……..कविता……..
या कवितेने वेड लाविले
तिचा मनाला लळा
ओठामधुनी शब्द उमटती
स्नेह असो वा झळा।।
भाव भावना मनी कल्पना
उत्कट अनुभूती
भिडे काळजा क्षण हळवे ते
शब्दचि कविता ती।।
शब्द मोजके बाण उरी ते
महान अर्थ मला
भेदूनी ह्रदया परिणामाते
करिती तव ही कला।।
लय तालांची सुरम्य जादू
शब्द सार्थ रचना
प्रतिभेचा जणु साज ही कविता
करीते मुग्ध मना।।
जखमा उरीच्या मर्म गूज हे
मन का उकलावे?
दु.ख मोद ना कोणा,कविते!
फक्त तुज वदावे।।
दिनरात्रींचे सुख दु.खांचे
शिशिर वसंत ऋतू
कळा कधी कधि मळेचि फुलती
जवळी कविते तू!!