नव वर्ष प्रतिपदा!
ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलेला दिवस!
मग त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे…
गुढी उभारणे हे आपल्या मनातील परमोच्च आनंद गगनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास होय!
शुभ सुभग, सुखद दिन..
चैत्र मास, चैत्र पालवी सारा सृजनाचा सोहळा…
ऋतू जरी शुष्क उन्हाळा..
रसदार फळांचा असतो मेळा..
अशाच या चैत्र मासातील पहिला नववर्ष सोहळा..
आबाल- वृद्ध आनंदी आनंदी..
तरुणाईच्या स्वप्नांची वृद्धी..
नवविवाहितांच्या ये आनंदा भरती…
सौख्यदारी ,सौख्य घरी….
आम्रपर्णी तोरणे, दारी..
सुंदर रंगावली रंगली प्रांगणी..
प्रातःकाळी कडूनिंब पानाचे सेवन….
हो वरदान सकल वर्ष आरोग्य संपन्न….
गोडधोड, मिष्टान्न सुग्रास भोजन…
रसना होय तृप्त जरी….
बहुगुणी तांबूल मुखी खूमारी….
काय वर्णन ते गुढीपाडव्याचे करावे?
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने रूढीस चालत न्यावे…
बदलते जग, बदलते विचार…
रुपडे बदलले साजरा करण्याचे…
हेतू मात्र एकच सदैव..
आनंद द्विगुणित करण्याचे…..
कोकिल रव पडता कानी….
बहरलेला आम्र तरू मधुमासा ची आठव देतो….
चैत्र पाडवा नव्या स्वप्नांचा इमला बांधण्यास सज्ज होतो….