भले बुरे जे…घडुन गेले…
विसरुनी जाऊ… सारे क्षणभर…
जरा विसावु…या वळणावर…
या वळणावर….!
अकरावी बारावीत असताना ” तुझ्या वाचून करमेना ” या चित्रपटातलं…… रेडिओवर……. हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं…!
हळूहळू ते गाणं कानात झिरपायचं आणि मस्त निवांत ऐकत रहावसं वाटायचं … … सुधीर मोघेंच्या गाण्यातली
सगळी अर्थपूर्ण कडवी … सुहासचंद्र कुलकर्णींची सुरेख चाल…! अनुराधा पौंडवालांचा मधुर आवाज…. तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…!
खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातंच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्यातलं, समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश…! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर…!
खूप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..!
ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणू काही…!
पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…!
या आधीच्या वर्षानं करोनाचा महाभयंकर राक्षस आपल्यापुढे उभा करत आपल्या सर्वांच्या जीवन प्रवासात फारच बिकट वाट दाखवली – सरत्या वर्षानंही करोनाच्या दुसऱ्या लाटेची त्सुनामी आणली आणि आपल्या सर्वांची जरा जास्तंच परीक्षा घेतली. याही वर्षात आपण आपण अजूनही करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो आहोत, जात आहोत. याच कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरे गेलेलो आहोत. अनेक सुहृदांना गमावूनही बसलो आहोत आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणींतून गेलेलो आहोत – जात आहोत -अनेकांना आर्थिक दृष्टया फटका बसलाय.
पहिली लाट, दुसरी लाट – डेल्टा-ओमिक्रोन अशी वेगवेगळी भुतं अजून थैमान घालतायत . करोनाचं सावट अजूनही पूर्णपणे दूर झालं नसलं तरी न्यू नॉर्मल का काय म्हणतात तेही अनेक जणांचे आधीच सुरु झाले आहे – काही ते सुरु होण्याच्या अजूनही प्रतिक्षेत आहेत. अनेक बंधनं आहेत – त्यांचा आता कंटाळा यायला लागला आहे – पण तरीही धीर सुटून देऊन चालणार नाही हेही पटतंय
अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं गाणं मला आठवतं – “कई बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंसके पीछे … मन दौडने लगता है “
सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी – रोज हेच व्हायला पाहिजे – असंच व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो –
आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि इतर काही मर्यादा सांभाळून , भीती ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले.
गेली अनेक वर्ष आली-गेली , बरंच काही शिकवून गेली , तसंच हे एक वर्ष … एक वळण
आज एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपतय, नवीन चालू होतंय…
आणि तसंही सर्वच काही निराशाजनक नाहीये..
सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – घरातली -घरात बसून किंवा प्रत्यक्ष जाऊनही ऑफिसची कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? –
संक्रांती-पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी सारे सणवार आपण साजरे करतोच आहोत
त्यामुळे हे स्लो डाऊन कायमचं राहणार नाही
“There is still life and still there is a hope “
मरनेवालोंके लिये मरा नहीं जाता – उनकी यादे जरूर रहती है – जीवन चालू रहता है !
जीवन है चलने का नाम !!
दोन पावलं मागे आलोत – पण आता मोठा पल्ला गाठावा लागणार आहे – नक्कीच गाठू- अजून बरंच काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात –
परिस्थिती नक्कीच बदलेल – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी…
रिता जरी दिन वाटे
मन भरलेले ठेवू
धीर धरून सदा
आशा जागती ठेवू
भले बुरे ते विसरुनी जाऊ
धैर्य -आनंदाने पुढे जाऊ