क्षमतेचा विचार करुन मी त्यांना नाही सांगितलं होतं. पण ते खुप आग्रह करताहेत.एका पार्टीत त्यांनी आपल्या जेवणाची चव त्यांना खुपच आवडली होती.बरं त्यांना पंजाबी, साऊथ इंडियन,चायनीज, महाराष्ट्रीयन असे सगळ्याच प्रकारचे पदार्थ हवे आहेत.मला एकटीला ते बनवणं कठीण आहे.बाहेरचे आचारी बोलवावे लागतील. सर्व्ह करायला मुलं लागतील.
तुम्हांलाही खुप काम पुरणार आहे. अगदी अक्षतांपासून ते घोडा, बँड, स्टेज डेकोरेशन, भटजी सगळं आपल्यालाच अँरेंज करायचंय. मला तर काही सुचेनासंच झालंय. पण मी हिशोब केलाय. जवळपास नऊ ते दहा लाखापर्यतचा बिझनेस होतोय. आपल्याला प्राँफिटच दोनअडिच लाखाचा होईल. आपण सक्सेसफुल झालो तर आपलं चांगलं नांव होईल. पुढचे काँटँक्ट्स मिळणं सोपं जाईल. पण काही फिस्कटलं तर नांव तर खराब होईलच पण पुढे काम मिळणंही कठीण होईल. पण जोपर्यत आपण रिस्क घेत नाही तोपर्यंत पुढे जाणार कसे?”
प्रसाद विचारात पडला. “प्राची आपण दोनतीन दिवस विचार करु मगच काय तो निर्णय घेऊ”
“त्यांना घाई आहे.कारण दिड महिन्यावर लग्न आलंय आणि त्यादिवशी लग्नाची जबरदस्त तिथी असल्यामुळे कँटरर मिळणं मुश्किल होणार आहे म्हणून ते आपल्या मागे लागलेत”
“ठिक आहे प्राची, त्यांना हो सांग.करु आपण” प्राची आनंदली.
दुसऱ्या दिवसापासून दोघं तयारीला लागली. प्राचीच्या सासुबाईंना मात्र एवढं मोठं काम हाती घेणं पसंत नव्हतं. त्या वारंवार दोघांना खाली खेचण्याचा, नाउमेद करण्याचा प्रयत्न करु लागल्या. त्यातच प्रज्ञा काविळीने आजारी पडली. तिचा आजार आठदहा दिवस चालला. ती बरी होत नाही तर सासुबाई मंदिराच्या पायऱ्या उतरतांना पडल्या आणि त्यांच्या मांडीचं हाड मोडलं.
आँपरेशन करुन त्यांना घरी आणलं पण त्या ज्या काही थोडीफार मदत करायच्या तीही बंद झाली. मांडीला प्लँस्टर लावल्यामुळे त्या दिवसभर पलंगावर झोपून असायच्या आणि तिथूनच प्राचीला आँर्डर्स सोडायच्या.रोजची कामं,५० डब्यांचं जेवण,मुलांच्या शाळा आणि सासुबाईंचं करताकरता प्राचीची भयंकर दमछाक होऊ लागली. प्रसाद तिला जमेल तशी मदत करायचा पण आता त्यालाही बाहेरची भरपूर कामं असायची.
२१दिवसानंतर सासुबाईंच्या पायाचं प्लँस्टर निघालं. त्या कुणाचा आधार न घेता चालू लागल्या तेव्हा प्राचीला हायसं वाटलं. लग्नाला आता १०-१२ दिवसच उरले होते. बहुतेक व्यवस्था तर झाली होती पण जोपर्यंत लग्न व्यवस्थित आटोपत नाही तोपर्यंत प्राचीच्या जीवाला घोर लागून रहाणार होता.
एक दिवस सकाळी सगळे नाश्ता करत असतांनाच प्रसादला फोन आला. मुलांची बडबड चालू होती म्हणून प्रसाद बाहेर गेला. बोलणं झाल्यावर आत येऊन तो प्राचीला म्हणाला
“प्राची १५ दिवसांपूर्वी मी औरंगाबादला इंटरव्ह्यूला गेलो होतो ना, तिथून काँल होता. उद्याच जाँईन करायला सांगताहेत ते”
प्राचीचा चेहरा पांढराफटक पडला.पण तिच्या सासुबाई म्हणाल्या
“अरे वा!खुप चांगली बातमी आहे.किती पगार देणार आहेत?”
“पंचवीस हजार”
“अरे वा!तसा कमीच आहे पण वाढेल पुढे. तू ही संधी घालवू नकोस. पुढे नोकरी मिळेल की नाही सांगता येत नाही”
प्रसादने प्राचीकडे पाहिलं.तिच्या डोळे भरुन आले होते. “अहो लग्न दहा दिवसांवर आलंय. आपली सगळी तयारी झालीये.तुम्ही गेलात तर मी एवढं मोठं कार्य एकटी कसं सांभाळू? त्यांना १०-१२ दिवसांची मुदत मागून घ्या ना”
“मी विचारलं त्यांना. पण ते नाही म्हणाताहेत. मी उद्या नाही गेलो तर दुसऱ्याला लावून घेणार आहेत ते”
“माझं ऐक तू प्रसाद. उद्या जाँईन हो. धंद्याचं काय आहे, आज आहे उद्या नाही.त्यातून कँटरिंगमध्ये सध्या खुप स्पर्धा आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच रहाणार आहे. पुढे असा काळ येईल की तुम्हांला कामच मिळणार नाही. मग तेव्हा काय कराल?नोकरीत कसं एक फिक्स इन्कम येत रहातं.आणि या नोकरीच्या अनुभवावर तू अजून चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतो”
आईचं म्हणणं प्रसादला पटलंय हे त्याच्या चेहऱ्यावरुन प्राचीला जाणवलं. ती घाईने म्हणाली “अहो पण आई नोकरीचंही काय खरं राहिलंय? अशी कोरोनाची लाट आली तर परत एकदा घरी बसावं लागेल” “हो पण मग तेव्हाही लग्न वगैरे कार्यक्रमही घरातल्या घरात मोजक्या लोकांमध्येच करावे लागतील. मग तुमचे डबे देणं, कँटरिंगही बंदच होणार आहेत. मग तेव्हा काय कराल?”
हा मुद्दा अचुक होता. प्राचीला काय बोलावं ते कळेना. तिने प्रसादकडे काळजीने पहात विचारलं
“पण मग या काँट्रॅक्टचं काय करायचं?”
“कँन्सल करुन टाक प्राची.त्यांनी दिलेले अँडव्हान्सचे दोन लाख त्यांना परत करुन टाक.खरं कारण सांगितलं तर तेही काही म्हणणार नाहीत”
“अहो पण ते बरं दिसेल का? आणि ऐन वेळेवर दुसरा कँटरर त्यांना कसा मिळेल?”
प्रसादने खांदे उडवले “मला कळतंय प्राची. पण माझा नाईलाज आहे. असंही कँटरिंग, इव्हेंट मँनेजमेंट हे काही माझं फिल्ड नाहिये. मला माझ्याच फिल्डमध्ये काम करायला आवडेल. आणि माझा पगार वाढला की आपण सगळेच औरंगाबादला शिफ्ट होऊ. तुही ही सगळी कामं सोडून दे. तुलाही मग अशी जीवाची ओढाताण करायची गरज भासणार नाही”
प्राची काही बोलली नाही पण नवऱ्याचा हा निर्णय आणि सासूने त्याला दिलेली साथ तिला अजिबात आवडली नाही.
त्याची बँग पँक करतांना तिच्या मनात शेकडो विचारांचं वादळ घोंघावत होतं. आजवर दिवसरात्र जिद्दीने आणि चिकाटीने केलेले प्रयत्न, त्याला नशीबाची मिळालेली साथ, हातात खुळखुळणारा पैसा आणि त्यामुळे न जाणवलेली प्रसादची बेरोजगारी. आजवरच्या या यशाला प्रसादच्या एका निर्णयाने मातीमोल ठरवलं होतं. तिच्या या उद्योगामुळे ८-९ जणांना रोजगार मिळाला होता. सगळं बंद केलं तर एका फटक्यात ते सगळे रस्त्यावर येणार होते जसा प्रसाद स्वतः एक वर्षापूर्वी आला होता. स्वतःचं भलं झालं की माणूस दुसऱ्यांच्या बाबतीत इतका संवेदनाहीन कसा होऊ शकतो? याचा तिला प्रश्न पडला.
रात्री झोपायला गेल्यावर तिने काकूळतीने प्रसादला शेवटचं विचारलं
“काहो खरंच गेलंच पाहिजे का?सध्या आपलं किती छान चालू आहे. पैसा भरपूर येतोय.हे काँट्रॅक्ट यशस्वी झालं असतं तर दोन दिवसातच आपल्याला दोन अडिच लाख मिळाले असते.सांगा कोणत्या नोकरीत इतका पैसा आहे? तुम्ही महिनाभर राबून पंचवीस हजार कमावणार. त्यातले दहा बारा हजार तर रुमचं भाडं, जेवण, कंपनीत जाण्यायेण्याला खर्च होणार आहेत. हातात फक्त बारा तेरा हजार पडतील. त्यात इथलं घर कसं चालेल? आईंच्या औषधाचाच खर्च महिन्याचा चारपाच हजार आहे “
“तू तुझं डब्यांचं काम सुरु ठेव.आता तुझ्या हाताखाली ८-९ माणसं आहेतच ना!त्यांच्याकडूनच सगळी कामं करुन घ्यायची. आणि आता मला माझा निर्णय बदलवण्याचा प्रयत्न नको करुस.मी तुला म्हंटलं ना की ते माझं काम नाहिये. असं नाँनस्टँडर्ड काम करणं मला कधीच पटलं नाही. पण काय करु. बेकार बसलो होतो म्हणून तुला मदत करत होतो. आता मला माझ्या आवडीचं काम करु दे”
त्याच्या बोलण्याने तिचे डोळे भरुन आले. “याचा अर्थ हाच ना की तुम्ही मला मदत करुन जणू माझ्यावर उपकार करत होते ” तिच्या मनात आलं पण ती बोलली नाही. रात्रभर ती आता काय करायचं, मोठ्या कष्टाने उभारलेला हा डोलारा पुढे कसा रेटायचा याचा विचार करत बसली होती.
सकाळी सहा वाजता प्रसादची गाडी होती म्हणून पाच वाजताच ती त्याचा डबा करायला उठली. तेव्हाही डोक्यात विचार भणभणतच होते. तयारी झाल्यावर तो जायला निघाला तेव्हा त्याला थांबायची शेवटची विनंती करावी असं तिला वाटून गेलं पण तिने मनाला आवर घातला.
तो गेल्यावर सोफ्यावर बसून ती बराच वेळ रडत होती.एकाएकी कसल्यातरी उर्मीने तिने डोळे पुसले.” कलेक्टर, पोलिस अधिक्षक,सी.ई.ओ.अशा वेगवेगळ्या उच्च पदावर कार्य करणाऱ्या बायका एकेकट्या लढतातच ना!मग आपण असं हातपाय गाळून कसं चालेल?या बायकांना भलेही दुसऱ्यांची मदत मिळत असेल पण शेवटचा निर्णय घेणं आणि तो अंमलात शेवटी त्यांना स्वतःलाच करावं लागतं ना? मग आपण एकटीने हा कँटरिंगचा बिझनेस करु शकत नाही? नक्कीच करु शकतो. शेवटी प्रसादही तर आपण सांगू तेच करायचे ना? स्वतःचे असे कोणते निर्णय त्यांनी घेतले होते? एवढं आहे की नवरा हा सगळ्यात विश्वासू पार्टनर असतो पण म्हणून त्याच्या नसण्याने फार काही नुकसान होईल असं नाही.या व्यवसायाने आपल्याला पैसा आणि नांव तर दिलंच पण आपलं जेवण केलेला प्रत्येक माणूस जेव्हा “ताई तुमच्या हातचा स्वयंपाक खरोखरच अप्रतिम असतो. मन अगदी त्रुप्त होतं” अशी जी प्रतिक्रिया देतो आणि त्या प्रतिक्रियेमुळे जे प्रचंड समाधान मिळतं त्याला तोड नाही.
नाही. हा व्यवसाय आपण अजिबात सोडायचा नाही. अजून नऊ दिवस आपल्या हातात आहेत. आपण मँनेज करु शकतो. येस!आपण करु.काही चुकलंच तरी समोरच्या पार्टीला आपल्याबद्दल सहानुभूतीच असेल. ते आपल्याला नक्कीच सांभाळून घेतील”
या विचारासरशी तिच्या अंगात उत्साह संचारला. मनातले सगळे संशय मिटले.सगळ्या अडचणी, प्रश्न तिला शुल्लक वाटू लागले. निश्चयाने ती उठली आणि फाटकाचा आवाज आला, पाठोपाठ बेल वाजली. तिने दरवाजा उघडून पाहिलं तर समोर प्रसाद उभा होता.
“अरे! काय झालं? काही राहिलं का? की गाडी चुकली? असे अचानक परत का आलात? “तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
तो आत आला. हातातली बँग खाली ठेवली आणि प्राचीकडे वळून म्हणाला
“प्राची मी निर्णय बदललाय. मी जात नाहिये”
“का?”
तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला “प्राची आज सकाळी उठल्यापासूनच द्विधा मनस्थितीत होतो. जायची इच्छाच होत नव्हती. तुझं सगळं म्हणणं पटायला लागलं होतं. बसस्टँडवर गेलो. बस लागली होती. तिच्यात जाऊन बसलो खरा पण गेल्या वर्षातले सगळे प्रसंग आठवू लागले. माझ्या वाईट काळात तू मला किती छान सांभाळून घेतलंस, मला खुप साथ दिलीस, घराची गाडी व्यवस्थित चालावी यासाठी किती कष्ट घेतलेस ते आठवून मला माझीच लाज वाटू लागली. आज तुला माझी गरज असतांना मी तुला सोडून चाललोय याचा मला पश्चात्ताप होऊ लागला. मग मी निर्णय घेतला. बसमधून खाली उतरलो आणि तडक घरी परतलो. बरं केलं ना?”
नवऱ्याला आपल्या कष्टांची जाणीव झाली हे ऐकून प्राचीला गहिवरुन आलं. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या जबाबदारीचं फार मोठं ओझं उतरल्याचीही जाणीव तिला झाली.डबडबल्या डोळ्यांनी ती त्याला म्हणाली
“हो तर. तुमची साथ तर मला हवीच होती ना!” प्रसाद हसला.म्हणाला “जीवनसाथीचं कर्तव्य तू नेहमीच पार पाडत आली आहेस.आता माझी पाळी आहे”
प्राचीने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. पण रडतारडता तिच्या मनात विचार आला” प्रसादची साथ मिळतीये ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती पुढे नाही मिळाली तरी आपण आपल्या वाटेवर जिद्दीने चालतच रहायचं आहे”