सहा ऋतूंचे येणे जाणे
परिवर्तन हे निसर्ग हा
शिशिरामागुनी वसंत येतो
सरे पानगळ बहर अहा!..१
कधी ओकतो आग ग्रीष्म ही
शांतवी वर्षा जलधारा
तमामागुनी प्रकाश यावा
रात्रीनंतर दिवस खरा…२
तसेच आहे मनुष्य जीवन
. सुखदु:खाचा गोफ जणु
यश वा अपयश मोद खेद ही
सप्तरंगी हे इंद्रधनु…३
वसंत फुलतो मनी जीवनी
असो कोणता मग ही ऋतू
विरही कोणी मुखी शब्द हे
हवीस तू गे !..हवास तू !..४
निसर्ग सुंदर जीवन सुंदर
फुलपाखरु हे मनही हवे
दाता तो भगवंत विधाता
कृतज्ञ आपण मात्र हवे!..५