महदपि परदु:खं शीतलं सम्यगाहु: प्रणयमगणयित्वा यन्ममापद्गतस्य।
अधरमिव मदान्धा पातुमेषा प्रवृत्ता फलमभिनवपाकं राजजम्बूद्रुमस्य॥
– ‘विक्रमोर्वशीय’, कालिदास.
अर्थ :-
दुसर्याचे दु:ख (कितीही) मोठे असले तरी शीतल असते असे म्हणतात ते योग्य आहे. (आता हेच पहा ना) ही मदांध (कोकिळा) माझ्यासारख्या संकटात पडलेल्या (माणसाच्या) मनधरणीला दाद न देता (आर्जवांकडे दुर्लक्ष करून) नव्याने पिकलेल्या जांभळीच्या फळाचा (सौंदर्यवती तरुणीच्या अधरांचे) चुंबन घ्यावे तसा आस्वाद घेण्यात गुंतली आहे.
टिप –
संस्कृत काव्य, महाकाव्य, नाटक इत्यादींमधील श्लोकाचा काही भाग अथवा श्लोकातील आशयसमृद्ध चरण पुढे संस्कृत व तिच्यापासून निर्माण झालेल्या भाषांमध्ये वाक्प्रचार, म्हण (उक्ती), अथवा संस्थांचे बोधवाक्य म्हणून वापरले गेले. असे काही श्लोक व त्यांपासून मराठी भाषेमध्ये रूढ झालेल्या उक्ती अथवा विविध संस्थांनी संस्कृत श्लोकांपासून स्वीकारलेली बोधवाक्ये आपण काही दिवस अभ्यासणार आहोत.
महाकवी कालिदास रचित विक्रमोर्वशीय नाटकातील राजा विक्रमाचा हा स्वगत संवाद आहे.
उर्वशीचा शोध घेणारा राजा विक्रम कोकिळाला उर्वशीविषयी महिती विचारतो परंतु त्याच्याकडून काही उत्तर न मिळाल्याने वरील उद्गार काढतो.
यावरूनच संस्कृत भाषेत परदुःखं शीतलं ही उक्ती प्रचलित झाली असावी आणि त्यातूनच तो संस्कृतपासून निर्माण झालेल्या हिंदी, मराठी इ. भाषांमध्ये परदुःख शीतल असते अशा अर्थाचा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
विरलः परदुःखदुःखितो जनः।
खरंय की दुसर्याच्या दुःखाने दुःखी होणार्यस माणसांची या जगात वानवाच आहे.
आप दुःख भारी, परदुःख शीतळ