आला आला म्हणेपर्यंत
बाप्पा माझा निघाला
आनंद घेऊन आला चतुर्थीला
आज डोळ्यांत पाणी आणून चालला
केली मी उत्तरपूजा
निरोपाची आरती झाली
“पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना
बाही माझी ओली झाली
सोबतीने बाप्पाच्या माझ्या
सुख घरी वसले होते
वर्षभराच्या मळभातून
मन मोकळे झाले होते
दर्शनाने रोज त्याच्या
प्रसन्न होत होते सारे
सजली होती आनंदाने
नात्यागोत्यांची आभासी मखरे
नको ढोल नको ताशे
बँड बाजाही आज नको
तसंही माझ्या बाप्पाला
भक्तिभावाखेरीज काही नको
निसर्ग मात्र यंदा जरा
जास्तच प्रसन्न होता
गच्चीतल्या बागेतून बाप्पाला
रोज नवीन फुले वाहात होता
जाता जाता मात्र आकाशातून
भरपूर तो बरसून गेला
निघाला आज देव माझा
घर सुगंधित मंगल करून
जाताना मात्र नेहमीप्रमाणे
जीव माझा आला भरून
एक मात्र बरे झाले
बाप्पा घरातच विसर्जित झाले
पुनरागमनायचं म्हणालो तरी
तुझ्याजवळच राहतो म्हणाले
पुनरागमनायचं म्हणालो तरी
तुझ्याजवळच राहतो म्हणाले
*हरि: ॐ तत्सत् *
इति श्रीगणेशार्पणमस्तु