“यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता”
(जिथे स्त्रीची पूजा होते किंवा जिथे स्त्री पूजनीय असते तिथे देवाचा वासअसतो)
थोडक्यात स्त्रियांची कार्य शैली, त्यांचे जीवन, चरित्र जेंव्हा एक आदर्श म्हणून आपण मानतो आणि तेथे दैवी अनुभूतीचा अनुभव घेतो .
मी कर्मकांड मानणारा नाही त्यामुळे कदाचित दैवी नसेल तरी एका निर्मळ वातावरणाची निर्मिती मात्र आपण अनुभवतो.
स्त्रीची लज्जा, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हि तिची आभूषणे आहेत तर अश्रू तिचे अस्त्र . पण कोणाही स्त्रीच्या डोळ्यात आलेले अश्रू जीव हेलावून टाकतात. ते आनंदाचे असले तरी आणि ते वेदनेचे- अपमानाचे- अवहेलनेचे असले तरी . ज्या घरातील स्त्री आनंदी ते घर समाधानी आणि ज्या समाजातील स्त्री सन्मानित तो समाज प्रगतिशील हे नक्की . तरी देखील स्त्रीवरील अत्याचार, तिचे शोषण पिढ्यान पिढ्या चालत आले आहे .
आपण आज स्वतःला प्रगत- सुशिक्षित समजतो , पुरोगामी मानतो , पाश्चात्य संस्कृती अंगीकारून modern. म्हणवूंन घेतो. पण समाजातला बराचसा भाग अजूनही रूढीवादी (CONSERVATIVE) आहे , बराचसा अशिक्षित आणि मागासलेला देखील आहे .
थोड्याफार प्रमाणात पहिला वर्ग सोडला तर सर्व ठिकाणी स्त्री हि फक्त “रांधा वाढा उष्टी काढा ” यातच अजूनही अडकली आहे . तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणेही सगळीकडे सारखेच.
निर्भया, हैदराबाद, सारख्या घटना घडतात आणि आपण त्या मूग गिळून बघत बसतो, किंवा त्यावर आपल्या परीने निषेध व टिपणे नोंदवतो आणि media त्या मीठ मसाला लावून दाखवत बसते . .
यातून आपण काय शिकणार ? पालक आपल्या मुलींना मर्यादेत राहण्याचे शिक्षण आणि संस्कार देतातच पण तेच संस्कार मुलांनाही द्यायला पाहिजेत . प्रत्येक स्त्री ही आई किंवा बहीण मानणे शक्य नसले तरी एक मैत्रीण असू शकते -एक व्यक्ती म्हणून तिची स्वतःची व्यक्तिगत तसेच सामाजिक ओळख आणि मान आहे आणि तो ठेवला पाहिजे हि जाण आणि भान लहानपणापासून आणून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे आणि वेळोवेळी त्यांनी त्याची खात्री करून घेतली पाहिजे .
मुली आज सगळ्याच क्षेत्रात मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात , काही वेळा त्यांच्या पुढेही असतात . क्षेत्र corporate. असो किंवा जाहिरातींचे , entertainmaint. चे असो त्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.
वेळ प्रसंगी त्यांचा पेहराव , वावरणे काही सो कॉल्ड सुधारकांना किंवा समाज संरक्षकांना आक्षेपार्ह वाटत असेल आणि त्याबद्दल ते संस्कार आणि संस्कृतीच्या नावाने व्यर्थ आरडाओरडही करतात. पण तीच गोष्ट मुलांनी केलेली चालते – हे दुटप्पी पणाचे आहे.
भान सर्वांनी ठेवले पाहिजे मुलांनी , पालकांनी , समाजाने , मुलींनी आणि स्त्रियांनीही.
बऱ्याच वेळेला एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या अवहेलनेला असुरक्षिततेला कारणीभूत असते , हे थांबायला हवे
स्त्री ही कायमच जननी राहणार आहे त्या भूमिकेतून तिला बाहेर काढणे हे तिलाही शक्य नाही आणि त्या स्वातंत्र्याचा तिनेही अट्टाहास करुही नाही कारण त्याने unbalance. तयार होईल .
तिच्या कार्यक्षेत्राचा आवाका वाढतोय आणि तिचा आत्मविश्वास वाढतोय व तो समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे हेही तेवढेच खरे व तिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत
स्त्री केवळ सुरक्षित पणे नाही तर मनमोकळेपणाने समाजात वावरली पाहिजे तरच आपल्या पुरोगामी म्हणण्याला अर्थ आहे
निर्भया व तशा हिडीस गोष्टी घडू नयेत यासाठी या गुन्हेगारांना लवकरात लवकर मोठी शिक्षा हवीच, जेणेकरून असे प्रसंग परत होणार नाहीत. पण त्याबरोबरच एक नवी दृष्टी असलेली सामाजिक जाणीव आणि संस्कार घडवण्याची ही तेवढीच गरज आहे
मगच त्या यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता (जिथे स्त्रीची पूजा होते किंवा जिथे स्त्री पूजनीय असते तिथे देवाचा वास असतो) उक्तीला अर्थ आहे
महिला दिनाच्या सर्व माता-भगिनी, मैत्रिणींना शुभेच्छा !!!