दारावरची बेल वाजली तशी योगिताने धावत जाऊन दरवाजा उघडला. बाहेर तिची मैत्रीण सुनंदा उभी होती.
“ये ये सुनंदा. आज अचानक कसं येणं केलंस? बस, मी पाणी घेऊन येते”
तिला पाणी देऊन योगिता तिच्या समोर जाऊन बसली. सुनंदाने पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि हसून म्हणाली
“अगं काही नाही, मी सध्या हैदराबादी मोत्यांच्या दागिन्यांचा बिझिनेस सुरु केलाय. म्हंटलं आज तुला सुटी असते तर दाखवावे तुलाही काही”
“अरे वा! दाखव ना. आवडले तर जरुर घेईन मी!”
योगिता हर्षाने म्हणाली. सुनंदाने बँग उघडली. त्यातून अनेक प्रकारचे दागिने काढून तिने टेबलवर मांडून ठेवले. ते दागिने पहात दीडदोन तास कधी उलटले तेच योगिताला कळलं नाही. त्यातून तीन हजाराचा नेकलेस आणि अडिच हजाराच्या बांगड्या तिने पसंत केल्या. तेवढ्यात आतमध्ये झोपलेली अनुजा बाहेर आली.
“बाबा उठलेत का ग अनू?” तिने अनूजाला विचारलं.
“हो. पुस्तक वाचताहेत” अनू म्हणाली
योगिता निवडलेले दागिने घेऊन बेडरुममध्ये गेली. पुस्तक वाचणाऱ्या अर्पितला ते दागिने दाखवत म्हणाली
“अहो बघा किती सुंदर दागिने आहेत. आणि स्वस्तही आहेत. आपल्याकडे हेच दागिने दहा हजाराला मिळतील. विशेष म्हणजे सुनंदा यांची गँरंटी घेतेय”
अर्पितने एक नजर त्या दागिन्यांवर टाकली मग पडलेल्या चेहऱ्याने तो तिला म्हणाला.
“योगिता दागिने चांगले आहेत गं. पण तुला माहितेय सध्या आपली परीस्थिती कशी आहे ते!”
अर्पितने तिच्या उत्साहावर पाणी फिरवलेलं पाहून योगिता संतापली
“हे तुमचं नेहमीचंच आहे. काहीही उत्साहाने घ्यायला गेलं की लगेच तुमचा परीस्थितीचा बहाणा तयार असतो. आम्ही कधी हौसमौज करायचीच नाही का?”
अर्पितचा चेहरा अजूनच केविलपणा झाला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा नकार ओळखून योगिता अजूनच बिथरली. त्याच्याकडे संतापाने पहात ती तणतणतच बाहेर आली.
“राहू दे गं बाई सुनंदा, ते नाही म्हणताहेत”
सुनंदा आश्चर्यचकीत झाली.
“का गं? का नाही म्हणताहेत?”
“नेहमीचंच कारण, सध्या पैसे नाहीत. माझं मेलं नशीबच वाईट. लग्नानंतर कधी माझी हौसमौज झाली नाही. नणदा आणि सासू-सासऱ्यांचं करण्यातच सगळं आयुष्य गेलं. स्वतःसाठी तर कधी जगताच आलं नाही”
“पण योगिता, तू स्वतः कमावतेस. मग स्वतःसाठी काही खर्च करण्याचा तुला एवढासुध्दा हक्क नाही? एवढ्याशा पैशासाठी तुला नवऱ्याला विचारावं लागतं?”
सुनंदाने आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. तिच्या या प्रश्नावर योगिताचे डोळे भरुन आले. भरलेल्या गळ्याने ती सुनंदाला म्हणाली
” हे असंच आहे बाई. मी म्हंटलं ना माझं नशीबच वाईट आहे म्हणून! जाऊ दे. पुढच्या महिन्यात मी नक्की घेईन किंवा मध्ये जमलं तर तुला फोन करते”
“चालेल. पण लवकर कर. सध्या डिस्काउंट सुरु आहे. नंतर महागात पडतील दागिने”
योगिताने मान डोलावली. सुनंदाने दागिने आवरुन बँगेत ठेवले आणि ती निघून गेली.
अर्पित आतमध्ये हे सर्व ऐकत होता. योगिताचं बोलणं ऐकून तो चांगलाच दुखावला. सुनंदा गेल्याचा अंदाज आल्यावर तो बाहेर आला.रागावलेल्या योगिताला म्हणाला “योगिता या महिन्यात घरपट्टीचे पाच हजार भरायचे आहेत शिवाय अनुजाच्या क्लासची फीसुध्दा भरायची आहे”
वस्तुस्थिती लक्षात आल्यावर योगिता जरा वरमली तरीही आपला राग कायम ठेवत म्हणाली
“खर्च कधी नसतात हो आपल्याकडे? मग काय मरेपर्यंत आम्ही काही हौसमौजच करायची नाही?”
“तसं नाही योगिता पण……..”
त्याचं न ऐकताच ती रडतरडत आत निघून गेली. अर्पित तिच्याकडे बघत राहिला. तिचं मन त्यालाही कळत होतं. पण इलाज नव्हता.
दोघांचं लग्न झालं त्याअगोदरपासून योगिता नोकरी करत होती. लग्नानंतर दोन नणंदा आणि नेहमी आजारी असणारे सासूसासरे यांच्या दिमतीतच दोघांचे पगार संपून जायचे. जी बचत ती कशीबशी करायची तीही नणंदांच्या लग्नात संपून गेली. कालांतराने सासूसासरे वारले. आतातरी खर्च करायला मोकळेपणा मिळेल असं वाटत असतांनाच एक टू बी एचकेचं स्वतःचं घर असावं असं योगिताला वाटू लागलं. घर तर झालं पण त्यासाठी अर्पितला कर्ज घ्यावं लागलं. त्याचा अर्ध्याहून अधिक पगार त्या कर्जाच्या हफ्त्यातच जायचा. योगिताच्या पगारावर घर चालायचं. अर्थातच मनमोकळेपणाने खर्च करायची योगिताची इच्छा अपूर्णच रहायची. जेव्हा बघावं तेव्हा मन मारुन जगणं तिला असह्य व्हायचं पण इलाज नव्हता.अर्पितचीही परीस्थिती काही वेगळी होती अशी नाही.
त्यालाही पर्यटनाची खुप आवड होती पण पैसे नाहीत म्हणून आजपर्यंत तो कुठेच जाऊ शकला नव्हता. पैशाअभावी बायकोची होणारी चिडचिड त्यालाही दिसायची पण त्याचाही नाईलाज होता. त्यातून आता मुलं मोठी होत होती. त्यांचा शिक्षणाचा खर्चही खुप वाढला होता. अशा परिस्थितीत सगळी हौसमौज सोडून काटकसर करणं अत्यावश्यकच झालं होतं. बजेटचं काम अर्पितकडेच असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवण्याचं जिकीरीचं काम त्यालाच करावं लागायचं. योगिता पगार झाला की सगळा पगार त्याच्या हातात देऊन मोकळी व्हायची. रुपया रुपयाचा हिशोब ठेवतांना त्याला नेहमीच बायको आणि मुलांची नाराजी सहन करावी लागायची.
ती तो नाईलाजाने सहन करायचा कारण एक्स्ट्रा इन्कमचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता. पुढच्या महिन्यात योगिताचा पगार झाल्यावर तिने तो पगार अर्पितच्या हातात दिला. अर्पितने त्यातले दहा हजार काढून तिच्या हातावर ठेवले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.
“हे काय? परत का देताय?” तिने विचारलं
“काही नाही. मागच्या महिन्यात तुला मोत्यांचे दागिने घ्यायचे होते ना, ते घेऊन ये.बऱ्याच वर्षात तुला साडी घेतलेली नाहीये. लग्नासमारंभात जाण्यासाठी एकदोन साड्याही घेऊन ये”
योगिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाली
“काय लाँटरीबिटरी लागली की काय तुमची? एकदम दहा हजार? घरातल्या बाकीच्या खर्चाचं काय करायचं?”
“करेन मी काहीतरी. तू नकोस त्याची काळजी करु” अर्पित म्हणाला
योगिता खुश झाली. आयुष्यात पहिल्यांदाच मनसोक्त खरेदी करता येणार याचा तिला प्रचंड आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी कंपनीतून सुटल्याबरोबर तिने सुनंदाला फोन करुन दागिने घेण्यासाठी येत असल्याचं कळवलं. सुनंदाच्या घरी जाताजाता मध्येच बाजार लागत असल्याने ती बाजाराकडे वळली. साडीच्या दुकानाजवळ तिने स्कुटी लावली. आतमध्ये ती शिरणार तोच तिच्या मनात एक विचार चमकून गेला “खरंच का आपल्याला साड्यांची आणि दागिन्यांची इतकी गरज आहे? दुसरं काही महत्वाचं तर नाही?” या विचारासरशी तिने घरातलं चित्र डोळ्यासमोर आणलं. अनुजाचं-तिच्या मुलीचं दफ्तर फाटलं होतं. सौरभ-तिचा मुलगा क्लासला जाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून सायकल मागत होता.
पण ते शक्य न झाल्याने त्याला आवडत नसतांनाही त्याच्या मित्रांच्या बाईकवर जावं लागत होतं. आणि अर्पित…हो त्याचेही शुज फाटले होते. तीन वर्षापासून तो त्यांना वारंवार शिवून वापरत होता. गेल्या पाचसहा वर्षात त्याने नवीन कपडे घेतले नव्हते. तिला तरी मागच्या वर्षी नातेवाईकांच्या लग्नात दोन नव्या कोऱ्या साड्या मिळाल्या होत्या. तिला अचानक तिच्या वडिलांची आठवण आली. तेही स्वतःसाठी काहीही खरेदी न करता बायको-मुलांच्या आनंदासाठी पगार खर्च करायचे. कधी कोणी टोकलंच तर म्हणायचे “मला कोण बघतंय?हौसमौज करायचे दिवस तुमचे आहेत.तुम्ही चांगलं राहिलंच पाहिजे”.अर्पित तरी दुसरं काय करत होता? कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी त्याची होती.
ती तो स्वतः हाल अपेष्टा सोसून पार पाडत होता. अचानक नवऱ्याच्या आठवणीने तिचे डोळे भरुन आले. “छे! खरी गरज अर्पित आणि मुलांना आहे. आपण काय दागिने आणि साड्या आताच घेतल्या पाहिजेत असं नाही. दिवाळीचा बोनस मिळाला की आपल्याला हट्टाने त्या घेता येतील”
या विचारासरशी तिने निर्णय पक्का केला. ती वळली. स्कुटी घेऊन तिने आपला मोर्चा बुटांच्या दुकानाकडे वळवला. अर्पितसाठी तिने आठ नंबरचा चांगला दिडहजार रुपयाचा बुट, साँक्स घेतले. मग कपड्यांच्या दुकानात जाऊन तिने त्याच्यासाठी शर्ट, पँटचे दोन पीस घेतले. अनुजासाठी नवीन स्कुलबँग घेतली. इतर सटरफटर खरेदी करुन ती सायकलच्या दुकानात शिरली. पाचसहा हजारात चांगली सायकल येते हे ऐकून तिला आनंद झाला. ती घ्यायला मात्र सौरभलाच आणावं लागणार होतं. सायकल मिळाल्यावर किती आनंद होईल त्याला! या कल्पनेने ती आनंदली.
शेवटी ती अतीव समाधानाने घराकडे वळली. कुणीतरी म्हणून गेलंय, घेण्यापेक्षा देण्यात खुप आनंद आहे याचा प्रत्यय तिला येत होता. ती घरी आली. तिला हातात पिशव्या घेतलेल्या पाहून अनुजा आणि सौरभ चकीतच झाले
“अगं आई कुठे होतीस तू? सुनंदा मावशी तुला फोन करुन थकली. तू तिच्याकडे जाणार होतीस ना? आणि हे काय आणलंय?”
“अगं बाई माझा मोबाईल गाडीच्या डिकीतच राहिला वाटतं. आण रे सौरभ काढून”
“अगं आम्ही सुध्दा किती फोन केले तुला”अर्पित बाहेर येत म्हणाला” कुठे गेली होतीस तू?”
“सांगते. मला अगोदर बसू तर द्या”
ती खुर्चीत बसली आणि पिशवीतून अर्पितसाठी आणलेले शुज, कपडे आणि अनुजासाठी आणलेली स्कुलबँग, इतर सामान बाहेर काढून टेबलवर ठेवला.
“अगं योगिता हे कशाला आणलंस. सध्या याची काहिही गरज नव्हती”
“अशी कशी गरज नव्हती? दोन अडीच वर्षांपासून ते फाटके बुट पंधरा वीस वेळा शिवून वापरताय. कपड्यांचंही तेच! पाच-सहा वर्षांपासून तेच तेच कपडे घालताय. तुम्हांला काही नाही वाटणार हो, बायका मलाच विचारतात तुझ्या नवऱ्याकडे दुसरे कपडे नाहीत का म्हणून! अनूचंही दफ्तर फाटलं होतंच. ते आणायचंच होतं म्हणून मग तुमच्यासाठीही हे घेऊन आले”
“अगं पण तुला दागिने आणण्यासाठी पैसे दिले होते. मग त्यात दागिनेच आणायचे होते ना!” अर्पित वैतागून म्हणाला
“आई माझ्यासाठी काहीच नाही आणलं का गं?” मध्येच सौरभने विचारलं
“बाळा तुझ्यासाठी सायकल पाहून आलेय. उद्या जाऊन घेऊया आणि अर्पित नकोय ते मला दागिने. शोभा वाढवण्याव्यतिरीक्त त्यांचा उपयोगच काय?मी चुकले, त्यादिवशी मी सुनंदासमोर तुम्हांला नाही नाही ते बोलले. नंतर मला पश्चाताप झाला म्हणून मग दागिने आणि साड्यांऐवजी हे घेऊन आले”
“आपली आई किती ग्रेट आहे ना अनू” सौरभ योगिताच्या गळ्यात पडत म्हणाला
“आपले बाबा पण ग्रेट आहेत” अनू म्हणाली
“कसं काय?”सौरभने विचारलं
“थांब हं”असं म्हणत अनू आत गेली आणि एक बाँक्स घेऊन आली. त्यातून नेकलेस काढून तिने योगिताच्या हातात ठेवला
“नेकलेस?”योगिताचे डोळे विस्फारले ” हा तर तोच नेकलेस आहे जो त्यादिवशी सुनंदाने मला दाखविला होता”
“हो तोच आहे. बाबांनी सुनंदा मावशीला बोलावलं होतं. तिच्याकडूनच घेतला” अनुजा म्हणाली
योगिताने चकीत होऊन अर्पितकडे पाहीलं
“अहो पण पैसे कुठून आणले? तुम्ही तर मला दिले होते ना?”
“हो. काय झालं, मी मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. त्या टुरचा चार हजाराचा यात्रा भत्ता मला आजच मिळाला. तू निघून गेल्यावर सुनंदाचा फोन आला की तू तिच्याकडे पोहचली नाहिये आणि फोनही उचलत नाहिये. मला अंदाज आलाच की तू दागिन्यांऐवजी घरात कमतरता असलेल्या वस्तूंची खरेदी करायला गेली असशील. म्हणून मग मी सुनंदालाच दागिने घेऊन बोलावलं. त्यातून हा नेकलेस घेतला पण साँरी तुझ्या बांगड्या नाही घेऊ शकलो. तेवढे पैसेच नाही उरले”
योगिताचे डोळे भरुन आले. नवऱ्याने आपलं मन बरोबर ओळखलं पण आपल्याला मात्र त्याचं मन ओळखता नाही आलं याची खंत तिला वाटून गेली.
“साँरी अर्पित, मी खरंच चुकले”
अर्पितने स्मित केलं आणि म्हणाला
“अगं वेडे, हा संसार आपला आहे. एकमेकांचं सुखदुःख आपल्यालाच जाणून घ्यावं लागणार ना?”
त्याच्या या वाक्यासरशी योगिताला गहिवरुन आलं.
खूप छान 👌👍